पूर्वेकडील जपानचे युद्ध जसे आक्रमक स्वरूप धारण करू लागले, तसे त्यांच्या चिंतनाला दुसरे वळण लागले; असे दिसते. एका मौनाच्या सोमवारी ते आपल्या चिंतनात असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, की मोठे जनआंदोलन करून ब्रिटिशांना या देशातून बाहेर जाण्याचे आवाहन केले पाहिजे. त्यांनी हा आपला विचार आपल्या एका इंग्रजी मित्राला कळविला होता. क्रिप्स मिशन नंतर प्रसिद्ध झालेले. १९४२ च्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील 'हरिजन' मधले त्यांचे लेख मी वाचत होतो. तेव्हा त्यांच्या विचारात झालेला हा महत्त्वाचा बदल माझ्या लक्षात आला. तसा तो कोणाच्याही लक्षात आला असता, इतका स्पष्ट होता. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे लेख अधिक तीव्र, अधिक स्पष्ट, अधिक जहाल होत गेले. ते स्पष्ट शब्दांमध्ये, ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानमधून आपल्या मनाने निघून जाण्याची हीच वेळ आहे, असा खडखडीत इशारा देऊ लागले.
गांधीजींचे हे विचार जसजसे प्रसिद्ध होत होते, तसतसे देशातील राजकीय हवामान गरम होत होते आणि जनआंदोलन होणार, असे जे माझे निदान होते, तेही खरे होणार, अशी मला खात्री वाटू लागली. त्यावेळी जर जनआंदोलन झाले नाही, तर हिंदुस्थानपुढे आलेली अत्यंत उत्कृष्ट संधी हिंदुस्थान गमावणार आहे, अशा तऱ्हेची भावना मी आणि माझ्या भोवतालचे कार्यकर्ते यांचीही झाली होती.
त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या विचारविनिमयाकडे आमचे लक्ष वेधले आणि यातून निश्चित निर्णय केव्हा येतो, याकडे आमचे लक्ष लागून राहिले.
१९४२ सालच्या एप्रिल महिन्याच्या शेवटी अलाहाबाद येथे वर्किंग कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांची बैठक झाली. इतिहास घडविणारा तो काळ होता. जगाच्या भविष्याला कलाटणी देणा-या या युद्धाच्या अत्यंत कठीण समयी हिंदुस्थानचे नेते देशाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी बसले होते. प्रामाणिक वैचारिक देवाणघेवाण आणि संघर्षाची पर्वा न करता आपली मते स्पष्टपणे एकमेकांना सांगण्याचा विक्रम येथे घडला.
या दृष्टीने अलाहाबादच्या या बैठका ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत. यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये वेगवेगळे विचार आहेत, याची स्पष्ट कल्पना आम्हां लोकांना आली. गांधीजींनी आपले विचार एका ठरावाच्या मसुद्याच्या रूपाने पाठवून दिले होते. त्यामधील महत्त्वाचा भाग असा होता, की आता ब्रिटिश सत्तेने हिंदुस्तानमधून ताबडतोब निघून जावे आणि आमच्यावर आक्रमण करणारी जपानसारखी दुसरी सत्ता असली, तरी त्याबद्दल काय करावयाचे, ते आमचे आम्ही पाहून घेऊ. अशा तऱ्हेची भूमिका त्या ठरावामध्ये होती.
पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वातंत्र्याची हमी हवी होती. तातडीने सत्तांतरही हवे होते. परंतु ताबडतोब ब्रिटिशांनी युद्धकाळात हिंदुस्थानातून निघून जावे, असे म्हणण्यामध्ये त्यांच्या मनात काही वैचारिक विकल्प होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून ताबडतोब निघून जावे, हे सुचविण्यामुळे फॅसिस्ट जपानशी हिंदुस्थान काही तडजोड तर करू इच्छित नाही ना, अशी कुशंका लोकशाहीवादी राष्ट्रांत व जगतात निर्माण होऊ नये, याची चिंता नेहरुजींना होती.
काँग्रेस पक्षाने जागतिक फॅसिझमविरुद्ध अत्यंत स्पष्ट भूमिका अनेक वर्षे घेतली होती व या परंपरेचा काँग्रेसला अभिमान होता. या परिस्थितीत याच्याशी विसंगत असे काही घडू नये, असा त्यांचा आग्रह होता. विशेषत: हिंदुस्थानचे नेते जपानशी समेट करायला तयार आहेत, अशा तऱ्हेचा गैरसमज पश्चिमेकडील देशांत झाला, तर ते इष्ट नव्हे, ही पंडित जवाहरलाल नेहरूंची भावना होती. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकीय परिस्थितीवरचा आपला वेगळा ठराव वर्किंग कमिटीपुढे ठेवला.
हा ठराव त्यांनी प्रथम पाठविला नव्हता. त्यांनी फक्त आपले विचार वर्किंग कमिटीपुढे मांडले होते. तेव्हा मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी नेहरूंना सुचविले, की तुमचे जे विचार आहेत, ते तुम्ही ठरावाचा मसुदा म्हणून पाठवा. त्यामुळे हा ठराव पंडितजींच्याकडून आला होता.
वर्किंग कमिटीमध्ये जेव्हा चर्चा झाली, तेव्हा पंडितजींच्या ठरावाच्या पाठीमागे बहुमत नव्हते, असे दिसून आले आणि आता काँग्रेस नेतृत्वात फूट पडणार, अशी सर्वांची भावना झाली. परंतु मौलाना आझाद यांनी आपल्या कौशल्याने ही फूट टाळली.