''तीन दिवसांपूर्वी मामा कराडला मुक्कामाला होते. त्यांना वडूजच्या मोर्चासाठी जायचं होतं. कराड रेल्वेस्टेशनवर पोलिसांचा कडक पहारा होता. मामांनी मला बोलावून घेतलं आणि आणि माझी जाण्याची व्यवस्था कर म्हणाले. मी आणि मामांनी रात्री एकमेकानं विरुद्ध दिशेनं रेल्वे डब्यात जाऊन बसायचं ठरविलं. मी रेल्वेच्या फलाटावरून डब्यात शिरलो व मामा फलाटाच्या विरुद्ध दिशेनं डब्यात चढले. सरळ बाकड्याच्या खाली जाऊन झोपले. मी मात्र पाळत ठेवत बसून राहिलो. रहमतपूर स्टेशन येताच गाडीतून उतरलो. तांबडं फटलं नव्हतं. पोलिसांचा कडक पहारा. मामांनी धाडस करून रेनकोट झटकला आणि पोलिस जिथे उभे होते तिथे अंथरला. मी आणि मामानं झोपेचं सोंग केलं. तोपर्यंत पूर्वेला फटफटलं होतं. पोलिसांची नजर चुकवून आम्ही रेल्वेस्टेशनबाहेर पडलो. पोलिसांना वाटलं खेड्यातले प्रवासी असतील. उजाडल्यानंतर उठून जातील निघून आपल्या गावी. झालंही तसंच. मामी, या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोन जणांचा बळी गेला.''
बाबुराव कोतवालांच्या अंगात भूमिगत चळवळ संचारली होती. देहभान विसरून स्वतःला चळवळीत झोकून दिलं. मधूनच तीन-चार दिवस गायब तर एखाद्या रात्री-अपरात्री दत्त म्हणून हजर होत. कधीकधी त्यांच्याकडूनच साहेब कराडला येऊन गेल्याचं कळत असे. सरकारी कचेर्या, रेल्वेस्टेशन, तार ऑफिस इत्यादी सरकारी कार्यालयांवर हल्ले होऊ लागले. कराड येथील धाडसी क्रांतिवीर माधवराव जाधव यांनी एके दिवशी भरदुपारी कराडचे पोस्ट ऑफिस लुटले. त्यांच्या धाडसाचं कौतुक संपूर्ण कराड शहर करू लागलं. हे शूरवीर चुकून पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांना कराडच्या जेलमध्ये बंदिस्त करण्यात आलं. एके दिवशी कराडचा जेल फोडून ते बाहेर पडले. या आणि अशा चित्तथरारक घटना आमच्या कानावर येत. अंगाचा थरकाप उडायचा. न जाणो, साहेब अशा वेळी अडकले तर ?
आज बाबुराव कोतवाल घरी आले ते थोडे चिंताग्रस्त अवस्थेत. त्यांना खोदून खोदून विचारले तरी गडी काही बोलावयास तयार होईना. फक्त मला म्हणाले,
''मामी, मी तीन-चार दिवस बाहेरगावी जाऊन येतो. परत आल्यानंतर तुमच्याशी बोलेन.''
एवढं बोलून डोळ्याचं पातं लवतं न लवतं महाशय घरातून गायब ! या आठवड्यात साहेबांचा काही ठावठिकाणा कळला नाही. आई मात्र चव्हाण घराण्याच्या घाण्याला जुंपल्यासारखी कार्यात मग्न. आम्हाला कधीकधी त्यांचा हेवा वाटायचा. घरावर एवढी संकटं घोंगावताहेत तरी आई न डगमगता त्या संकटांशी दोन हात करावयास सज्ज ! दुपारची वेळ टळून गेलेली. आम्ही तिघी जावा दळणकांडण करण्यात गुंतलेलो. तोच बाबुराव कोतवाज विजयी वीरासारखे आमच्यासमोर उभे.
म्हणाले, ''मामी, तुम्ही विचारण्यापूर्वी मीच तुम्हाला एक घटना सांगतो. सदाशिवराव पेंढारकरांचा मला गुप्त संदेश मिळाला. मी त्याठिकाणी पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर मला कळलं, रात्री मामा येथे मुक्कामाला होते. त्यांनी तिथे बैठक घेतली. त्या बैठकीत निवडक तरुणांना घेऊन पेंढारकरांनी शिरवडे रेल्वेस्टेशन जाळायचं ठरलं. बैठक संपवून साहेब पुढच्या मुक्कामी गेले. मी व कुंडलच्या रामूमामा पवारांनी एका बाजूने रेल्वेस्टेशनवर हल्ला करायचा व दुसर्या बाजूनं पेंढारकरांनी. ते सावध होण्यापूर्वीच आमच्या सहकार्यांनी त्यांच्या बंदुका पळविल्या. एक बंदूक रामूमामा पवारांच्या हाती लागली. अंधारात रामू पवार कुठल्या दिशेनं पळाले आम्हाला कळलं नाही. मी पहाटे कराडला येऊन पोहोचलो. थोडा वेळ आराम केला आणि प्रथम तुम्हाला भेटतोय. आता इकडे निघण्यापूर्वी मला कळलं, रामूमामा पवार रस्ता चुकून रात्री ओगलेवाडीला पोहोचले. मामांची आणि रामू पवारांची भेट ओगलेवाडीला झाली.''