आज सत्तावीस एप्रिल. स्वराज्य जन्मदात्याचा जन्मदिवस. तीनशे वर्षांपूर्वी नियतीला स्वप्न पडलं. सह्याद्रीच्या शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंची कूस उजवली. जाणता राजा या भूमंडलावर अवतरला. दाहीदिशा उजळून निघाल्या. गडकरी आणि मावळे हर्षोल्हासात न्हाऊन निघाले तो आजचा दिवस.
साहेब आज सकाळी लवकर उठून तयार झाले. सह्याद्री बंगल्यावर भेटणार्यांची रीघ लागलेली. आकाशवाणीवर जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग लागलेला -
'जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणजे जो आपुले'
रंजल्या-गांजल्यांना आपलं म्हणणारे, रयतेचं दुःख आपलं दुःख मानणारे, रयतेचं दुःख निवारण करणारे, राजे शहाजीपुत्र छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आजच्या दिवशी शिवनेरीवर स्वराज्यनिर्मितीचा जन्मदाता जन्माला आला. तीनशे वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य जन्माला आलं. २७ एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस म्ळणून पाळण्यात यावा अशी साहेबांची इच्छा होती; पण लोकशाहीतील तडजोडीच्या राजकारणात समितीच्या नेत्यांच्या आग्रहाखातर १ मे हा महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस पाळावयाचं ठरलं. साहेबांनी मात्र शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य निर्मितीचा जन्मदिवस म्हणून पाळण्याचं ठरविलं. साहेबांसोबत शिवनेरीवर मलाही जावं लागणार होतं. मी माझ्या तयारीला लागले. साहेब सर्व भेटी हातावेगळ्या करून आत आले. आई घरात आपल्या खोलीत तुकाराम गाथा वाचून बसल्या होत्या. साहेब आणि मी आईसमोर नतमस्तक झाले. आईनं आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.
म्हणाल्या, ''यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा.''
साहेब आणि मी सह्याद्री बंगल्यावरून शिवनेरीच्या दिशेनं निघालो. वाटेत साहेबांनी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर विसावलेला शिवनेरी आज मोठ्या दिमाखानं उभा आहे. शिवनेरीला आपल्या अस्तित्वाचा अभिमान आहे. शककर्त्या युगपुरुषानं या भूमीवर जन्म घेतला. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पवित्र पदस्पर्धानं ही भूमी धन्य झाली. शिवनेरीच्या कड्याकपारीत बाळराजे शिवबा बागडले. अशा या पुण्यवंत, कीर्तिवंत घराण्याच्या उदय शिवनेरीवर झाला. तीनशे वर्षांपूर्वी जो जल्लोष, जो उन्मेष शिवनेरीने अनुभवला होता तोच उन्मेष, जल्लोष शिवनेरी आज पाहत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शिवप्रेमी व मावळ्यांची रीघ गडावर लागलेली. ढोल, ताशे, लेझीम, तुतार्यांचा आवाज गडावर घुमतोय. चोहोबाजूंनी मावळे गडावर चढताहेत. मावळ्यांच्या गर्जना, 'हर हर महादेव'च्या ललकार्यांनी गड दणाणून गेला आहे. गड गुलालानं माखून, न्हाऊन निघाला आहे.