समस्या व त्यांची उत्तरे यांचे स्वरूप त्रिविध आहे.
१) ज्या अटीवर पत-कर्जे देण्याची व्यवस्था आहे तीमध्ये महत्त्वाचे बदल करून ती व्यवस्था आमच्या अर्थकारणास झेपेल अशा तऱ्हेने सौम्यातिसौम्य करणे.
२) प्रकल्पांनाच आवश्यक ती यंत्रसामुग्री देण्याची त्यांची नीति आहे. ती काहीशी ढिली करून आम्हाला आवश्यक ती, त्याच इक्विपमेंटशी संबंधित 'स्पेअर्स अॅण्ड कांपोनंट्स्' द्यावेत म्हणजे दिलेल्या कर्जांचा वापर लवकर पुरा होईल.
३) आज साठलेल्या कर्जांची परतफेड आम्ही न चुकता करू. परंतु त्याचा कालावधि वाढवून आमचे ओझे काहीसे हलके करणे. आजच्या चलनवाढीच्या भयानक व जागतिक स्वरूपाच्या वातावरणाने आमच्या परकीय चलनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे म्हणून या उपायांची तातडी आहे, ही आमची भूमिका परत स्पष्ट केली व त्याचा हाय-लेव्हलवर विचार होऊन निर्णय होणे आवश्यक आहे अशी त्यांची भूमिका त्यांनी मांडली. कोणीही एक मंत्री निर्णय घेऊ शकणार नाही. मूलभूत नीतीचे प्रश्न आहेत.
येथे अमेरिकन प्रेसिडेंट निक्सन आले आहेत. सर्व नेते मंडळी त्यांच्याशी चर्चेत गुंतली आहेत. त्यामुळे निर्णय लगेच होणार नाही. परंतु सर्व बाजूंनी या प्रश्नाचा ते विचार करतील-वगैरे आश्वासन त्यांनी दिले.
आता यातून नेमके काय घडेल ते सांगणे सोपे नाही. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे नं.१ व नं.२ कमी-जास्त फरक करून मानले जाईल. नं. ३ बाबत विशेष काही होणार नाही. श्री. एम्. जी. कौल यांना मी माझा अंदाज सांगितला.
या चर्चेच्या सत्रात ता. २५ रोजी श्री. बॅबेकॉव्हशी चर्चा मोठी मजेदार झाली. सुरुवातीला स्पष्ट नाहीच म्हणाले. परंतु मी आस्ते आस्ते त्यांच्या माझ्या दिल्लीला झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. मग स्वारी सरळ रस्त्यावर आली, आणि माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला, तुम्ही हे प्रश्न माझेबरोबर श्री. ब्रेझनेव्हचे भेटीचे वेळी, आदल्या दिवशी उपस्थित केले होते वगैरे आपल्या सहकाऱ्यांच्या समक्ष कबूल केले. पुढची चर्चा फारच मोकळी व मैत्रीच्या वातावरणात झाली. ते व मी स्वतंत्रपणेही अर्धा तास बसलो.
गेल्या दहा वर्षांत सोव्हिएट समाजही बराच बदलला आहे. सुबत्ता अधिक. दुकानांमधून विविध वस्तु मुबलक दिसतात. (अर्थात् पश्चिमी देशांशी तुलना मी करीत नाही व तशी तुलना योग्यही नाही.) रस्त्यावर मोटार-गाडया, इतर शहरांत दिसाव्यात तशाच दिसतात.
आजचे राजकीय प्रश्न व राजकीय पुढारी यांच्याशिवाय इतर प्रश्नांबाबत बऱ्याच मोकळेपणाने बोलताना आढळतात. वाचनाची जबरदस्त हौस वाढली आहे. पुस्तके लाखांच्या संख्येने खपतात. लहान मुले या बाबतीत सर्वांचे पुढे आहेत. शिक्षणप्रसारामुळे ज्ञानविषयक जिज्ञासेची एक नवी लाट उसळली आहे.