सध्या आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे पुढच्या दहा वर्षांचा कालखंड आहे. हा काळ आपल्याला खडतर जाणार आहे. कारण आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. या आव्हानांचा आपण जिद्दीने स्वीकार करणार नसलो, तर राष्ट्र म्हणून राहण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे मी मानतो. कारण आव्हाने नेहमीच असतात. अडचणी आणि आव्हाने नसतील, तर वैयक्तिक जीवनदेखील बेचव होऊन जाते. आव्हानांना घाबरलो, की सारे काही गमावून बसतो. पण जर का त्यांना धैर्याने तोंड दिले, तर आपण यशस्वी होऊ शकतो. जे वैयक्तिक जीवनाबाबत खरे आहे, तेच राष्ट्राच्या जीवनाबाबतही सत्य आहे.
आपण इंग्लंडचे उदाहरण घेऊ या. १९४० साली इंग्लंडची परिस्थिती काय होती? जर्मनीने फ्रान्स जिंकून घेतल्यावर इंग्लंडला फ्रान्समधून आपले लष्कर काढून घ्यावे लागले. भारतातील आपण लोक त्यावेळी इंग्लंडला हसत होतो; पण इंग्रज लोकांचा निर्धार ओसरला नाही. इंग्लंडला त्यावेळी कोणीही मित्र उरलेला नव्हता. शत्रू पुढेपुढे येत होता. इंग्लंड एकाकी पडले होते. पण त्याची हिंमत शाबूत होती. चर्चिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने लढा दिला आणि शेवटी दुसरे महायुद्ध त्याने जिंकले.
आपला भविष्यकाळ खडतर असला, तरी आपण गांगरून न जाता, काय केले पाहिजे, याचा शांतपणे विचार केला पाहिजे. आपली एकी अभेद्य राहिली पाहिजे. आर्थिक समस्यांवर मात करावयास हवी. आपण जर हे करून दाखविले व भारत अडचणीतही निर्धारी आणि एकात्म राहतो, हे आपल्या शत्रूला दिसून आले, तर त्यालाही भारतावर आक्रमण करण्याची हिंमत होणार नाही. परिस्थिती कितीही बिकट झाली, तरी आपण लढण्याची ईर्ष्या गमावता कामा नये. हीच माझी भारताच्या संरक्षणाची खरी कल्पना आहे.
चीनजवळ अणुबाँब आहेत, पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पैदा केली आहेत. युद्धामध्ये या शस्त्रास्त्रांना महत्त्व असते, हे तर खरेच, पण आणखी एक हत्यार अधिक महत्त्वाचे असते. ते म्हणजे लढणा-या माणसाची इच्छाशक्ती. पाकिस्तानबरोबरच्या अलिकडच्या युद्धात आपल्याला हा अनुभव आलेलाच आहे.
पाकिस्तानची विमाने आपल्यापेक्षा चांगली होती, त्याचे रणगाडे, तोफखाना-सगळेच काही श्रेष्ठ प्रतीचे होते. कारण त्याने ते पाश्चात्त्य राष्ट्रांकडून मिळविले होते. याउलट, आपल्यापाशी जुन्या बनावटीचे रणगाडे होते. आपली विमानेही लहान होती. तरीही आपण पाकिस्तानी लष्कराचा आणि हवाईदलाचा पराभव केला, याचे कारण काय? आपल्यापाशी सर्वांत महत्त्वाचे असे एक शस्त्र होते. शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी गेल्या काही वर्षांमध्ये किती तरी आधुनिक शस्त्रास्त्रे शोधून काढली आहेत. परंतु सर्वांत प्रभावी शस्त्र परमेश्वराने निर्माण केले आहे, आणि ते म्हणजे माणूस ! माणसापेक्षा श्रेष्ठ असे जगात कोणतेही शस्त्र नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यांतील युद्ध हे रणगाडे आणि विमाने यांच्यातील युद्ध नव्हते. प्रशिक्षित भारतीय सैनिक आणि शस्त्रविद्येत निपुण नसलेले पाकिस्तानी सैनिक यांच्यांतील तो संघर्ष होता. म्हणून माणूस महत्त्वाचा आहे. 'मी देशाचा आहे आणि देश माझा आहे', ही भावना जर आपण प्रत्येक नागरिकात जागृत करू शकलो; आणि कोणतीही किंमत द्यावी लागली तरी ती देऊन स्वातंत्र्य जतन केलेच पाहिजे, असे त्याला वाटायला लागले, तर भारतावर आक्रमण करण्यापूर्वी शत्रूला शंभर वेळा विचार करावा लागेल. हे सामर्थ्य, हा विश्वास, ही जाणीव हेच देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे मूलभूत शस्त्र होय. देशनिष्ठेइतका स्वातंत्र्यरक्षणाचा दुसरा प्रभावी उपाय नाही.