व्यक्तिपूजा व एकाच माणसाचे नेतृत्व या गोष्टी मला मान्य नाहीत. महाराष्ट्राने गतकाळात या गोष्टी स्वीकारल्या नाहीत व भावी काळातही त्या स्वीकारल्या जातील, असे मला वाटत नाही. त्याऐवजी निश्चित अशा कार्यक्रमावर आधारलेले सामुदायिक नेतृत्त्वमला जास्त पसंत आहे.
मतभेद केवळ मतभेदांसाठीच असू नयेत. तसे ते असले, तर त्यांना वैयक्तिक वा पक्षीय हेव्यादाव्याचे स्वरूप येते आणि त्याने कार्यहानी होते. विकासकार्याच्या व्दारे लोककल्याण साधावयाचे या धेयासंबंधी अर्थातच मतभेद असण्याचे कारण नाही. मार्गासंबंधी मतभेद असू शकतील हे मी मान्य करतो; पण असे मतभेद लोकशाहीच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत.
हारतुरे मिळाले व मोर्चेही निघाले. या गोष्टी लोकशाहीच्या घ्योतक आहेत. विरोधाने सुरवात होते आणि मित्रत्त्वाने नंतर आपण जवळ येतो. मतपरिवर्तन करण्यासाठी लोकशाहीचे सभागृह आहे. लोकशाही ही विरोध वाढविण्यासाठी नसते. विरोध कमी करण्यासाठी असते, विचारांच्या देवाण-घेवाणीचे हे साधन असते.
कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये. आंधाळा दुनियेत हिंडू शकेल, पण आंधळ्याच्या मागे. दुनिया जाऊ शकणार नाही.
राज्ये जी चालतात, ती राज्ये चालविणा-या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात, त्यांच्या पुण्याईने चालतात. ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात, त्यांच्या साह्य्याने चालतात.
जनतेच्या काही अपेक्षा असतात, काळाच्या काही प्ररणां असतात, इतिहासाच्या काही हाका असतात आणि याला उत्तर म्हणून शेवटी राजकीय पक्ष बनत असतो. पक्ष म्हणजे कलाकाराने आपल्या घरात एखादे चित्र रंघवावे आणि लोकांनी ते स्वीकारावे अशातला काही प्रकार नाही. कोट्यवधी लोकांच्या भावनांशी जाऊन मिळणारा आणि त्यांच्या विचारांना साथ देणारा असा जेव्हा पक्ष बनतो, तेव्हा त्याच्या अनेक गोष्टी उभ्या असतात.
निव्वळ कायद्याची भूमिका ही जुन्या राजवटीला शोभण्यासारखी होती. आपल्या राजवटीला कायद्याने राज्य करावयाचे आहे, पण निव्वळ कायद्याकरिता राज्य करावयाचे नाही. कायद्याचे राज्य हा लोकशाहीच्या कल्पनेतला मुख्य केंद्रबिंदू आहे. कायद्याचे राज्य असलेच पाहिजे. कुणाही व्यक्तीच्या लहरीचे राज्य असता कामा नये, असा त्याचा अर्थ आहे. काही नीती, काही तत्त्वे, काही धोरणे निश्चित करून ती सर्वांना लागू करता यावीत म्हणून कायद्याचे राज्य असले पाहिजे. कायदा मोडला गेला, तर त्याविरूध दाद मागता आली पाहिजे. कायदा मोडणा-याला शासन झाले पाहिजे, मग तो राज्यकर्ता असो वा जनता असो, हा कायद्याच्या राज्याचा अर्थ आहे; पण त्याचा दुरूपयोगही होतो आणि मग राज्य निव्वळ कायद्याकरिताच चालावयास लागते. पण कायद्याचे राज्य हे माणसांकरिता आहे, माणसे महत्त्वाची आहेत, माणसांचे सुख मह्त्त्वाचे आहे. मानव व त्याचे व्यक्तिमत्त्व हे सर्व शासनायंत्रणेचे केंद्र आहे, याचा राज्य करणा-यांना कधीही विसर पडता कामा नये.
हिंदुस्थान म्हणजे केवळ हिमालय, सह्याद्री किंवा आपणांस माहीत असलेली पाच-पंचवीस खेडी नव्हेत. हिंदुस्थान म्हणजे या देशातील नद्यांच्या काठावर कशीबशी कालक्रमणा करणारे, या देशाच्या माळरानात, डोंगरकपारीत उपेक्षित जीवन जगणारे, या विस्तीर्ण पठारावर, जीवन-संग्रामात हतबल झालेले असे जे लक्षावधी, कोट्यवधी लोक आहेत, ते लोक म्हणजे हिंदुस्थान. या सर्वांच्या मनात ज्या यातना आहेत, दु:खे आहेत, चिंता आहेत, त्या हिंदुस्थानच्या चिंता असल्या पाहिजेत.