आम्ही व आमचे शिवछत्रपतीं मंडळ वाद्यप्रकरणी जागरूक होतो. कारण कोणत्याही समाजाचे धार्मिक व सांस्कृतिक बाबातींत व सार्वजनिक कामामध्ये राजसत्तेच्या पाठिंब्यावर व गुंडगिरीच्या साधनांनी अन्याय करणें आम्हाला मान्य नव्हते. त्यांत कुठल्याहि धर्माचा द्वेश किंवा असूया मुळीच नव्हती. पण मुसलमान मात्र धर्मवेडे व इंग्रजी सत्तेच्य़ा चिथावणीने हस्तक बनून बेजबाबदारपणे वागत होते. त्यांना योग्य जाणीव व्हावी, म्हणून आम्ही या कार्यक्रमास सहमत होतो. पाठोपाठ भाद्रपद महिना होता. श्री गणपती उत्सवाची तयारी चोहोंकडे होऊ लागली.
सन १८९४ सालापासून लोकमान्य टिळकांनी श्री गणपतीउत्सव हे लोकजागृतीचे साधन बनविले होते. त्या परंपरेप्रमाणें धर्मवीर गणपतराव बटाणे यांचे शिवमंदिरांत सुरू केलेल्या श्री गणपतीउत्सवाला त्याचें चिरंजीव कै. शिवाजी बटाणे यांच्या सहकार्याने उत्सव अधिक लोक जागृतीयुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळींनी केला. श्री शिवछत्रपती मंडळ या नावाचे मंडळ सन १९२५ ला स्थापन करून या मंडळाचे विद्यमाने ‘छत्रपती मेळा’ काढला तसेच श्री शिवजयंती उत्सवहि साजरा करू लागलो. लोकमान्य टिळकांनी राजकीय जागृती करताच जे हे दोन उत्सव सुरू केले होते, ते उद्दीष्ट पुढे ठेवून आमच्या ‘श्री शिवछत्रपती’ मंडळानेहि हे कार्य सुरू केले. श्री गणेशोत्सवप्रसंगी ‘छत्रपती मेळा’ काढून लोकजागृती करणारी पद्ये लोकांना ऐकविली. मेळ्याचे पद्यकार श्री. ग. गो. सोमण, श्री. कवी बाळकृष्ण (श्री. बा. वा. घाटे), डॉ. वनपाळ व गोविंदराव देव वगैरे होते. दे. भ. ग. दा. सावरकर यांचे ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू । बंधु बंधु’ हे त्यावेळी महाराष्ट्रांत लोकप्रिय झालेले पद्य त्यांचेकडे पत्रव्यवहार करून छत्रपती मेळ्याचे पद्यावलीत समाविष्ट करून व ती गाण्यास सरकारी परवानगी मिळविली व मेळ्यांत मुलाकडून गावविली.
आमचे मेळ्यांत तुकाराम या नावांचा हरिजन मुलगा उत्तम गायक होता. श्री. यशवंतराव चव्हाण व श्री. शिवाजीराव बटाणे यांचाहि गाणा-या मुलांत समावेश असे. या मेळ्याचे कार्यक्रम खेडोपाडी केले जात असत. मेळ्याच्या सर्व खटाटोपाची जबाबदारी अशा रितीनें आम्ही पार पाडली.
धर्मवीर गणपतरावजी बटाणे
श्री गणेशोत्सव प्रसंगीच्या आगमनिर्गमनाच्या सवाद्य मिरवणुकीचा प्रश्न मिरवणूक मशिदीवरून सावाद्य जात असतां, तंटे, मारामा-या व दंगली करून मुसलमान समाजानें देशांत भांडणाचा उपद्रव सुरू केला होता. पण श्री. ज्ञानोबाशेट बटाणे यांनी न्यायकोर्टात आपला सवाद्य मिरवणूकीचा हक्क मिळविला होता. त्यानुसार सन १९२५ च्या श्री गणपती उत्सवांत श्रीची मिरवणूक अखंड वाद्ये वाजवीत नेहमीप्रमाणेंच नेणे आणणेची होती. तर ती मिरवणूक अडविण्याची भाषा मुसलमान करीत होते. सरकारी अधिकारी मुसलमानांचे पक्षपाती होते. तेव्हां शांतताभंगाचा बाऊ निर्माण करून हिंदूच्या कायदेशीर हक्कांत बदल व्हावा, म्हणून पोलिस अधिकारी सामदामाचे प्रयोग करीत होते. तेव्हा धर्मवीर गणपतराव बटाणे यांनी हिंदूंचा पुढाकार घेतला. भाडोत्री वाजंत्री भीतीनें वाद्ये वाजविण्यास आयत्यावेळी कचरतील म्हणून कराडचे सुप्रसिद्ध वाद्यपटु कै. चिलू सभू तेली व त्यांचे साथीदार कै. मारुती बाबाजी महाडीक व कृष्णा मैराळा पुरंदरे वगैरे यांच्या ताफ्यांत मीहि सामील होवून तात्पुरते वाद्य वाजविण्यास शिकलो. या ताफ्यांत व्यवसायी सखाराम घडशी, टेंभू यांनीही भाग घेण्याचे ठरविले.
या सर्व मंडळींनी व आम्ही श्री गणपतीची मिरवणूक मशिदीवरून सवाद्य नेण्याची प्रतिज्ञा धर्मवीर बटाणे यांच्या शिवमंदिरांत केली. मिरवणूकीचे नेतृत्व धर्मवीर गणपतराव बटाणे यांचेकडे आहे असे कळताच सरकारी बंदोबस्त शहरांत कडेकोट झाला. कोणता प्रसंग निर्माण होईल याच्या चिंतेत नागरीक होते. श्री गणपतीची मिरवणूक निघण्या आगोदर मुसलमान मंडळीहि मशीदीत जमावाने बसून राहिल्याचे लोक बोलू लागले. सरकारी आधिका-यांनी हिंदूवर अनेक बाजूंनी दडपणे आणली. पण हिंदूच्या वहिवाटीचा न्याय दरबारी मिळालेला न्यायहक्क सोडून देण्यास आम्ही तयार नव्हतो मिरवणूक मशिदीवरून अखंड वाद्ये वाजवीत धर्मवीर बटाणे यांचे नेतृत्वाखाली पार पडली. या घटनेचा केसरी पत्राने दे. भ. गणपतराव बटाणे यांचा ‘धर्मवीर’ म्हणून गौरव केला.