थोरले साहेब - ४७

''आम्हाला फॅसिझमच्या विरोधात लढायचे आहे; परंतु ब्रिटिशांचे गुलाम म्हणून आम्ही लढू इच्छित नाहीत.  फॅसिझमचा पराभव करण्यासाठी भाग घ्यायची इच्छा आहे; परंतु स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून.'' नेहरू. ''करू या मरू'' महात्मा गांधींचा निर्धार.

''आम्ही सर्वांनी एकमतानं हा ठराव घेतला आहे.'' सरदार पटेल.

''हा ठराव म्हणजे आमच्या एकजुटीचा आत्मा आहे.'' मौलाना आझाद.

हा क्रांतीचा मंत्र घेऊन कार्यकर्ते आपापल्या गावाकडे परतू लागले.  सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक ज्याठिकाणी आम्ही उतरलो होतो तिथे घेतली.  अधिवेशनाला मिळून आलो; पण जाताना वेगवेगळ्या मार्गांनी परतायचा निर्णय घेतला.  मी मात्र एक दिवस थांबून प्रांतीय नेत्यांच्या भेटी घेण्याचं ठरविलं.  कुणाचीही भेट झाली नाही.  सर्व नेतेमंडळी भूमिगत झालेली.  सर्वांना भूमिगत होण्यासंबंधी सूचना दिल्या.  मलाही भूमिगत राहून सावधपणे हालचाली कराव्या लागतील.... अशा तर्‍हेनं माझं भूमिगत आयुष्य सुरू झालं.  

माझ्या कानावर असं आलंय - बाबुरावांनी शाळा सोडुन युवक मंडळाची स्थापना करून स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतलीय.  घेतली असेल तर त्याला अडवू नका.  त्याचा निर्णय त्याला घेऊ द्या.  माझी खबरबात बाबुरावाकडून तुम्हाला कळेलच.

माझ्या या स्वातंत्र्याच्या संग्रामात तुझ्या भविष्यातील स्वप्नांची आहुती तुला द्यावी लागणार आहे.  मनाची तयारी कर.  दोन्ही दादांना व आईला सावरण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.

तुझा
यशवंतराव

१० ऑगस्टला साहेबांनी मुंबई सोडली.  सकाळी पुण्याला पोहोचले.  येथेही मुंबईसारखंच वातावरण दिसून आलं.  लगेच रेल्वेनं कराडकडे निघाले.  चोहीकडे पोलिकांची दडपशाही अवतरलेली.  'भारत छोडो'चा परिणाम ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला.  सावधगिरी म्हणून कराडऐवजी शिरवडे रेल्वेस्टेशनला उतरले.  मसूरला जावं असं साहेबांनी ठरवलं; पण तिथेही पोलिसांनी धरपकड केल्याचं कळलं.  वाट वाकडी करून हातात बॅग घेऊन साहेब इंदोलीच्या दिशेने निघाले.  इंदोलीला दिनकरराव निकमला निरोप पाठविला.  दिनकरराव व साहेब गावाजवळील एका शेतात भेटले.  पुढील कार्याची दिशा निश्चित करून साहेब कराडकडे निघाले.  चार-पाच दिवस रेल्वे, पायी, मोटारसायकल, सायकलचा प्रवास करून थकलेल्या अवस्थेत साहेब कराडला पोहोचले.  कराडचे त्यांचे विश्वासू मित्र नारायणराव घाडगे यांच्याकडे मुक्काम केला.  कराडमधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं.  किसन वीरांना भेटण्यासाठी साहेब कवठ्यास जावयास निघाले.  मिळेल त्या साधनांनी प्रवास करून साहेब कवठ्यास पोहोचले.  रात्री जंगी सभा झाली.  पाऊण तास साहेब सभेत बोलले.  पोलिस पकडावयास येतील या शंकेने आबांनी साहेबांची गावाबाहेर शेतात राहण्याची व्यवस्था केली.  तेथील बैठक संपवून साहेब कराडच्या २४ ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीला लागले.  तरुण सेनेचं नेतृत्व महादेव जाधव यांनी स्वीकारलं.  बाळासाहेब उंडाळकरांना या मोर्चात अटक झाली.  निधड्या छातीचे खेळाडू महादेव जाधव हे माधवराव जाधव म्हणून उदयास आलेलं तरुण नेतृत्व या मोर्चाचं फलित.