मार्च किंवा मेमध्ये मोरारजींसोबत एक बैठक घ्यावी लागेल, असं मत नेहरूजींनी व्यक्त केलं. साहेबांनी या बैठकीस संमती दिली. मोरारजींसोबत विचारविनिमय करून पुढे धोरण निश्चित करण्याचे ठरवून ही भेट संपली.
द्वैभाषिकाच्या प्रश्नासंबंधीची एप्रिल-मेच्या दरम्यान घ्यावयाची बैठक साहेबांच्या आजारपणामुळे पुढे ढकलली. साहेबांना किडनीच्या आजारानं घेरलं होतं. शस्त्रक्रिया करून घेणं साहेबांना भाग पडलं. या शस्त्रक्रियेतून धडधाकट व्हायला साहेबांना दोन-तीन महिने जावे लागले. यादरम्यान नेहरूजींनी साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली.
म्हणाले, ''आता तब्येत कशी आहे ? कामकाजात लक्ष घालता आहात का ?''
''हो, मी नियमितप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे.'' साहेब.
''मग आता आपण द्वैभाषिकाबद्दल चर्चा करावयास तुमची काही हरकत नसल्यास तारीख निश्चित करूया का ?'' नेहरूजी.
''माझी काहीच हरकत नाही. तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा.'' साहेब.
''ऑगस्टमध्ये घेऊया ? १९ किंवा २० ला तुम्ही यावे. बैठकीपूर्वी एक-दोन प्रमुख व्यक्तींसोबत चर्चा क़ेलेली बरी, असं मला वांटतं.'' नेहरूजी.
ठरलेल्या तारखेस साहेब दिल्लीला जावयास निघाले. निघण्यापूर्वी मोरारजी यांना दिल्लीला येत असल्याचे साहेबांनी कळविले. साहेब दिल्लीत मोरारजींकडे उतरत. नेहरूजींना भेटायला जाण्यापूर्वी मला भेटून जावे, असा निरोप मोराजींनी साहेबांना दिला होता. मोरारजींना सवड मिळाल्यानंतर त्यांनी साहेबांना चार वाजता बोलावून घेतले. मोरारजी अस्वस्थ असल्याचे साहेबांना जाणवले.
मोरारजींनी साहेबांना विचारले, ''द्वैभाषिकाची परिस्थिती कशी आहे ?
साहेबांनी महाराष्ट्र व गुजरातमधील जनमानसांचा कानोसा मोरारजींच्या कानावर टाकला. मोरारजींनी साहेबांचं म्हणणं शांतचित्तानं ऐकून घेतलं. कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही व रागही व्यक्त केला नाही.
साहेबांचं ऐकून घेतल्यावर मोरारजी म्हणाले, ''चव्हाण, हे तुमचं प्रामाणिक मत असेल तर मला काही म्हणावयाचं नाही; पण ही घटना अत्यंत दुर्दैवी व क्लेशकारक आहे हे मात्र खरं.''
या चर्चेनंतर साहेबांनी व मोरारजींनी एकत्र भोजन केलं. इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा मारल्यानंतर दोघेही एकाच गाडीनं गोविंद वल्लभ पंत यांच्या निवासस्थानी पोहोचले. नेहरूजी आणि पंत आपापसांत बोलत बसले होते.