यशोधन-४

भेटीला येणा-या प्रत्येक माणसाचे स्वागत व त्याला प्रमाने वाटे लावणे वाटते तेवढे सोपे नाही. शिवाय दिवसागणिक हजारो भेटणारे, विविध क्षेत्रांतले, विविध कामे घेऊन आलेले! सकाळी प्रथम भेट घेणा-याचे स्वागत व सर्व दिवसभराच्या व्यापानंतर रात्री भेटायला आलेल्याच्या स्वागतात फरक नसे. तोच उत्साह, तीच आपुलकी. प्रश्न समजावून घेण्याची तीच पध्दत. सतत चाळीस वर्षांहून अधिक काळ हाच दिनक्रम! कठीण आहे!!  साहेबांनाच ते शक्य होते, कारण त्यांच्या कृतीत कृत्रिमता नव्हती. सर्व सहजसुंदर होते. त्यांना माणसे मनापासून आवडत व करीत असलेल्या कामावर त्यांची श्रध्दा होती. कामाची खोटी कळकळ व माणसाविषयी खोटी आपुलकी जास्त काळ टिकत नाही. स्वत:च्या चेंबरबाहेर दहा-वीस भेट घेणारे जमले तरी राष्ट्राची जबाबदारी आपल्यावर कोसळली आहे, असा चेहरा करून बसलेल्या व तुसडी वागणूक देणा-या सत्ताधा-यांशी तुलना केल्यावर, हा माणूस फार मोठा वाटे व तसा तो होताही !

साहेबांच्या प्रचंड सभेतील एक श्रोता, ते त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारा एक निकटवर्ती, एवढा माझा प्रवास झाला होता. त्यांच्याविषयी काही लिहावेसे वाटत होते;  पण सुचत नव्हते. एकदा Winds of Change हे त्यांच्या इंग्रजी संभाषणाचे संकलन आणले व ‘परिवर्तनाचे वारे’ या शीर्षकाने त्याचे मराठी भाषांतरकरण्याचे ठरविले. सुरूवातही केली. दरम्यान एक मित्र भेटले. त्यांनी सुचविले, भाषणांचे संग्रह बरेच आहेत. त्यांच्या सर्व उपलब्ध भाषणातील उक्तींचे संकलन तुम्ही का नाही करत? कल्पना रास्तवाटली व आमलात आणली.

मुंबई !...

कॉंग्रसच्या लोकसभेतील दारूण पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने घेतलेले शिबिर. शिबिरास झाडून सर्व नेते व कार्यकर्ते हजर होते. एवढ्या देशव्यापी पराभवाची सवय नव्हती. मनाने व शरीराने खचलेल्या एखाद्या पलटणीचा तळ पडावा अशी स्थिती होती. सर्व वक्ते आपापल्या परिने पराभवमीमांसा व यशस्वी होण्याचे उपाय सांगत होते. सर्वांचे लक्ष होते साहेब काय सांगणार याकडे. कारण पक्षाला त्यांनी अनेक संकटांतून यशस्वी मार्ग दाखविला होता. नुसताच मार्ग  दाखविला नव्हता, तर स्वत: आघाडीला राहून त्या मोहिमांचे नेतृत्त्वही केले होते.
 
मूलभूत विचारांचा भक्कम पाया आणणारे यशवंतराव महाराष्ट्राला माहीत आहेत. या शिबिरातील त्यांचा आवेश, ‘अंतिम विजय आपलाच आहे’ असे सर्व आघाड्यांवर पराभव होत असताना सांगणा-या चर्चिलसारखा वाटला. ते शेवटी म्हणाले, “ज्यावेळी आपण संभ्रमात असतो, त्या वेळी हुकमाचा पत्ता खेळावा.” (Whenever in doubt trump) त्यांची ही उक्ती आजच प्रसंगाला उचित वाटते. कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोककल्याणाच्या व राष्ट्रउभारणीच्या मूलभूत तत्त्वांचा ‘यशोधन’ हा हुकमी पत्ता कार्यकर्त्यांच्या हाती देताना, मला विशेष आनंद होत आहे.