४ मे १९७५
माँटेगोबे (जमेका)
..... पुढल्या वर्षी ३० वर्षे होतील, मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो.... सत्तेची अनेक स्थानं पाहिली. राज्यात आणि केंद्रात सामान्य अर्थाने कुणालाही हेवा वाटावा अशी !.... मीही अशा स्थानाची महत्त्वाकांक्षा धरली होती हे म्हणणे खरे नाही किंवा त्यासाठी कुणाच्या पाठीमागे लाचारीने लागलो असेही नाही; परंतु जेव्हा जबाबदारी आली तेव्हा मागे फिरून पाहिले नाही... टीकाकार स्वाभाविकच सत्तेच्या पाठीमागे लागले आहेत वगैरे म्हणणार याची मला कल्पना आहे.... पण योजून एखादी सत्तेची जागा हस्तगत करायची असे मी कधीच केले नाही.... जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा माझा प्रयत्न राहिला. नव्या विचारांना सामोरा गेलो. मुख्यतः दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी धारणा प्रथमपासूनच होती... जे आपल्यासाठी कोणी केले नाही ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते केले तर अधिक फलदायी होते. म्हणूनच अधिक मित्रभावाने, हळुवारपणे पण विचाराच्या दिशा कायम ठेवून मी माणसे वागविली आणि वाढविली... पण आज मी जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होते.... खरी जिव्हाळ्याची माणसे अवतीभोवती होती का ? काही काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते... खरे म्हणजे दुःख होते.... मी काही राजकारण संन्यास घेण्याचा विचार करीत नाही. विचार येतो निवडणुकांचा आणि सत्तास्थानाचा.... जे आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचान न करता अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत. असल्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सामील न होता किंवा त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले तर बरे नाही का ? असा प्रश्न मनात घोळतो आहे... श्रीमतीजी अजून महत्त्वाच्या कामात सल्लामसलत घेतात; पण सत्तेच्या वर्तुळात बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात असा अनुभव आहे.... असे अपमानित राहण्याने ज्यांचा मी प्रतिनिधी आहे असे मानतो त्यांचा अपमान तर होत नाही ना, अशी बोचणी असते.... तडजोडीने वागले पाहिजे असा विचार करून मग काम चालू राहते.... खर्या अर्थानं काम चालू आहे का ? की एका व्यक्तीचा अहंकार सुखविण्यासाठी हे सर्व चालू आहे... काँग्रेस पक्ष हे मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे ? काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का ? सत्ता मिळवून ते ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.... १९६९ मध्ये मी त्यांच्याविरुद्ध मत दिले ते त्यांना सत्तेवरून काढण्यासाठी, हे माझ्याबातीत तरी खरे नाही. मी त्यांचे मत एकसारखे विचारले होते. त्यांचे मत बनत नव्हते. हे करू की ते करू अशी चंचलता होती. शेवटी मी जे ठरवीन ते इतरांनी मानावे अशी त्यांची रीत होती... फेअर वागणे म्हणतात तसे गेली सहा वर्षे त्यांनी माझ्याशी व्यक्तिशः वर्तन केले... संसारातले प्रश्न कधीच संपत नाहीत. माझे मन पूर्वीही त्यात नव्हते, आजही नाही. प्रश्न आहे तुझा आणि माझा. तू धैर्यानं साथीला मनापासून असली म्हणजे मला कशाची पर्वा नाही. आयुष्याची शेवटची जी काही वर्षे आता राहिली आहेत ती तेजोभं करून घेऊन काढण्यात अर्थ नाही.''
भारतीय राजकारणात ज्या घडामोडी सहा-सात वर्षांपासून घडताहेत त्याचा साहेबांच्या राजकीय जीवनावर होणारा परिणाम व राजकारणात त्यांची चोहोबाजूंनी केलेली कोंडी या पत्रात साहेबांनी व्यक्त केली.
इंदिराजींच्या दिव्य वलयांकित लोकप्रियतेला उतरती कळा लागली. बेगडी समाजवाद, फसवी 'गरिबी हटाव' वल्गना आणि प्रांताप्रांतांमध्ये असामाजिक विचाराच्या व्यक्तींना राजाश्रय मिळाल्यानं बेभरवशाचं. गोंधळाचं, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण उत्तर भारतामध्ये बेदिलीचं वातावरण निर्माण झालं. राजकीय नेतृत्व करण्याची कुवत नसणार्यांना नेतृत्व करण्याची संधी येऊ लागली. वलयांकित व्यक्तीला कुणी विरोध केलेला खपत नसतो. त्याची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू होते. तसंच काहीसं वातावरण काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालं. पक्षातील सामुदायिक नेतृत्वाच्या विचाराला गौण स्थान प्राप्त झालं.