यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू-
पुस्तकाच्या संकलनाचे कामकाज करताना माझ्या वाचनांत ‘यशवंतराव चव्हाण’ यांचेवरील अनेक पुस्तके आली, त्यांच्या व्यक्तिमत्वातील, स्वभावातील अनेक पैलू लक्षात आले. ‘रा. ना.’ नी त्याचे विवरण केले आहे. तरीसुद्धा मी त्याचा गोषवारा खाली देत आहे.
स्वतंत्र, सावध, चिकित्सक, चोखंदळ व हुषार बुद्धी;
साधक-बाधक विचार, सद्सद्विवेकबुद्धी, शुद्ध विचार;
आशावादी दृष्टीकोन, जिद्दी व कष्टाळू स्वभाव
वर्धमान वाचन, शिक्षणाची आवड व लोकसंग्राहक वृत्ती मूलभूत व विधायक दृष्टीतून निवडलेली अखिल-भारतीय दृष्टी व राष्ट्रीय वृत्ती, देशभक्ती;
ध्येयावर प्रामाणिक निष्ठा, प्रचंड सहनशक्ती व सचोटी. संवेदनशीलता; मृदुता, नम्रता, शिष्टाचार, शांत व गंभीर स्वभाव, साहित्य, कला व क्रिडा यांचा छंद.
समन्वयवादी वृत्ती, पूर्वग्रह त्याग वृत्ती, संघर्ष टाळणारा स्वभाव, संयम, जातिभेदातील दृष्टी, सर्वधर्मसमभाव, सृदनशीलता; व्यक्ती स्वातंत्र्यवादी दृष्टी, इतरांच्या मताचा आदर करण्याची वृत्ती; सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती; अपरिग्रहता, निस्वार्थ वृत्ती, प्रेमळ स्वभाव; उत्तम प्रशासकीय गुण, समाजाभिमूख प्रशासन व नेतृत्व कौशल्य; संघटना कौशल्य; आई विठाबाई व बंधू गणपतराव यांचे संस्कार; म. फुले, शाहू, वि. रा. शिंदे, डॉ. आंबेडकर यांची पुरोगामी दृष्टी; टिळक, गांधी, नेहरू यांच्यावरची निष्ठा, पक्षशिस्त, पक्षनिष्ठा: सामान्य माणसाचा विकास हेच ध्येय.
वरील गुण समुच्चयातून त्यांनी स्वसामर्थ्यावर स्वत:चे व्यक्तिमत्व व वैचारिक ठेवण सिद्ध करून; स्वत:ला, समाजाला व पक्षाला तात्विक नैतिक अधिष्ठान दिले, कार्यकर्त्यांना उदात्त ध्येयवाद दिला. यातूनच सत्तासोपानावरची उत्तुंग शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. मिळालेली सत्ता विचारपूर्वक लोकहितार्थ वापरण्याची पराकाष्ठा केल. विकासाचे धोरण, प्रगतीचे नियोजन करतांना व्यापक समाजकारण हे साध्य-ध्येय नजरेआड होऊ दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची याच पायावर जडणघडण होऊन ते एक प्रगतराज्य, पुरोगामी राज्य म्हणून नावारूपास आले.
आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात आणि बाजारपेठी अर्थकारणाला महत्व लाभण्याच्या काळात नियोजन, धोरणे व अंमलबजावणी यांची विविध आव्हाने समोर उभी आहेत. समाजव्यवस्था सुद्धा बदलत आहे. त्यामुळे विकासाची गती राखणे हे महत्वाचे आव्हान आहे. त्यामुळे सत्ताकारणातील व्यक्तिंना फार मोठी वौचारिक परिपक्वता एकसंघपणे उभी करावी लागणार आहे आणि असे नेतृत्व सर्व पातळ्यावर निर्माण करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण’ यांचे चरित्र मार्गदर्शन करणारे आहे.
परिशिष्ठ क्र. ५ मध्ये रा. ना. चव्हाण यांचा “पुढारी व विवेकवंत” हा लेख “यशवंतराव चव्हाण” यांना ‘आदर्श प्रारूप’ ठेऊन लिहिला असल्याचे जाणविल्ये राजकीय कार्यकर्त्याचे प्रशिक्षण व्हावे, म्हणून उदधृत केला आहे.