मी तर भूमीहीन माणूस !
एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातील ५४ वर्षे यशवंतराव राजकारणात होते आणि त्यापैकी ३८ वर्षे ते सत्तेत होते. पण मंत्रीपदाच्या या प्रदीर्घ काळात त्यांनी स्वत:साठी काहीच मिळविले नाही. त्यांच्या वडिलांची- बळवंतरावांची चार एकर जमीन होती, ती चुलत्यांनी स्वत:च्या नावावर करून घेतली. त्यांच्या थोरल्या बंधूंनी विकत घेतलेली दोन एकर जमीन १९५२ च्या निवडणुकीसाठी विकावी लागली. ( ती परत घेणे शेवटपर्यंत जमले नाही. ) कराडमधील घर भावाच्या नावावर होते. थोडक्यात, यशवंतरावांची स्वत:ची स्थावर मालमत्ता जवळपास नव्हतीच. १९५७ साली आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. यशवंतरावांनी या चळवळीला केवळ शाब्दिक नाही तर प्रत्यक्ष मदत केली. त्यांनी स्वत:ला मिळणा-या मानधनातून पैसे साठवून या चळवळीला पाच हजार रुपयांची देणगी दिली. एका मित्राने त्यांना विचारले, ' विनोबांच्या कार्याला तुम्ही हातभार लावलात हे ठीक, पण त्यांच्या चळवळीमुळे भारताची प्रगती होईल असे तुम्हाला वाटते का ?'
' हो, वाटते. असं पहा, त्यांनी जे कार्य चालवलंय ते वाईट आहे का ? त्यात कोणावर जुलूम आहे का ? हिंसा होतेय का ? जर यापैकी काही घडत नसेल तर ते कार्य चांगलं आहे, असे लोकांनी का मानू नये ? त्यांचं कार्य दानावर आधारलेलं आहे आणि दान देणा-याच्या मर्जीवर अवलंबून असते. देशात प्रचंड गरीबी आहे. विनोबांच्या कार्याने हा प्रश्न मिटेल असं जरी नसलं तरी पुष्कळ गरीबांना सुख मिळू शकेल. म्हणून एक व्यक्ती या नात्याने मी या कार्याचा पुरस्कर्ता आहेच, पण माझं सरकारसुद्धा त्यांना सर्वतोपरी मदत करील.'
' पण पाच हजार रुपये मदत करण्याऐवजी तुम्हीसुद्धा भूदान केलं असतं तर बरं झालं असतं ' यावर गालात हसत यशवंतराव म्हणाले, ' मला भूदान करता आलं असतं तर मलासुद्धा फार बरं वाटलं असतं.....पण....'
' पण काय ?'
' त्याचं असं आहे, ज्याच्याजवळ ' भू ' आहे तोच ती दान करू शकतो. मी तर भूमीहीन माणूस आहे. एक आणासुद्धा सरकारी सारा मी भरत नाही. मग मी भूदान कसे करणार ?' आश्चर्याने थक्क होऊन मित्र म्हणाला, ' म्हणजे ४३ जिल्ह्यांचा राज्यकारभार चालविणारा माणूस भूमीहीन आहे, असं एखाद्यानं म्हटलं तर ?'
' तर ते पूर्णपणे सत्य आहे ' यशवंतराव हसत म्हणाले.