समाजवादाला लोकशाही मूल्यांचा आधार असला पाहिजे, याचा अर्थच असा, की राजकीय क्षेत्राप्रमाणे सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतही सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. आणि इथेच नियोजनाचे महत्त्व ध्यानात येते. नियोजन हेसुद्धा लोकशाही तत्त्वांशीच सुसंगत असले पाहिजे. अखेर नियोजन म्हणजे तरी काय? देशातल्या साधन-संपत्तीचा विकास करून देशाच्या जीवनात समृद्धी आणणे हा नियोजनाचा हेतू झाला. परंतु नियोजनाच्या प्रयत्नांतून जी संपत्ती निर्माण होईल, जे सामर्थ्य प्राप्त होईल, त्याचा फायदा सामान्यांतल्या सामान्य माणसालाही मिळवून देणे, हा दुसरा आणि सर्वांत महत्त्वाचा हेतू होय. खरे नियोजन तेच. देशामध्ये जो बदल घडत जातो, तो बदल आणि जीवनाचे सातत्य या प्रक्रियेमध्ये समतोल राखून, देशाचे ऐक्य, स्थैर्य आणि सामर्थ्य यांची जोपासना करणे, हेच नियोजनात अभिप्रेत आहे. केवळ धाडसी निर्णय घेऊन यापुढे चालणार नाही. सामान्यांच्या पदरात नियोजनाचे फळ किती पडते, ही कसोटीही अशा निर्णयातून लागली जाणार आहे.
सत्तासंघर्षात अडकून पडलेला पक्ष हे काँग्रेस संघटनेला प्राप्त झालेले स्वरूप बदलून स्वातंत्र्य-लढ्याचे वेळी सामान्य माणसांची संघटना म्हणून ओळखले जाणारे स्वरूप त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करताना नव्या काँग्रेसने कशा पद्धतीने काम करावे, याचा काही आराखडाही आपण तयार करावयास पाहिजे. कारण आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे कार्य या संघटनेला यापुढे करावयाचे आहे. काँग्रेसला अलीकडे प्राप्त झालेले जे भोंगळ स्वरूप आहे, ते टाकून निश्चित विचार आणि निश्चित कार्यक्रम यांना बांधलेली संघटना उभी केल्याशिवाय हे कार्य घडणार नाही.
तरुण पिढीमध्ये आज कमालीचे वैफल्य वाढल्याचे आढळून येते. देशातील हिंसात्मक प्रकार हे या वैफल्याचे प्रतीक आहे. लाखो तरुणांना कामधंदा देण्यात जी असमर्थता निर्माण झाली आहे, तीमुळे लक्षावधी तरुण आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजाही आज भागवू शकत नाहीत. त्यामुळे बेकारांना कामधंदा देणे, ही आजची तातडीची गरज आहे. अग्रक्रमानेच हे करावे लागेल.
कृषि-औद्योगिक धंद्यांची वाढ आणि छोट्या प्रमाणावरील उद्योगधंद्यांना उत्तेजन हेच या बेकारीवर त्यांच्या मताने प्रभावी इलाज आहेत. प्रत्येक कुटुंबातल्या निदान एका माणसाला तरी काम देण्याची जबाबदारी यापुढच्या काळात शासनाला पार पाडावी लागणार आहे.
समाजाच्या मूलभूत प्रश्नांशी हे सर्व प्रश्न निगडित आहेत. येत्या पाच-दहा वर्षांच्या काळात वेगाने विकास साध्य करावयाचा असेल, तर सर्वच क्षेत्रांत शांतता ही आवश्यक आहे. देशात लक्षावधी तरुण बेकार अवस्थेत ठेवून किंवा अन्य सामाजिक प्रश्न अनिर्णीत ठेवून शांततेची अपेक्षा कोणाला करता येणार नाही, हे जरी खरे असले, तरी देशातील करोडो लोकांच्या आशा-आकांक्षा साकार व्हावयाच्या, तर देशात शांततेचे वातावरण असल्याशिवाय ते शक्य होणार नाही, हेही तितकेच खरे.