लौकरच मला मुंबईला जावं लागलं...
तिथं अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, डॉ. राम मनोहर लोहिया यांची भेट झाली...
छान, मोकळा माणूस!
समोरच्या कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा नेता- भूमीगत अवस्थेत असा नेता भेटणं महत्वाचं!
(किंचित् हसून) काही काही नेते-
नुसतेच गडप होतात...
त्यांचा चळवळीला काय उपयोग? लोहियांना सातारच्या चळवळीची हकीकत सांगितली,
तेव्हा ते म्हणाले:
“जन- आंदोलन वाढविण्याकरिता, पुढचं पाऊल काही त्याग करावाच लागतो!
वादळामध्ये जशी नौका सोडून द्यायची असते, तसाच हा प्रयत्न असतो....
क्रांतीच्या चळवळीत काही बलिदान अपरिहार्य असते!
या चळवळीच्या निमित्तानं, गरीब, दलित, मागास वर्गीयांपर्यंत जा!
त्यांच्यातले कार्यकर्ते उभे करा!!
एसेमना भेटलो.
बोहोरी मुसलमानाला शोभेल अशी दाढी,
टोपी, विजार, लांब कोट-
अशा वेषात ते मला भेटल्याचं आठवतं!
मुंबईतल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कुणी म्हणालं:
‘रशियासारखं ‘दग्धभू धोरण’ आपणही अवलंबावं- म्हणजे उभी पिकं जाळणं वगैरे-
मी स्पष्ट सांगितलं: “पिकं जाळणं म्हणजे लोकांशी लढाई!
तिच्यात शेवटी, लोक-लढयाचंच नुकासन होईल-“ आणखी कुणी म्हणालं:
“गुन्हेगार-वृत्तीच्या, फरारी पण संघटित टोळयांचं इंग्रजाविरूध्द सहकार्य घेऊ ना?”
म्हटलं, “ते सुरवातीला सोयीचं वाटलं, तरी शेवटी चळवळीच्या शुध्दतेला बाधक ठरेल!”
४२ डिसेंबरातली, कोवळं चांदणं ल्यायलेली रात्र... डोक्याला फेटा बांधून,
केशवरावांच्या सायकलवरनं, सरळ कराडला घरी गेलो- थोरल्या बंधूंची आणि माझी,
ही शेवटची भेट होती, याची मला कल्पनाच नव्हती... मधले बंधू गणपतराव, विजापूर तुरूंगात होते... खंर तर, मला शक्य तितक्या लवकर पुण्याला पोचायचं होतं. अंगात जोधपुरी कोट, डोक्याला फरची टोपी, अशा थाटात, सरळ आगगाडीच्या डब्यात बॅग घेऊन बसलो.... वेळ रात्रीची... डब्यात मी एकटाच- इतक्यात, एक हेड- कॉन्स्टेबल आला! म्हटलं, “आता हा अटक करणार!!” “कुठं जाणार?” “पुण्याला-“ “तिकीट काढलंय?” “माणूस पाठवलाय्- नाही आला, तर देईन गार्डाला पैसे” “गार्डाला कशाला? मी आहे ना-?” म्हटलं, “वाचलो!... पैसे ह्यानं खायचे की, गार्डानं? एवढाच प्रश्न होता!”(हशा)
रात्रभर निवांत झोपलो. घोरपडीला त्यानं मला उठवलं, मी त्याला पैसे दिले, त्यानं मला सलाम ठोकला!
पुण्याच्या वास्तव्यात मी अस्वस्थच होतो... थोरले बंधू ज्ञानदेवराव, त्यांचा गणपतरावांवर फार जीव-
गणपतरावांना पकडल्यापासून ज्ञानदेवरावांचं, पाठीच्या आवाळूचं दुखणं बळावलं; ऑपरेशन करून घ्यावं, असं दादांनी ठरवलं... ऑपरेशन झाल्यावर दादांची प्रकृति आणखी खालावली. जखमेत ‘सेप्टिक’ झालं... त्यातून न्यूमोनिया बळावला- ८/१० दिवस त्याच्याशी झगडून, त्यातच दादांचा अंत झाला...ही सगळी करूण कहाणी, मला पुढं १५ दिवसांनी पुण्याला समजली- आम्ही दोन्ही भाऊ जवळ नसताना, दादांचा असा शोकांत व्हावा, याचं मला वाईट वाटलं... १४ जानेवारीला वेणूबाईला अटक झाली. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तिनं जेलमध्ये काढली! चळवळ संपल्यावर एक दिवस मी तिला विचारलं: “पोलिसांनी तुला कशी वागणूक दिली?” “पोलिस नेहमी देतात, तशीच!” ती नेहमीच कमी बोलायची, पण फार मार्मिक बोलायची! प्रकृतिसाठी वेणूबाईला फलटणला धाडलं. मेच्या मध्यावर मला निरोप आला:
“वेणूबाई मरणोन्मुख आहे-“ तो सबंध दिवस, ती सबंध रात्र- मी झोपू शकलो नाही... सूर्यादयापूर्वी फलटणला जाऊन थडकलो! दुस-या दिवशी दुपारी, फलटण-संस्थानच्या पोलिसांनी घराला वेढा घातला- आणि माझं भूमीगत आयुष्य संपलं!!