सैबेरियाच्या भेटीच्या वेळी मजबरोबरचे उपवित्तमंत्रि. श्री.बोरिसॉव्ह (हे अर्थशास्त्राचे पी. एचडी. आहेत) आणि स्थानिक पीएच्. डी. चा विद्यार्थी (जो आमच्याबरोबर इंटरप्रिटर होता) त्यांचेबरोबर पुस्तकांबाबत चर्चा निघाली. मला पुस्तके प्रिय आहेत हे त्यांना माहीत असावे. (पाहुण्यांची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना असते.) त्यांनी स्वत:ची माहिती देताना आपणही बुक-लव्हर आहोत अशीच दिली.
शास्त्रविषयक पुस्तके विविध निघतात. त्यांचा व्यासंग विश्वविद्यालयात चालू असतो. परंतु त्यांची तक्रार, साहित्यविषयक व कथा-कादंबऱ्या हे वाङमय मागणीच्या प्रमाणात फार कमी पडते. पुस्तके प्रयत्न करूनही मिळत नाहीत. हजारो लायब्रऱ्या आहेत, तरीही ही अवस्था!
कोणत्या तऱ्हेच्या कथा-कादंबऱ्या प्रसिध्द होतात, असे विचारता त्यांनी classics वर अधिक मागणी असते असे सांगितले. उदाहरणार्थ- पुश्किन, लिओ टॉलस्टॉय वगैरे. परदेशातील classics वर तसेच लोकांचे प्रेम आहे.
रविंद्रनाथ टागोर हे नाव त्यांनी विशेषत्वाने सांगितले. महाभारताचे भाषांतर वा सारांश प्रसिध्द झाले आहे. आपणास अजूनही ते वाचावयास मिळत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली.
लहान मुलांबाबत श्री. बोरासॉव्हने मला जे सांगितले ते तर मी कधीच विसरणार नाही. "Children are our new ruling class." सर्व विशेष हक्क त्यांना आहेत सर्व गरजांमध्ये त्यांच्या गरजांना विशेष अग्रहक्क दिला जातो. भविष्याकडे आत्मविश्वासाने जाणाऱ्या समाजाची ही मोठी खूण आहे.
या देशात हिंडत असताना लेनिनची प्रतिमा सर्वत्र दिसते. लोक लेनिनला विसरलेले नाहीत. सर्व समाज त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे, याची साक्ष पावलोपावली मिळते.
देशाला नवजीवन देणाऱ्या नेत्याला जो देश विसरतो, त्या देशाला भविष्य नाही. आम्ही आमच्या देशामध्ये गांधीजींना विसरलो नाही ना? मोठा अस्वस्थ करणारा प्रश्न मनामध्ये उभा राहिला. अशी काहीशी खंत मनामध्ये घेऊन मी आज मॉस्कोमधून निघालो.
पुढे अधिक प्रागमधून.