टी.टी.के. म्हणाले, ''मला पत्नी नाही; पण माझ्या एकुलत्या एक मुलाची शपथ घेऊन सांगतो.... तुम्हाला अडचणीत टाकण्याचा माझा कुठलाच हेतू नाही. उलट माझा राग नेहरूजींवर आहे. त्यांनी मला शब्द दिला होता - युद्धसामुग्री निर्मिती खातं माझ्याकडे सोपवितो म्हणून. पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. माझ्या पत्रात मी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे हे खरं आहे.''
टी.टी.के.च्या भावनात्मक बोलण्याला साहेब बळी न पडता त्यांना साहेबांनी स्पष्टच बजावले.
म्हणाले, ''देशहिताच्या आणि संरक्षणमंत्र्यांच्या यशस्वितेकरिता लष्कर साहित्यनिर्मिती खाते संरक्षणमंत्र्यांकडेच असले पाहिजे. हे मी संरक्षणमंत्री आहे म्हणून सांगतो असे नाही. उद्या मी संरक्षणमंत्री असेल किंवा नसेल. माझं म्हणणं आपल्याला मान्य असेल तर ठीक, नाही तर मी संरक्षणमंत्रीपदी राहावयाचं किंवा नाही ठरवीन. यातून आपल्याला काही मार्ग सुचवायचा असेल तर आपण सुचवू शकता.''
साहेबांच्या या सूचक बोलण्यावर टी.टी.के. म्हणाले, ''मला आपला अतिरिक्त संरक्षणमंत्री म्हणून नेमण्याचा विचार करावा.''
साहेबांना या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.
'भटाला दिली ओसरी अन् भट हळूहळू पाय पसरी' या म्हणीची साहेबांना आठवण झाली.
''तुमचा इरादा एवढा ठाम असेल तर आपण संरक्षणमंत्री का होत नाही ?''
या साहेबांच्या बोलण्यानं टी. टी. के. नरमले आणि त्यांनी तडजोड म्हणून समिती असावी. त्या द्विसदस्यीय समितीत साहेब आणि ते स्वतः राहतील, असे सांगितले.
साहेबांनी त्यात दुरुस्ती सुचविली. ही समिती त्रिसदस्यीय राहील. तिसरे सदस्य लालबहादूर शास्त्री राहतील. हे तीनही सदस्य समान अधिकाराचे असतील. यात कुणीही अध्यक्ष राहणार नाही.
यावर टी.टी.के. नी होकार देताच साहेब लालबहादूर शास्त्रींना भेटले. या बैठकीचा वृत्तांत दिला. लालबहादूर शास्त्री यांनी नेहरूजींच्या कानावर हा वृत्तांत घालावा अशी विनंती केली. नेहरूजींना माझी काही अडचण वाटत असेल तर मी परत कराडला जाण्यास तयार आहे. १३ तारखेपर्यंत या प्रकरणाचा निकाला लागला पाहिजे, नसता मी १४ फेब्रुवारीला सातारा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार नाही. मी परत जावयास तयार आहे. माझ्या परत जाण्यानं महाराष्ट्रात काहीएक वादळ उठणार नाही. मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही. काँग्रेस पक्षाची सेवा करीत राहीन...
शास्त्रीजींनी नेहरूजींची भेट घेऊन या त्रिसदस्यीय समितीची निर्मिती केली तरीपण दुर्दैवानं पुढे अडथळ्याच्या उचापती चालूच राहिल्या.
लोकसभेच्या संसदीय वर्तुळातून असंतोषाला कारणीभूत ठरणारी एक घटना घडली. त्या घटनेचं नायकत्व पटनाईक यांनी स्वीकारलेलं होतं. पटनाईक ओरिसाचे तरुण मुख्यमंत्री. नेहरूजींच्या वर्तुळात बर्यापैकी स्थान प्राप्त केलेलं. नेहरूजींचा एक कमकुवत दुवा. यांचा एक पाय कटकमध्ये तर दुसरा पाय दिल्लीत. नेहरूजींच्या कार्यालयालगत यांना उठण्याबसण्याकरिता परराष्ट्र खात्याची एक खोली मिळालेली.