प्रतिसरकार किंवा पत्रीसरकार
ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसनें चालविलेल्या चळवळीशी विद्रोह करणारी मंडळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हालचालीच्या बातम्या गुप्तपणें सरकारला पुरविण्याचे काम करीत असत. अशा लोकांना दहशत बसावी. तसेंच काँग्रेसच्या ता. ९ ऑगष्ट सन १९४२ च्या ‘चले-जाव’ या ठरावाची अम्मलबजावणी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या समजुती प्रमाणें भूमिगत होऊन सुरू केली होती. ब्रिटिश सरकारनें सर्व देशभर लहान मोठ्या पुढा-यांना पकडून तुरुंगांत डांबल्यामुळें भूमिगत कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेनासे झाले. देशभक्तिनें प्रेरित होऊन भूमिगतांनीं आपापल्यापरी कांही भलेबुरे कार्य सुरू केले. सातारा जिल्ह्यांत रेल्वे स्टेशन जाळणें, पेट्रेन लुटणे, पोष्टाच्या तारा तोडणे, पोष्टाच्या टपालथैल्या लांबविणे. तसेंच सरकारपक्षीय लोकांना दहशत निर्माण करणें, बंदुका पळविणें अशासारखी कृत्ये होऊ लागली होती असे ऐकिवात येत होते. यावेळीं मी दिर्घ मुदतीच्या बंदीवासांत येरवडा जेलमध्यें असल्यामुळें प्रतिसरकार किंवा पुढें ज्याला पत्रीसरकार असे म्हणण्यांत येऊ लागले. त्या संबंधी मला तर कांहीच कल्पना नव्हती. श्री. यशवंतरावांची येरवडा जेलमधून कशी गफलतींने सुटका झाली, हे वर आलेच आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी महात्मा गांधींच्या २१ दिवसाचे उपोषणानुरोधानें भूमिगतांनावरील प्रकारानंतर पुढें योग्य मार्गदर्शन केले.
येरवडा जेलमधून चुकीनें झालेली श्री. यशवंतरावांची सुटका सरकारच्या ध्यानी आलेवर त्यांना पुन्हा अटक करणेची व तुरुंगांत डांबणेची तयारी सरकारनें केली. चौकशीची चक्रे सुरू होताच श्री. यशवंतराव भूमिगत झाले. त्यांचा शोध सुरू झाला. या कामी सरकारला लवकर यश येत नाहीं असे दिसून आल्यावर सरकारनें श्री. यशवंतरावांच्या पत्नी सौ. वेणूताईंना गरोदर अवस्थेंत अटक केली. पण त्यांचेकडूनहि तपास लागण्याचे चिन्ह दिसेना. तेंव्हा त्यांची मुक्तता करण्यांत आली. श्री. यशवंतरावांचे बंधू गणपतराव यांना अटक करून श्री. यशवंतरावाचा शोध घेण्याचा प्रयत्न सरकारनें करून पाहिला. तसेंच श्री. यशवंतरावांचे भाचे बाबुराव कोतवाल यांनाहि अटक करून त्यांचा अनन्वीत छळ करण्यांत आला. परंतु श्री. यशवंतरावांचा ठावठिकाणा लागला नाहीं. तेंव्हा मोठे बक्षीस लावले. पण कांही नाहीं. कै. गणपतराव चव्हाण व बाबुराव कोतवाल यांना डेटिन्यू म्हणून डांबून ठेवण्यांत आले.
सन १९४४ मध्यें महात्मा गांधींची सुटका झाली. सन १९४५ साली जर्मन व जपान राष्ट्रांचा पराभव झाला त्यावेळीं राहिलेले सर्व कैदी सरकारनें बंधमुक्त केले. युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडमध्ये नवीन निवडणूक झाली. त्यांत मजूरसरकार अधिकारावर आले. मेजर ऍटली मुख्यप्रधान झाले. त्यांनी व्हाईसरॉय म्हणून माऊंटबॅटन यांची नियुक्ती केली. युद्धांत आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडले होते. त्यांचेवर खटले भरले. पण सारे राष्ट्र त्या सैनिकांच्या मागे उभे राहिले त्यांच्या मुक्ततेची मागणी संपूर्ण राष्ट्रानें केली. सैनिकांच्या बाजूनें सर तेजबहादूर सप्रू, भुलाभाई देसाई यांच्यासारखे कायदेपंडीत व जवाहरलाल नेहरू वगैरे राष्ट्राचे नेते पुढें आले. हिंदी लष्करांतहि त्यांच्या सहानुभूतीसाठीं सैनिकांनी असंतोष प्रकट केला त्यावेळचे ब्रिटिशसेनेचे सरसेनापती सरक्लाड आचिनलेक यांना सर्व मुक्ती सैनिकांना सोडून देण्याची विनंति ब्रिटिश सेनाधिका-यांनीहि केली, ती सरसेनापती सरक्लाड ऑचिनलेक यांनी मान्य केली. चालू महायुद्धांत इंग्लडचे माणूसबळ फारच कमी झाले होते. इंग्लंडमधील सर्व उदयोगधंदे पूर्ववत चालू करणे, युद्धांत झालेली हानी भरून काढणे हे सर्व व्यवहार पूर्ण करून साम्राज्याच्या बंदोबस्तासाठीं लागणारे मनुष्यबळ इंग्लंडजवळ नव्हते. ब्रिटिश शिपाईहि परदेशांत राहणेस कंटाळले होते. याचवेळीं हिंदी लष्करांतहि असंतोष होता. तेव्हां या सर्व परिस्थितीचा ब्रिटिश मजूर मंत्रिमंडळानें विचार करून भारताला स्वातंत्र्य देण्याचे जाहिर केले. त्याप्रमाणें त्यांनी अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण करून व पाकिस्तान स्थापन करून तसेंच ब्रिटिशांचे कमीतकमी नुकसान व भारतांत अधिकाधिक गोंधळ निर्माण करून १९४७ च्या ऑगष्ट महिन्याच्या १५ तारखेस इंग्रजांनी भारतांतून मायदेशी प्रयाण केले. भारतास स्वातंत्र्य मिळाले.