साहित्य संमेलनात दोन कविसंमेलनं होती. दोन्ही कविसंमेलनांत श्रेष्ठ कवी व नवोदित कवी अशी सारखी विभागणी करून कविसंमेलनांची चांगली आखणी केलेली होती. श्रेष्ठ कवीचं कविसंमेलन वेगळं व नवोदित कवीचं वेगळं असा प्रकार केलेला नव्हता. तिथं मी पहिल्यांदाच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कविता वाचल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वि. द. घाटे होते. करंदीकर, पाडगावकर, इंदिरा संत अशा नावाजलेल्या कवींनी प्रत्येकी दोन कविता वाचल्या. कविता गाजलेल्या होत्या व चांगलं कविता वाचन करणारे कवी होते. समोर पन्नास हजार लोकांचा रसिक जाणता समुदाय होता. स्वत: संमेलनाचे अध्यक्ष पु. ल. देशपांडे प्रत्येकी कवीच्या अगोदर प्रास्ताविक करून कवितेवर बोलत होते. परिरचयात्मक बोलत होते. माझी वेळ आली!. ‘डोळे थकून थकून गेले. पाखरासारखा येऊन जा’ ही चार ओळींची कविता मी पहिल्यांदा वाचली. सगळं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं भरून गेलं. माझ्या कवितेचं उत्स्फूर्त स्वागत झालं. मी दुसरी पावसाची कविता वाचली. त्या कवितेचं पहिल्यापेक्षाही उत्स्फूर्त स्वागत रसिकांनी केलं. माझ्या आयुष्यातला सगळ्यांत आनंदाचा दिवस. एवढं कधी पाहिलेलं नाही. मी बसायला लागलो तेव्हा सभागृहातले लोक बिल्कुल ऐकायला तयार नव्हते. पुन्हा मी कविता वाचाव्यात असा आग्रह धरून होते. मी रसिकांच्या व संमेलनाच्या अध्यक्षांच्या आग्रहानं पाच-सहा कविता पुन्हा सादर केल्या. मी दुस-या दिवशी होणा-या कविसंमेलनातही कविता वाचणार आहे असं पुलंनी उत्साहात सांगितल्यावर लोक आणखीनच खूश झाले. माझा पहिल्याच संमेलनात पहिला दिवस असा महत्त्वपूर्ण व कवितेला भक्कम करणारा ठरला होता.
सायंकाळी आठ वाजता रात्रीच्या कार्यक्रमात कुमार गंधर्वाचं गाणं होतं. मी तिथेच साहित्यिकांच्या गर्दीत कुठेतरी भटकत होतो. श्री. रणजित देसाई व श्री. जगदीश खेबूडकर मला शोधत त्या ठिकाणी आले.
‘ह्या मोटारगाडीत बसा-’ रणजित देसाई
‘कुठे जायचं?’
‘तुम्ही गाडीत तर बसा, मग सांगतो.’
‘तरीपण-’
‘परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे.’
मी एक शब्दही न बोलता नुस्ता पाहत राहिलो.
साहेबांनी कोल्हापूरचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. व्यंकटेश रंगतंतू मिल्समध्ये ते थांबलेले आहेत. तू त्यांना तुझ्या कविता ऐकवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. तुझ्या कवितांनी ते अक्षरश: वेडे झालेले दिसले. आमचा भाव आता थोडा कमी झालाय्, असं सांगून रणजित देसाई मला घेऊन गेले. तिथे रात्रीचं जेवण व कवितांची मैफिल असा कार्यक्रम बांधलेला होता. अनिल, बोरकर, पाडगावकर, बापट, करंदीकर, इंदिरा संत असे आम्ही आठ-दहा कवी त्या रात्री मैफिलीत होतो. संमेलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे व पन्नास- साठ ज्येष्ठ नामवंत साहित्यिक, शंभरेक राजकारणी, समाज-कार्यकर्ते होते. छान मैफिल झाली. पहाटे तीन वाजेपर्यंत काव्यवाचन व गप्पा झाल्या. अविस्मरणीय अशी ती कवितेची रात्र होती. रात्रीची मैफिल संपल्यावर यशवंतरावांनी मला थांबविलं. त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की आज दिवसभरात केव्हातरी पुस्तकांच्या दुकानावरून त्यांनी माझे काव्यसंग्रह विकत घेतलेले होते. त्यांनी ते मला दाखविले. ह्याशिवाय आणखी कोणतं लेखन आहे का, असं विचारलं. माझी दोन पुस्तकं माझ्या हाती होती ती मी त्यांना सही करून दिली. माझी इत्थंभूत माहिती त्यांना पाहिजे होती.