ज्ञानोबानं मामाचं दर्शन घेतलं. दाजीबा देवराष्ट्रला परत आले. अक्कासोबत झालेल्या गोष्टींची घरात उजळणी केली. या ठरलेल्या संबंधानं घरात आनंदाचं उधाण आलं. सोनूबाईला आपलं बालपण आठवलं. या सर्व फुईभावासोबत बागडले-खेळले, रुसले-फुगले, त्यांच्याशी अबोला धरला त्यांच्यापैकी ज्ञानोबा माझे पती झाले. तिला ज्ञानोबाच्या खोड्या आठवल्या. 'फुईभाऊ कानकोंडा' असतो असं इतरांकडून सोनूबाई ऐकायच्या. आज तिच्या जीवनात प्रत्यक्ष घटना घडली. गणपतराव आणि यशवंतराव माझे दीर झालेत याचा सोनूबाईला अभिमान वाटू लागला. यशवंतराव तर लहानचे मोठे माझ्यासोबत झाले. आज मी त्यांची वहिनी झाले. चव्हाण घराण्याची सून झाले...
अशा या माझ्या थोरल्या जाऊबाई चव्हाण घराण्याच्या सूनबाई म्हणून कराडच्या घरात आल्या. साहेबांनी ज्ञानोबांच्या लग्नात करवला म्हणून मिरवण्याची हौस पूर्ण करून घेतली.
१९२७ च्या मागचे किंवा पुढचे वर्ष असेल. सातारा जिल्ह्यातून मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे उमेदवार म्हणून भास्करराव जाधव उभे होते. भास्करराव जाधव हे बहुजनांचे प्रतिनिधी आहेत, अशी बहुजन समाजाची धारणा होती. स्वयंसेवक म्हणून साहेबांनी कराड आणि आजूबाजूच्या खेड्यात प्रचाराचं काम केलं. भास्करराव जाधव निवडून आले. विद्यार्थीदशेत निवडणुकीत भाग घेऊन यश संपादन करण्यात साहेबांनी खारीची भूमिका पार पाडली.
१९२७ ते १९४६ या एकोणावीस वर्षांच्या काळात साहेबांचं जीवन अनुभवसंपन्न झालं. देशाच्या आयुष्यात टिळक चळवळ संपून गांधीवाद चळवळीचा उदय झाला होता. या सर्व घटनांचा परिणाम समाजजीवनावर पडू लागला. तळागाळातील समाज गांधीजींच्या चळवळीकडं आकर्षित झाला. आतापर्यंत पांढरपेशा वर्गच या चळवळीत असायचा. त्यातही स्वतःला उच्चभ्रू समजणारा वर्ग अधिक होता. कृष्णा-कोयनेच्या संगमानं कराडचा सांस्कृतिक वारसा संपन्न केलेला. गावात शैक्षणिक वातावरण. कृष्णा-कोयनेच्या पंचक्रोशीत स्वातंत्र्याची चळवळ बाळसं धरू लागली. या मातीच्या कुशीतून अन्नधान्याचं जोमदार पीक जसं उपजायचं तसंच चळवळीचं पीक फोफावत होतं. इथल्या विद्यार्थ्यांनी या मातीतलं अन्न खाल्लेलं. त्यांना या मातीचा गुण गप्प बसू देत नव्हता. ज्या आळीत साहेब राहत त्या आळीतील विद्यार्थ्यांनी 'शिवछत्रपती मंडळा'ची स्थापना केली. या मंडळात अठरापगड जातींची वीस-पंचवीस मुलं होती. त्यांचे म्होरके होते साहेब. कृष्णा-कोयनेच्या संगमावर पोहण्यासाठी जाणे, वेगवेगळ्या वक्तयांची व्याख्याने आयोजित करणे, दिवस-दिवस निसर्गाच्या सान्निध्यात राहणे. विद्यार्थीदशेत जे जे करायला पाहिजे ते ते साहेबांनी केले. सांस्कृतिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक जडणघडण याच वयात होते याची जाणीव साहेबांना होती. शिवछत्रपती मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम साहेब राबवीत. नाटकापासून ते मेळ्यापर्यंतच्या कार्यक्रमात साहेबांचा सहभाग असायचा. बर्नाड शॉच्या 'डॉक्टर्स डायलेमा' या नाटकातील एका प्रवेशात साहेबांनी काम केलं होतं. चैत्र-वैशाखात गावोगावीच्या जत्रेत तमाशाचे फड असायचे. त्या तमाशाच्या फडात जाऊन तमाशा पाहण्याचा आनंद साहेबांनी लुटला. भजन-कीर्तनातही साहेब रमायचे. भजनाचा तर छंद साहेबांना होताच. साहेब वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचे. त्याकरिता विपुल वाचन करायचे. कथा-कादंबर्या तर साहेबांचे आवडते विषय. कुठलाही विषय साहेबांना वर्ज नव्हता. कुस्त्यांच्या आखाड्यात साहेब जास्त रमायचे. चैत्र-वैशाखातील देवराष्ट्रातील कुस्त्यांची दंगड या भागात प्रसिद्ध होती. या पंचक्रोशीतील पंधरा वर्षांच्या वयापासून ते पंचवीस वर्षे वयातील तरणेबांड मल्ल या फडात यायचे. घाटावरील व घाटाखालील अशी मल्लांची विभागणी व्हायची. या दोन्ही मल्लांमध्ये स्पर्धा व्हायची. त्या काळी निदान पन्नास हजार प्रेक्षक या कुस्तीच्या लढती बघायचे. या स्पर्धेमुळं ज्यांचं नाव गाजत होतं ते मल्ल साहेबराव कडेपूरकर पुढे साहेबांच्या सान्निध्यात आले. कुस्ती खेळणं बंद झाल्यानंतर राजकीय आखाड्यात साहेबांसोबत स्नेह जडला. साहेबांच्या कामाला सातारा जिल्ह्यात सदैव पाठिंबा देणारे ते एक सहकारी बनले. त्यांची आठवण साहेबांच्या मनात अखंड तेवत राहिली. साहेबांचे बंधू गणपतराव पट्टीचे पहेलवान. जत्रेत कुस्ती खेळण्यासाठी ते जात तेव्हा साहेबांना सोबत नेत असत. साहेबांनाही गणपतरावांची कुस्ती पाहणे आवडे. गणपतराव आपल्या प्रतिस्पर्ध्याला आखाड्यात चीतपट करून अस्मान दाखवीत. गणपतरावांनी कुस्तीत अनेक बक्षिसं पटकावली होती. त्यांच्या वयाच्या मानानं त्यांची समज परिपक्व होती. ते नेहमी साहेबांना सांगत, ''तू व्यायाम करून शरीर कमव. तुला त्याचा भविष्यकाळात उपयोग होईल. कुस्ती नको खेळू; पण पोहण्याचा तरी व्यायाम कर.'' पोहण्याचे महत्त्व साहेबांना कळले होते.