इंदिराजींनी आपलं नवीन मंत्रिमंडळ जाहीर केलं. त्यात साहेबांकडं अर्थखातं ठेवण्यात आलं. अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर २४ राष्ट्रांनी स्थापन केलेल्या गटासमोर २४ सप्टेंबर ७२ ला साहेबांनी आपले विचार व्यक्त केले. २० प्रतिनिधींच्या चलनविषयक व्यवहाराच्या बदलासंदर्भात २३ मार्च १९७३ ला मार्गदर्शन केलं. लोकसभेसमोर ६ एप्रिल १९७३ ला विकसनशील राष्ट्रांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी भारतानं जी भूमिका स्वीकारली तिचं विस्तृत विवेचन केलं.
इंदिराजी प्रसिद्धीच्या झोतानं झपाटलेल्या. कर्तृत्वाचा अहंकार जागा झालेला. व्यक्तिस्तोमाच्या तटबंदीत अडकलेल्या. दिव्य वलय लाभलेल्या नेत्या. 'ठरवील ती पूर्व दिशा' ही मनाची झालेली भावना. यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भीती. प्रस्थापित राजकारण्याच्या आधाराला धक्का पोहोचवून उपद्रवमूल्य असणार्यांना पाठबळ देण्याच्या विचारानं कार्यरत झालेल्या. प्रांताप्रांतात जनाधार नसलेल्यांना राजसत्तेच्या पायघड्यां घालून सत्तेत विराजमान करताहेत. दिल्लीत अनिश्चिततेचं वातावरण. वावड्यांना ऊत आलेला. १ वर्षापासून मंत्रिमंडळाच्या बदलाविषयीच्या कंड्या पिकविण्यात काही मंडळी मश्गुल झालेली. साहेबांनी आपला परदेश दौरा आखलेला. साहेबांचा हा दौरा २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर ७४ असा ठरलेला. ओटावा आणि वॉशिंग्टनच्या दौर्यावर निघण्यापूर्वी साहेबांनी इंदिराजींची भेट घेतली. मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची पुसटशी कल्पना साहेबांना आली. इंदिराजींना भेटून साहेब आपल्या पूर्वनियोजित दौर्यावर निघून गेले.
८ ऑक्टोबरला साहेब दिल्लीला पोहोचले. विमानतळावरच त्यांना आज मंत्रिमंडळाची बैठक असल्याचं कळलं. साहेबांनी थोडा वेळ आराम केला. ठरलेल्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचले. इंदिराजींनी दौर्याविषयी विचारलं.
''कसा काय झाला दौरा ?'' इंदिराजी.
''चांगला झाला.'' साहेब.
''केव्हा आलात ?'' इंदिराजी.
''ठरल्याप्रमाणे आज सकाळी आलो.'' साहेब.
इंदिराजींनी साहेबांकडे पाहून स्मितहास्य केलं.
गंजूच्या दोन मुलींच्या लग्नाचं रिसेप्शन आजच त्यांनी ठेवलेलं. साहेबांना त्यांनी ७ वाजता येऊन जाण्याबद्दल विनवणी केलेली. इंदिराजी ७.३० वाजेनंतर येणार असल्याचं गंजूकडून साहेबांना कळलं. साहेब अगोदर येऊन जाण्यानं त्यांना सोयीस्कर होतं. साहेब ठीक ७ वाजा रिसेप्शनस्थळी पोहोचले. साहेबांपाठोपाठ ५ मिनिटांनी इंदिराजी तिथं पोहोचल्या.
साहेबांना पाहून इंदिराजी म्हणाल्या, ''इथंच बाजूला उभं राहू बोलूया का ?''
''काही हरकत नाही.'' साहेब.