आपण चीनपासून हा धडा शिकलो. आपल्याला तो काल शिकायला मिळाला. आज इंडोनेशियाला तोच धडा शिकावा लागत आहे. हाच धडा कदाचित पाकिस्तानलाही उद्या शिकावा लागेल. त्या धड्यापासून शिकायचे किंवा नाही, हे पाकिस्तानने ठरवायचे आहे. आपण त्याचा विचार करण्याचे कारण नाही; परंतु भारतातील त्यावेळची परिस्थिती पाहून, पाकिस्तानने त्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा डाव रचला. आपला चांगुलपणा हा पाकिस्तानला आपल्या दौर्बल्याचा निदर्शक वाटला. पाकिस्तानी लष्कराशी लढतानाही, आपल्या मनामध्ये पाकिस्तानी जनतेबाबत वैरभाव नव्हता. भारतीय व पाकिस्तानी जनतेच्या मैत्रीसंबंधात पाकिस्तानी सरकार व्यत्यय आणत आहे. भारताला पाकिस्तानबरोबर शांतता आणि मैत्री हवी आहे. मात्र त्यासाठी भारत आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेशी कधीही तडजोड करणार नाही.
भारताची ही भूमिका पाकिस्तान जाणून घेऊ इच्छीत नाही. जे लष्करी आक्रमण करून साध्य झाले नाही, ते रशियाकडून भारतावर दबाव आणून साध्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चालू आहे. रशियाचे दडपण पुरेसे पडले नाही, तर पाकिस्तान चीनचाही दडपण म्हणून वापर करील. म्हणूनच चीन अधूनमधून नेफा, लडाख आणि सिक्कीम भागांत अतिक्रमणे करीत आहे. रशियाच्या मध्यस्थीला यश येऊ नये, अशीच या अतिक्रमणांमागील चीनची इच्छा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यांत मैत्री होऊ नये, असा चीनचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यांतील भांडण कायम राहिले, तर त्याचा आपल्याला फायदा घेता येईल, असा चीनचा मनसुबा आहे. चीनचा हा कावा पाकिस्तान ध्यानात घेऊ इच्छीत नाही.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊनच आपल्याला राजकीय, लष्करी अशा सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपली मूलभूत भूमिका स्पष्ट आहे. आम्हांला केवळ शेजारी देशांशीच नव्हे, तर जगातील प्रत्येक देशाशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्याची इच्छा आहे. परंतु एखादा देश जर मैत्रीची बोलणी चालू असतानाच, लष्कराचे भय दाखवून आम्हांला धमकवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर आम्ही कोणापुढेही नमते न घेता आक्रमणाचा खंबीरपणे मुकाबला करू.
१९६५ च्या सप्टेंबरमधील घटनांनंतर देशात एक नवे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यलढा जोरात चालू असताना देशात जे वातावरण आढळत होते, तशाच प्रकारचे हे वातावरण आहे. देशाच्या कोणत्याही भागात जा, लोकांत आपल्याला भरपूर उत्साह आढळेल. प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी आहे, जीवनपद्धती वेगळी आहे, भौगोलिक रचना भिन्न आहे. परंतु त्या विविधतेतही एकात्मतेची मूलभूत जाणीव कायम आहे. अलिकडच्या घटनांमुळे या एकात्मतेला जी चालना मिळालेली आहे, ती आपण टिकवली पाहिजे. या एकात्मतेमुळेच शत्रूला पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत होणार नाही.
पाकिस्तान व चीन यांच्या मनात काय आहे, असा काहीजण मला प्रश्न विचारतात. उद्या काय घडेल, हे कोणालाच सांगता येणार नाही. परंतु माझ्यापुरते बोलायचे, तर पाकिस्तानच्या मनात पुन्हा एकदा आक्रमण करायचा विचार असावा, असे मला वाटते. परंतु पाकिस्तानपाशी तेवढी ताकद आहे का, यासंबंधी मी साशंक आहे. सध्याच्या युद्धबंदीचा फायदा घेऊन पाकिस्तान आपले लष्करी बळ वाढविण्याचा प्रयत्न करील. वाटाघाटींनी काही साधेल काय, याचाही तो अंदाज घेईल. वाटाघाटी फिसकटल्या, तर कदाचित तो पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याचा संभव आहे. मात्र त्याबाबतीत तो पुढाकार घेण्याची शक्यता कमी आहे.