या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नेहरू म्हणाले, ''पटनाईक यांनी अमेरिकेत वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीमुळे देशातील जनतेच्या मनाला ठेच पोहोचली आहे व मनात गोंधळही निर्माण झाला आहे. मीही दुःखी व आश्चर्यचकित झालो. आपल्या संरक्षणमंत्र्याविषयी जे काही वक्तव्य छापून आलं त्याबद्दल मला अतिव यातना झाल्या आहेत. मी दुःखी आहे. पटनाईक कालच मला भेटले. वर्तमानपत्रातील मुलाखतीबद्दल मी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'वार्ता अहवालामुळे मलाही धक्का बसला. वर्तमानपत्रात चुकीचे वार्तांकन झाले आहे. चव्हाण माझे चांगलं मित्र आहेत. त्यांच्याएवढेच दुःख मलाही झाले आहे.' ''
लोकसभेत नेहरूजी एकप्रकारे पटनाईक यांची पाठराखण करीत होते. पटनाईक यांनी चव्हाण यांची भेट घेतली आहे... त्यांचा चव्हाणांना दुखविण्याचा उद्देश नव्हता... या सर्व स्पष्टीकरणाने खासदार हेमबरुआ, एच. व्ही. कामत, प्रकाशवीर शास्त्री, कपूरसिंग यांचे समाधान झाले नाही. नेहरूजींच्या खुलाशाने सभासद शांत झाले नाहीत. भारतीय संसदेला जी माहिती नाही ती पटनाईक बाहेर खुलेआम त्याची वाच्यता करीत आहेत. आमच्या लष्करी सामर्थ्याची कल्पना विदेशात दिली जाते आणि संसदेला दिली जात नाही... नेहरूजी पटनाईक यांच्या अविवेकी वक्तव्यावर पांघरूण घालीत आहेत.
सभापती सरदार हुकूमसिंग या प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना म्हणाले, ''अमेरिकेत पटनाईक यांनी जे सांगितले ते संसदेच्या सभागृहात उघड केले नसल्याने ही गोष्ट लाजिरवाणी आहे.''
सभापतींच्या या टोल्यानं काँग्रेस व विरोधी सदस्यांनी बाकडे वाजवून सभापतींचं अभिनंदन केलं.
या सर्व गदारोळातून एक निष्पन्न झालं की, पटनाईक हे उघडे पडले. त्याचसोबत साहेबांच्या भवितव्याबद्दल जो संशयाचा अंधार दाटून आला होता तो दूर झाला. या सर्व मानसिक त्रासातून सावरण्यासाठी साहेबांना बराच काळ जावा लागला.
संरक्षण खात्याची विस्कटलेली घडी सावरण्याच्या कामाला साहेबांनी हात घातला. खोलात गेल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी साहेबांच्या निदर्शनास आल्या. ८०० कोटींपैकी ६०० कोटी रुपयेच विकासकामाच्या खर्ची पडले. सरहद्दीवरील सैनिकांना ज्या सुविधा पुरवायला पाहिजे होत्या त्या कागदावरच आढळून आल्या. बर्फाच्या मार्यात थंडीत सैनिक जीवाला मुकताहेत. सैनिकांत कमालीची बेदिली... या आणि अशा अनेक गोष्टी साहेबांच्या निदर्शनास आल्या. साहेबांनी संरक्षण मंत्रालयाची ५ हजार कोटी रुपये खर्चाची एक पंचवार्षिक योजना आखली. २३ मार्च १९६४ ला साहेबांनी ही योजना लोकसभेसमोर ठेवली. ज्या आत्मविश्वासानं साहेबांनी संरक्षणमंत्रीपद स्वीकारलं तो आत्मविश्वास साहेबांच्या दैनंदिन वागणुकीतून आढळत नव्हता.
या मनःस्थितीत साहेबांना लष्करी सेनानींसमोर भाषण करावयाचं होतं. खचलेल्या मनानं त्यांच्यासमोर जावं किंवा नाही याचा विचार साहेब करू लागले. न जावं तर आपलं संरक्षणमंत्रीपद नामधारी आहे याला पुष्टी मिळेल. साहेबांनी या द्विधा मनःस्थितीत लष्करप्रमुखासमोर आपले विचार व्यक्त केले. आपल्या दिनचर्येवर या सर्व घटनांचा कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी साहेबांनी घेतली. नेहरूजींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पटनाईक यांची लुडबूड कमी होईल असं साहेबांना वाटलं होतं; पण प्रत्यक्षात मात्र पटनाईकांच्या वागणुकीत फरक जाणवत नव्हता.