त्याही काळात नादारीसाठी कुणी अर्ज केला तर त्याला फीस माफ होत असे; पण त्याकरिता एक अट होती - समाजातील प्रतिष्ठिताचं शिफारसपत्र. ज्ञानोबा ज्या गल्लीत राहत तेथे अनेक प्रतिष्ठितांची घरं होती. नादारीचा फायदा घ्यावा असा विचार ज्ञानोबांच्या मनात आला. त्यांनी दोन्ही धाकट्या भावंडांना अर्ज करण्यास सांगून गल्लीतील प्रतिष्ठिताकडून शिफारसपत्र घेण्यास सांगितलं. थोरल्या बंधूच्या आज्ञेप्रमाणे दोन्ही बंधू अर्ज घेऊन शिफारसपत्र घेण्यासाठी प्रतिष्ठिताकडे गेले. त्यांना त्या प्रतिष्ठिताकडून जी वागणूक मिळाली ती स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. 'मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला' ही शिकवण चव्हाण घराण्याला विठाईनं दिली होती. अपमानित होऊन दोन्ही बंधू प्रतिष्ठिताच्या घराबाहेर पडले. साहेबांचा स्वाभिमान जागा झाला. शिक्षणासाठी यापुढे कुणाकडेही याचना करायची नाही ही खूणगाठ मनात बांधून साहेब पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले. तथाकथित घराण्यानं जरी गरिबीकडे दुर्लक्ष केलं तरी गरिबांची पाठराखण करणारी सर्वसामान्य घराणी कराडमध्ये जिवंत होती. या घरातील मुलं साहेबांची मित्र झाली होती. साहेबांना शिक्षण घेताना या गरीब मित्रांची मदत झाली. या वयात जी मित्रमंडळी साहेबांनी मिळविली ती शेवटपर्यंत साहेबांच्या पाठीशी उभी राहिली. भाऊबंद दुरून मजा बघत.
थोरल्या जाऊबाई या ज्ञानोबांच्या धर्मपत्नी. राधाक्काचं लग्न झाल्यानंतर आईला घरची कामं करून इतर कामं करावी लागायची. सर्व कामं उरकताना आईची धावपळ व्हायची. ज्ञानोबा नोकरीला लागले. त्यांचं लग्नाचं वय झालं. यावर्षी दोनाचे चार हात करायचे, असं विठाईनं ठरविलं. मुलाचे मामा म्हणजे दाजीबा घाटगे यांच्या कानावर घालावं म्हणून देवराष्ट्राला निरोप धाडला - ''जेवत असशील तर हात धुवायला कराडला ये.''
निरोप मिळाल्यानंतर दाजीबा बुचकाळ्यात पडले. विचार करू लागले. एवढं काय महत्त्वाचं काम अक्कानं काढलं असावं.... त्याकरिता तत्पर येण्याचा निरोपही...
घरात सांगून दाजीबा कराडला पोहोचले. बहीण, भाऊ व भाच्यांनी एकत्रच जवण केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुलं पेंगायला लागली. आईनं अंथरुणं टाकली. मुलं झापावयास गेली. दोघं बहीण-भाऊ सुखदुःखाच्या आठवणीत गढून गेले. शेवटी दाजीबांनी विठाईला विचारले,
''असं काय महत्त्वाचं काम होतं, त्याकरिता तू मला इथं बोलावलंस ?''
''तसं म्हणशील तर महत्त्वाचं असं काही नाही; पण तू मुलांचा मामा आहेस आणि तुझ्याशिवाय मला कोणी दुसरं जवळचं आहे का ? मन मोकळं करण्याकरिता बोलावलं.'' आई.
''असं होय ! तर मग सांग पाहू तुझ्या मनात काय आहे ते...!'' दाजीबा.
''ज्ञानोबा नोकरीला लागलाय. लग्नाचं वयही झालंय. त्याचं लग्न करावं म्हणते मी औंदा.'' आई.
''काय माझ्या मनातलं बोललीस तू अक्का ! बघितली असशील एखादी मुलगी तर उडवून टाकू ज्ञानोबाच्या लग्नाचा बार.'' दाजीबा.
''त्याकरिताच मी तुला बोलावलं. माझ्या मनात असा विचार आला की, आपली वहिवाट चालू राहावी. देवराष्ट्राची वाट जुनी-नवी करून टाकावी...'' आई.
''मी समजलो नाही.'' दाजीबा.
''अरं, तुझी मुलगी सोनू आता न्हातीधुती झालीया. मी सून म्हणून तिला पसंत केलंय. तुझा काय विचार आहे ते सांग.'' आई.
''अक्का, मी काय तुझ्या ऐकण्याच्या बाहेर आहे व्हय ? तू सांगावं आणि मी ऐकावं...'' दाजीबा.
बहीण-भावांच्या मनात मागील सुखदुःखाच्या आठवणी जाग्या झाल्या. आतापर्यंत एकमेकांनी एकदुसर्याला सावरलं, सांळाळून घेतलं. पुढंही असाच घरोबा टिकून राहावा म्हणून दोघांनी ज्ञानोबा-सोनूबाईच्या लग्नाला संमती दिली. सकाळी मामा देवराष्ट्राला जावयास निघाले. भाचेमंडळी मामाभोवती जमा झाली. दाजीबांनी ज्ञानोबाला जवळ घेतलं नि म्हणाले,
'' ज्ञानोबा, तू आता माझा भाचा नसून आजपासून माझा जावई झालास !''