सत्यशोधकीय चळवळीला यशवंतरावांच्या काळात येऊन ठेपलेलं स्वरूप व म. फुल्यांच्या काळातली चळवळीची अवस्था या दोन्हीतली तफावत मोजक्या शब्दांत यशवंतरावांनी व्यक्त केल्याबद्दल यशवंतरावांना शाबासकी द्यायला कै. रा. ना. चव्हाण तयार होते. त्या तफावतीमुळेच तरूण पिढीला ब्राह्मणेतर चळवळीच्या मर्यादा ओलांडून पुढे जावे लागले व दुसरी गतीच नव्हती असंही नमूद करतात. एकूण सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रीय चळवळीनं गिळली. पण झालं ते अटळच होतं. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या वेगळ्या काळात यशवंतरावांनी सत्यशोधकी व ब्राह्मणेतर चळवळीतील गुणदोषांची केलेली चिकित्सा ऐतिहासिक आढाव्यासाठी आवश्यक ठरते. या सर्व मांडणीचा नव्या पिढीने त्यादृष्टीनं विचार केला पाहिजे व वैचारिक संक्रमणाचं खोल चिंतन केलं पाहिजे असाच कै. रा. ना. चव्हाणांचा अभिप्राय आहे.
यशवंतराव मॅट्रिकला असताना एक शास्त्रीबुवा घरी संस्कृत शिकवीत. त्यांच्याकडे यशवंतरावांनी चौकशी करण्यासाठी त्यांचे परम मित्र श्री. अनंतराव कुलकर्णी यांना पाठवलं होतं. पण शास्त्रीबुवांनी मासलेवाइक उत्तरं दिलं, “मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकवणार नाही” ही आठवण यशवंतराव सहजासहजी विसरले नसतील. पण ब्राह्मणांना न दुखवता त्यांनी मॅट्रिकला मराठी व कॉलेजमध्ये पुढे अर्धमागधी घेतली. चव्हाणांना संस्कृत घेता आलं असतं तर त्यांच्या बुद्धिमत्तेची असामान्य चमक विद्वत्तेत अधिक विकसित झाली असती. या गोष्टीबद्दल फुले-आंबेडरकरांच्याप्रमाणे चव्हाणांनी ब्राह्मणसामाजाचा राग धरला नाही, हा त्यांचा मोठेपणा!
यशवंतरावांनी शाहू महाराजांनी कोल्हापुरात उघडलेल्या जातिनिहाय वसतिगृहांचा पर्याय स्वत:साठी स्वीकारला नाही. स्वतंत्र खोली भाड्यानं घेऊनच त्यांनी कोल्हापुरात कॉलेजचं शिक्षण घेतलं. स्वत:ची प्रामाणिक मतं आचरणात आणण्याचा तो प्रयत्न होता. जी काही तत्त्वं त्यांनी उराशी बाळगलेली होती, त्यांच्याबाबतीत तडजोडी करण्याची त्यांची तयारी नसे मग त्यांचे टीकाकार त्यांना कितीही लबाड व तत्त्वशून्य ठरवोत. वडील बंधू व आई त्यांना प्रोत्साहन द्यायला व ध्येय, तत्त्वांप्रमाणं आचार व शिक्षणाचा पाठपुरावा करायला सदैव सिद्ध असत. या मंडळीमध्ये पुढच्या काळात सौ. वेणूताईही सामील झाल्या. स्वार्थसाधना व तत्त्वशून्य तडजोड म्हणजे यशवंतराव चव्हाण असा सतत गहजब करणारे यशवंतरावांचे कट्टर विरोधक अखेर त्यांचे मित्र बनले. ही किमया एक यशवंतरावच करू जाणे. त्यांच्या चिवट ध्येयवादामुळंच ते हे करू शकले, म्हणूनच कै. रा. ना. चव्हाण म्हणतात, “शाहू महाराजानंतर जनतेला मिळालेलं पात्र व मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे यशवंतरावच होत. नाहीतर दुसरे कोण?” प्रत्यक्ष परिचयातून हा विचार त्यांना सुचला होता.
या पुस्तकात यशवंतरावांच्याच काळात व परिसरात लेखक कै. रा. ना. चव्हाणही त्याच वातावरणात व वैचारिक चळवळींच्या प्रबोधनकारी अनुभवातून जात होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच सभा, त्याच वक्त्यांची भाषणे, लेख वगैरे गोष्टींचा या दोन चव्हाणांवर कसकसा परिणाम होत होता हेही वाचकाला पाहायला मिळते. काहीवेळा समान प्रतिक्रिया असत तर काहीवेळा वेगवेगळ्या असत, याची जाणीव होऊन त्यातून यशवंतराव व कै. रा. ना. चव्हाण यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचीही ओळख आपोआप होत जाते. या प्रतिक्रिया नोंदतांना कुठेही अभिनिवेश दिसत नाही व लेखनशैली विनम्र असल्याचा प्रत्यय येतो. यशवंतरावांच्या राजकीय भूमिकेचं अनेक बारीकसारीक तपशीलांचा उपयोग करून उभं केलेलं शब्दचित्र असंच या पुस्तकाच स्वरूप आहे. त्यामुळंच मराठी वाचकांना व अभ्यासकांना ही एक बहुमोल भेट ठरेल.