माझे स्वत:चे असे निदान होते, की आम्ही ही जी स्थानिक स्वराज्य संस्था हातांत ठेवतो आहोत, याचा केव्हा ना केव्हा तरी राष्ट्रीय चळवळीला उपयोग होईल. गेली दोन-तीन वर्षे माझ्या मनात जी अस्वस्थता आहे, असे मला सारखे वाटत होते, त्याचे कारण माझे मन मला सांगत होते, की दिवसेंदिवस देशाचे राजकारण अपरिहार्यपणे एका मोठ्या जनआंदोलनाच्या दिशेने चालले आहे, आणि त्यामुळे नवी तरुण माणसे जोडणे, जनमानसातील आमच्या कामाचा पाया अधिक खोल व मजबूत होईल, याचा प्रयत्न करणे, यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या संस्थांशी आपला संबंध प्रस्थापित करणे हे आपले तातडीचे काम आहे.
१९४१ सालच्या जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीत जी नवी माणसे माझे निकटचे साथी झाले, त्यांत श्री. यशवंतराव पार्लेकर यांचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आजपर्यंतच्या माझ्या सर्व कार्यांत तेव्हापासून ते माझ्या बरोबर एकसारखे आहेत. १९४२ सालच्या संग्रामात त्यांचे अनमोल सहकार्य मला मिळाले होते. यापूर्वीही-विशेषत: कॉलेजच्या दिवसांत जे संबंध वाढविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाठीमागेसुद्धा सर्व मित्रांची ही एक शक्ती मला कामाला प्रवृत्त करीत होती. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागांतल्या कार्यकर्त्यांशी वाढते घनिष्ट संबंध आले आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात माझे एक व्यक्तिमत्त्व आहे आणि ते स्वीकारण्यासारखे आहे, अशी माझी प्रतिमा तयार झाली. राजकीयदृष्ट्या पुढील आयुष्यात जे काम करावयाचे होते, त्याची एक तऱ्हेने तयारी आणि शिक्षण मिळत होते आणि पाया घातला जात होता, असे म्हटले, तरी चालेल.
या निवडणुकीनंतर श्री. आनंदराव चव्हाण यांची आणि माझी काही भेट झाली नाही. कारण ते माझ्यावर किंचितसे रागावले होते. त्यानंतर थोड्याच महिन्यांनी ते इंदूर संस्थानमध्ये महत्त्वाच्या जागी काम करण्याकरता, सरकारी नोकरीत रुजू होण्याकरता म्हणून गेले आणि त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षे ते तिकडेच राहिले. परंतु सातारा जिल्ह्यात जेव्हा ते परत आले, तेव्हा संस्थाने विलीन झाली होती आणि १९५२ सालच्या निवडणुकीची तयारी चालू होती. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातले राजकारण कसा आकार घेत होते, त्याची ही पार्श्वभूमी आहे.
सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचे शिष्टमंडळ काही राजकीय सुधारणेच्या योजना घेऊन आले होते, हे खरे आहे. त्या योजनेचे स्वरूप काही तात्पुरते आणि काही लांब मुदतीचे, असे दुहेरी होते. लांब मुदतीच्या गोष्टीसंबंधाने फारसा कोणी गंभीरपणे विचार करीत नव्हते. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रमुख पक्ष तातडीने कोणत्या प्रकारचे सत्तांतर होणार, या एकाच कसोटीवर सर्व योजनांची परीक्षा करीत होते. त्याचप्रमाणे क्रिप्स मिशनच्या योजनांचेही झाले. गांधीजींसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते क्रिप्स यांच्याशी बोलून आले. त्याचप्रमाणे बॅरिस्टर जीना, डॉक्टर आंबेडकर, हिंदूमहासभेचे पुढारी हेही सर्व पुढारी आपापल्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी चर्चा करून आले. प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे होते, कसोट्या वेगवेगळ्या होत्या. त्या योजनांमध्ये युद्धकाळामध्ये सत्तेचा महत्त्वाचा भाग हा भारतीय प्रतिनिधींना देण्याचा प्रामाणिक हेतूच नसल्यामुळे त्या योजना कोणीच स्वीकारल्या नाहीत. आपापल्या कारणासाठी प्रत्येकाने त्या योजनेचा त्याग केला. याला अपवाद म्हणजे फक्त एम्. एन्. रॉय होते. अपेक्षेप्रमाणे सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स जसे आले, तसे गेले. तसे ते अपयश पदरात घेऊन गेले. परंतु हे अपयश सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचे वैयक्तिक होते, असे मी म्हणणार नाही. हे अपयश ब्रिटिश सत्तेचे होते. प्रधान मंत्री चर्चिल यांचे होते. युद्धाने जरी उलटी दिशा घेतली असली, तरी सत्तांतर करण्याचा त्यांचा सुतराम् हेतू नव्हता. याचा परिणाम जो व्हायचा, तोच झाला. देशामध्ये असंतोष वाढू लागला आणि वाढत्या युद्धाच्या परिणामाबद्दल चिंता फक्त पुढाऱ्यांच्याच मनात राहिली नाही, तर ती जनतेच्या मनातसुद्धा निर्माण झाली.
याच सुमाराला महात्मा गांधींच्या विचारामध्ये फार महत्त्वाचा फरक पडला. क्रिप्स यांना चर्चेच्या प्राथमिक अवस्थेत ते भेटल्यानंतर पुन्हा ते क्रिप्सना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांची खात्री झाली होती, की ब्रिटिशांना काही करावयाचे नाही आहे. गांधीजींनी आतापर्यंत प्रतीकात्मक सत्याग्रह, प्रातिनिधिक सत्याग्रह, या तऱ्हेचे मार्ग शोधून जनआंदोलन टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या मनामध्ये विलक्षण खळबळ होती.