हे दोघे त्यांच्यात जाऊन बसताच नेहरूजी म्हणाले, ''चव्हाण, तुमचा द्वैभाषिक राज्याच्या संदर्भातला काय अनुभव आहे तो सांगा पाहू...''
द्वैभाषिक राज्याचा राज्यकारभार चालविताना आलेला अनुभव साहेबांनी सविस्तर कथन केला.
म्हणाले, ''गुजराती आणि मराठी बांधवांचे एकमेकांशी संबंध सलोख्याचे आहेत. राज्यकारभारही चोख चालू आहे. विकासकामांनी गती घेतलेली आहे. दोन्ही समाजातील ताणतणाव कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे; पण दोन्ही समाजाच्या मनात कुठेतरी असमाधानाची भावना खदखदत असल्याची शंका येते. द्वैभाषिकाचा प्रयोग राबविण्यास मी समर्थ आहे. हे धोरण राबविताना मला समाधान मिळत नाही. कारण दोन्ही समाज द्वैभाषिक धोरणावर खूश नाहीत. आपण त्यांच्या मनाच्या विरोधात त्यांच्यावर हे धोरण लादीत आहोत, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे.''
''मराठी जनतेचं आम्ही समजू शकतो; पण गुजरातीही समाधानी नाहीत हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता ?'' पंत.
साहेब उत्तर देताना म्हणाले, ''मी माझ्या दररोजच्या अनुभवावरून हे सांगत आहे. मी मुख्यमंत्री या नात्यानं दोन्ही प्रांतांतील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांच्या भागात जातो. त्यांच्या भावना समजावून घेतो. १९५७ साली मी अहमदाबादला गेला होतो. तिथे जनतेने हिंसक निदर्शने केली. त्यांना काबूत आणण्यासाठी गोळीबार करावा लागला. पुढे या गोळीबाराची मी न्यायालयीन चौकशी केली. न्या. कौतवाल यांची चौकशीसाठी नेमणूक केली. मी स्वतः चौकशीला समोरा गेलो. सर्व जबाबदारी माझ्यावर घेतली. या चौकशी समितीनं अहवालात माझी स्तुती केली. गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची सहकार्य करण्याची इच्छा आहे; पण जनता बिथरलेली आहे. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी माझं प्रामाणिक मत आपल्यासमोर व्यक्त केलंय.''
मोरारजींच्या चर्चेचा रागरंग लक्षात आला. गोविंद वल्लभ पंत यांना विचारण्यात आलं, ''पुढे काय ?''
''चव्हाण, यांचे हे अनुभव असतील तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.'' पंत.
मोरारजींना त्यांचं मत विचारण्यात आलं त्या वेळी मोरारजी म्हणाले, ''द्वैभाषिक राज्याचा फेरविचार करण्याच्या मी विरोधात आहे. माझ्या मनाला ते पटत नाही. द्वैभाषिक राज्याचा फेरविचार करा, असं मी सांगणार नाही. चव्हाणांचे मत वेगळे आहे. त्याचा विचार मात्र आपल्याला अवश्य करावा लागेल. जगात अनेक द्वैभाषिक राज्ये आहेत आणि राजकीयदृष्ट्या ती यशस्वीपणे चालली आहेत.''