पुनर्वसन कार्यात दादांचे योगदान मोठे आहे. ह्यात पूरग्रस्त, दंगलग्रस्त, प्रकल्पग्रस्त ह्या सर्वाचा समावेश होतो. बेघरांना घराकरता अनुदान देण्याचे धोरण त्यांनी आखले. झोपडपट्ट्यांच्या सुधारणेकडे लक्ष दिले. तसेच सेवानिवृत्ती वेतन व स्त्री-मजुरांच्या वेतनात वाढ केली. त्यांनी चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचा-यांचा संप (१४-१२-७७) शांततेने मिटवला. मागासवर्गीयांना कर्जवसुलीच्या सक्तीतून मुक्त केले.
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापला. प्रत्येक जिल्ह्यात गोबर गॅस प्लॅंट उभारण्यास चालना दिली. मुलीच्याकरता प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे स्थापिली. कृषी विद्यापिठात एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली, ती म्हणजे कमवा व शिका.
दादांनी सहकारी क्षेत्रातील अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बॅंका, जनरल इन्शुरन्स सोसायटी, महाराष्ट्र सहकारी मार्केटिंग फेडरेशन (या संस्थे पुढे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असे नामांतर झाले), महाराष्ट्र रॉ मटेरियल ॲडव्हायजरी कमिटी (१९६०-६५) अशा अनेक संस्थांचे दादा प्रेरणास्थान होते. त्यांच्या नेतृत्वामुळे व कर्तबगारीमुळे ह्या संस्था वाढल्या व ग्रामीण भागात भरीव कार्यक्रम करू शकल्या. दुष्काळ व टंचाईग्रस्त परिस्थितीस तोंड देण्याकरता स्थापलेल्या सिंचन मंडळाचे दादा अध्यक्ष होते.
दादांचे इतर क्षेत्रांतील कार्य म्हणजे विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. मिरजेच्या मेडिकल कॉलेजचा विस्तार करण्यात दादांचे योगदान मोठे होते. दादांचे अनेक सन्मान झाले. २३-१-१९६७ रोजी त्यांना डॉ. राधाकृष्णन ह्यांच्या हस्ते पद्मभूषण हा किताब मिळाला. राहुरी कृषी विद्यापीठ व पुणे विद्यापीठ ह्यांनी त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स अशी सन्मान्य पदवी दिली. ते काही काळ लोकसभेचे सदस्य होते व १९८० साली त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस (आय)चे सरचिटणीसपदही भूषविले होते. ह्याच काळात त्यांनी किसान मेळावा भरविला होता.
दादांचे व्यक्तिमत्व
दादांसारख्या व्यक्तीला योग्य न्याय मिळाला नाही. ह्याचे कारण उच्च शिक्षणाचा अभाव हे असू शकेल. दादा हे सर्वसामान्यांचे पुढारी होते. ते त्यांचे दादा होते कारण सामान्यांना दादांपुढे आपली गा-हाणी मोकळेपणाने मांडता येत होती. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. लोकशाही व धर्मनिरपेक्षता ह्या त्यांच्या निष्ठा पक्क्या होत्या.
संघटना बांधणे आणि त्या टिकविणे ह्यात ते वाकबगार होते. त्यांचे शिक्षण जरी फार झालेले नव्हते तरी शेतक-यांच्या प्रश्नांची प्रगल्भ जाण त्यांना होती. त्यांचा व्यावहारिक अनुभव इतका प्रचंड होता की कोणतेही प्रश्न सोडविण्याची जाण त्यांना चटकन येत होती. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला भवितव्य नाही अशी त्यांची धारणा होती. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, भूमीहीन, दलितदुबळे हे विकस प्रक्रियेत केंद्रस्थानी असावेत असा त्यांचा अट्टाहास होता.
संदर्भग्रंथः
भालचंद्र धर्माधिकारी – वसंतदादा, १९८६, विश्वकर्मा प्रकाशन, सातारा
सोपान गाडे - वसंतदादा पाटील, जानेवारी २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे
विश्वास मेहेंदळे - गांधी ते पटेल, ३०- १२-२००२, सिगनेट प्रकाशन