यासाठी स्वातंत्र्याच्या मार्गावर असणा-या भारताच्या राजशासनांत अधिकाराच्या जोरावर पूर्वी हजार वर्षांचे चाललेले राजकीय व धार्मिक आक्रमण पुढे चालूं ठेवता येईल अशी मुसलमान नेतृत्वाची मनीषा होती. हे आजच्या पाकिस्तानी वर्तनानीं सिद्ध होते. पण आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचे शुद्धीसंघटण आणि महात्मा गांधींचे अस्पृश्यता निवारण यांचे संघटनार्थ हिंदूनीं उघडलेल्या व्यायामशाळा, ही कामे मुस्लिमांना न आवडून मुसलमानांनी ती कुसपटाची व कुरापतीची साधने मानून हिंदूवर त्यानिमित्तानें अनेक ठिकाणी संधी साधून हल्ले सुरू कले. मशिदीपुढें वाद्ये वाजविणे, बकरीईदच्या सणांत गोवध करणे अशी उभयपक्षातील वैमनस्यांतील जुनी कारणे मागे पडू दिली नाहींत. शुद्धिसंघटण चळवळ बाटवाबाटवीच्या प्रतिकारासाठी व हिंदूचा एकोपा निर्माण करण्यासाठी आहेत आणि व्यायाम शाळा या शक्ति वाढविण्यासाठीं म्हणून हिंदूनीं हे उद्योग आपल्या विरुद्ध निर्माण केले असल्याची समजूत स्वार्थी मुसलमान पुढा-यांनी करू दिली होती. हिंदूना बाटविले असतांनां शुद्ध करून समाजांत परत घेण्याचा हक्क हिंदूना किंवा आर्यसमाजास नाहीं अशी मुसलमानांची धारणा होती. अस्पृश्यता निवारणाबद्दल असा प्रचार चालू होता की, हिंदूच्या संख्याधिक्याची फळी भक्कम करण्यासाठीं महात्मा गांधी झटत आहेत. या चळवळीमागे हिदूंचा मुस्लिमविरोधी राजकीय स्वार्थ आहे. तसेंच हिदूंना शुद्धिकरणाने हिंदूधर्मास मुकलेल्या हिंदूना पुनश्च स्वजातींत घेतल्यामुळे हिंदूना बाटविणे निष्प्रभ झाले होते. म्हणून मुसलमानामध्यें असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सन १९२३ च्या मे महिन्यात कलकत्त्यास भयंकर दंगा झाला. आणि बकरीईदाच्या सणांत दिल्लीस मोठा दंगा झाला. तसेंच गुलबर्गा शहरी मुसलमान दंगेखोरांनी हिंदूंच्या मंदिरावर हल्ले करून त्यातील मूर्ती फोडल्या. त्याची झळ कराडासहि लागली. हिंदूत असंतोष निर्माण झाला. पण दंगाधोपा हिंदूंच्या संयमानें झाला नाहीं. परंतु सशस्त्र ब्रिटिश सत्त्येच्या आत्याचारी अहिंदू समाजास ब्रिटिशांच्या भेदनितीचा भरपूर पाठींबा होता. इंग्रजी राज्य हिंदुस्थानांत वाढू लागले तेव्हांपासून मुसलमान इंग्रजांना जवळचे वाटत होते. राजकीय सत्तेची व हक्काची मागणी करण्यांत हिंदूंचा विषेश पुढाकार आहे, हे पाहून मुसलमानांना खास वशिल्याची लालूच दाखवून त्यांना भारतीय राजसत्तेच्या चळवळीपासून अलग करण्याचा उद्योग ब्रिटिश राजसत्तेनें आरंभिला. जे हिंदू मुसलमान दंगे झाले ते इंग्रजांच्या या धोरणाचा परिपाक होता.
इंग्रजांची फोडा झोडा निती
इंग्रजी राजसत्तेनें मुसलमानांना हाताशी धरून हिंदूविरुद्ध उभे केले. सरकारनें मुसलमानांना शेफारून ठेवल्याची चीड आमच्या गांवांत जनतेंत होतीच. आम्हीं हिंदुमहासभेचे सभासद नव्हतो. दे. भ. आप्पासाहेब आळतेकर यांचे नेतृत्वाने व धर्मवीर बटाणे यांच्या सहवासांत असल्यानें आमचा कल काँग्रेसकडेच होता. त्यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी दे. भ. भाऊसाहेब सोमण वकील सातारा यांच्या मार्गदर्शनानेंच चाले. त्यावेळी तालुका व शहर काँग्रेस कमिट्या अस्तित्वात नव्हत्या. अशावेळी कराड तालुक्यांतून सातारा जिल्हा काँग्रेसमार्फत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर दे. भ. पांडुआण्णा शिराळकर, दे. भ. आप्पासाहेब अळतेकर, दे. भ. बाबुराव गोखले, दे. भ. धर्मवीर बटाणे व हरीभाऊ लाड अशी पांच मंडळी होती. संपूर्ण हातसूत व हातमाग खादी वापरणें वगैरे काँग्रेसची बंधने आम्ही पाळत असू. ते साल १९२४ होते. इंग्रज सरकारचे धोरणामुळे काँग्रेस व हिंदुमहासभा यांचे कार्यक्रम जवळ जवळ एकच स्वरुपाचे व एकाच धोरणाचे असत.
सन १९२५ सालच्या श्रावण महिन्यांत नेहमीप्रमाणे ह. भ. प. मारुतीबुबांचे श्री विठ्ठल मंदिरांत गोकुळअष्टमीचा उत्सव चालू होता. सालाबादप्रमाणे देहूकरांची दिंडी टाळमृदंगाच्या घोषात हरीनामाचा गजर करीत, वाद्ये बंद न करतां दरसालप्रमाणें येणार होती. पण यावेळीं स्थानिक मुसलमानांनी दिंडीस मशिदीवरून सवाद्य जाणेस मनाई करणेचे ठरविले. हिंदूनींहि धर्मवीर बटाणे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकाराची तयारी केली व मशिदीवरून अखंड टाळ, मृदंग, वीणा वाजवीत श्री विठ्ठलनामाच्या जयघोषांत दिंडीची मिरवणूक निर्विघ्न नेली.