२३
१ ऑगस्ट, १९७३
गेले तीन दिवस G 24 आणि C 20 च्या मीटिंगमध्ये गेले. G 24 फक्त फार्सच होता. अर्थात् राजकीय दृष्टया याचे महत्त्व असल्यामुळे आम्ही त्यात निराश न होता प्रयत्न करीत राहिलो.
एकमताची भूमिका तयार केली. ही भूमिका अधिकृतरीत्या C 20 चे चेअरमन श्री. अलिवर्धन यांना कळवावी असे मी सुचविले. परंतु लॅटिन अमेरिकन्स् मोठे विचित्र आहेत - विशेषत: ब्राझील - त्यांनी सुरुवातीला काही स्वीकारले नाही. परंतु मीटिंग संपल्यावर 'Link'* बाबतची भूमिका अधिकृतरीत्या कळविण्याचे कबूल केले. श्री. मनमोहन सिंग यांनी या बाबतीत फारच प्रयत्न केले.
------------------------------------------------------------------------------------------
* Link- A link between development assistance and SDR (Special Drawing Rights) allocation.
------------------------------------------------------------------------------------------
C 20 ची चर्चा पहिल्या दोन प्रश्नांवर चांगली झाली. काही निष्पन्न झाले, परंतु बाकीच्या प्रश्नांवर मतमतांतरे बरीच आहेत हे स्पष्ट झाले.
विकसित देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न होता Link चा. अविकसित देशांचा spokesman म्हणून हा प्रश्न इनिशिएट करण्याबाबत भारतास सुचविले. भारताची याबाबतची भूमिका सर्व अविकसित देशांना मान्य आहेच. परंतु तत्त्वत: बहुसंख्य विकसित देशांच्या प्रतिनिधींनाही मान्य दिसली.
फ्रान्स, इटली, नेदरलँड्स् यांनी फार स्पष्ट पाठिंबा दिला. यू. के. ची भूमिका मला तरी त्वयार्धम् मयार्धम् - चलाखीची वाटली. कॅनडाचे मौन होते. ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा स्वच्छ होता. जर्मनी पूर्वी फार विरोधी होते. परंतु या वेळी जागतिक मत पाहून काही तडजोड निघाली तर आपली सहकार्याची भूमिका राहील - इथपर्यंत प्रगति दिसली.
स्पष्ट विरोध होता अमेरिकेचा. त्यांच्या फेडरल बँकेचे प्रमुख श्री. ए. बर्नस् यांनी बाजू मांडली. ते प्रामाणिक, प्रतिष्ठित बँकर म्हणून प्रख्यात आहेत. परंतु त्यांचे अर्थशास्त्र १९ व्या शतकातील आहे असे म्हणावे लागेल. याबाबत technical level वर अजून फारच प्रयत्न धीर न सोडता करण्याची आवश्यकता आहे. जपान उत्सुक नाही पण विकसित देशांना काहीशी चुचकारण्याची भूमिका दिसली.
३०, ३१ व १ रोजी लंच आणि डिनरच्या वेळी ज्या अनौपचारिक चर्चा झाल्या त्या फारच अर्थपूर्ण होत्या. १९४७ पर्यंत योजना कायम करण्याची इच्छा दिसून आली. अडचणी आहेत. मतभेद आहेत. परंतु बदललेल्या नव्या आर्थिक जमान्याला उपयुक्त अशी नवी मॉनेटरी सिस्टिम असल्याशिवाय चालणार नाही याची जाणीव दिसली. यावर्षी नैरोबी व पुन्हा वॉशिंग्टन येथे बसावे लागेल.
१ तारखेला डॉ. किसिंजरना व्हाइट हाऊसमध्ये श्री. कौल यांच्यासहित भेटलो.
एलिचपूरचा देशमुखांचा मुलगा अशरिफ देशमुख येथे स्थायिक झाला आहे. त्यांच्याकडे दुपारचे जेवलो. त्यांची पत्नी अमेरिकन आहे. प्रेमळ जोडपे आहे. अतिशय अगत्य दाखविले. वॉशिंग्टनपासून दूर राहतात. आपल्या गाडीतून अगदी वेळेवर विमानतळावर पोहोचविले.
आता लांबलचक व थकविणारा न्यूयॉर्क - न्यूदिल्ली प्रवास सुरू झाला आहे. थकवा आहे. डोळयांवर झोपेची झापड आहे. म्हणून थांबवितो.