यशवंतरावांची शिवनिष्ठा.
३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उदघाटन यशवंतरावांनी पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते करविले. या कार्यक्रमाच्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी मोठा मोर्चा काढायचा असे ठरविले. यशवंतरावांनी विरोधकांना आवाहन केले की, यासमारंभाकडे पक्षीय दृष्टीने पाहू नका, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पण या आवाहनाला समितीने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शांततामय मार्गाने निदर्शने केली. यात भाई माधवराव बागल आघाडीवर होते. यशवंतरावांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील निष्ठा दिखाऊ आहे अशी त्यांची समजूत होती.
हा उदघाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर काही महिन्यांनी मुंबई मध्ये दादर येथील शिवाजी पार्कवर शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. पण निधीअभावी हे काम होत नव्हते. अशा वेळी यशवंतरावांच्या शिवनिष्ठेचा कस पहावा व अशाप्रसंगी ते स्वत: पक्षीय दृष्टी बाजूस ठेवतात का हे पहावे म्हणून माधवरावांनी यशवंतरावांना एक पत्र लिहिले व पुतळा उभारणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने शिवरायांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या, त्यांच्याच हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती. त्यांनी मनात आणले असते तर हे सहज झाले असते, पण ते होत नव्हते एवढे मात्र खरे. माधवरावांनी पत्र टाकले. उत्तराची अपेक्षा नव्हतीच. कारण ते यशवंतरावांचे कट्टर विरोधक होते. पण यशवंतरावांनी तात्काळ उत्तर पाठवले. साहेबांनी लिहिले होते, ' प्रिय माधवरावजी, आपण मोकळ्या मनाने पत्र लिहून आपल्याशी पत्रव्यवहार करण्याची संधी दिलीत याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. ध्येयवादाला मुरड न घालता व मतभेद राखूनही सोज्ज्वळ वातावरण निर्माण करण्याचे तत्त्व हेच खरे लोकशाही तत्त्व आहे आणि याचा विजय जर महाराष्ट्रात झाला तर येथे ध्येयवादी विचारांची सुंदर बाग फुलेल असा मला विश्वास आहे. शिवाजी पार्कवरील शिवस्मारकाबाबत श्री. ठाकरे यांच्याशी मी पुष्कळ बोललो आहे. व्यक्तिश: याबाबतीत माझ्याकडून आपण सुचवाल ते सहाय्य देण्याचे मी जरूर प्रयत्न करीन.'
आपला,
यशवंतराव चव्हाण
या पत्रापाठोपाठ काही दिवसांनी केशवराव ठाकरे यांचे माधवरावांना पत्र आले. त्यात केशवरावांनी लिहिले होते की, ' यशवंतरावांनी स्मारकासाठी व्यक्तिश: पाचशे रुपये देण्याचे कबूल केले आहे ' असे त्यांनी कळविले. यशवंतरावांची शिवनिष्ठा वरवरची नव्हती, ती सच्ची होती.