१) निव्वळ काही चुकीच्या व्यक्ति सत्तेभोवती जमा झाल्या त्यामुळे हे झाले की आधुनिक सत्तायंत्रणेत, विशेषत: अमेरिकेसारख्या प्रमुख जागतिक सत्ता असलेल्या देशाच्या सत्तेच्या रचनेमध्ये (पॉवर स्ट्रक्चर) हे अपरिहार्य आहे ?
२) अमेरिकन घटनेने आणि इतिहासाने दिलेल्या काही सत्तासंस्था (पोलिटिकल इन्स्टिटयूशन्स) कमजोर झाल्या आहेत किंवा केल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे काय ?
३) निक्सनच्या व्यक्तित्वात या प्रकृती पहिल्यापासून आहेत की हे अपघातासारखे अनपेक्षितरीत्या घडले ?
४) जबाबदार असलेल्या प्रमुख व्यक्ति, विचारपरंपरा- स्वभाव या दृष्टीने काही विशिष्ट प्रकारच्या आहेत काय ?
या सर्व प्रश्नांना श्री. मॅक्नामारा यांनी दिलेली उत्तरे काही दृष्टया मला महत्त्वाची वाटली. त्यांचे म्हणणे असे की, अमेरिकेच्या सत्तारचनेत (आधुनिक जबाबदाऱ्या व राष्ट्रीय संरक्षणाचे प्रश्न लक्षात घेऊनसुध्दा) या गोष्टी मुळीच अपरिहार्य नाहीत. अमेरिकन परंपरेच्या एकदम विरोधी अशा या प्रवृत्ती आहेत. त्यांचा बीमोड केला पाहीजे. त्यांनी स्वत:चा, संरक्षणमंत्री- काळातील अनुभव सांगून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या मते निक्सन यांनी आपल्याभोंवती एका वेगळया (रूथलेस अॅण्ड फॅन्टॅस्टिक) प्रकारच्या लोकांचे वर्तुळ रचले. सेक्रेटरी (मंत्री कॅबिनेट मिनिस्टर) या संस्थेचे अवमूल्यन केले आहे. त्याचा हा परिणाम आहे.
त्यांच्या भोवतालचे लोक हे इतके शक्तिशाली बनविले की, सेक्रेटरी नामधारी मंत्री झाले. त्यांची प्रतिष्ठा संपली होती. अमेरिकन सामान्य जनतेला काही व्यक्तींच्याबाबत ते कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, याचीही कल्पना नसते. Devaluation of the institution of cabinet is the basic cause of this development.
सत्ता व जबाबदारी यांची फारकत झाली की, हे असेच होणार. निक्सनच्या व्यक्तित्वात या प्रवृत्ति, त्यांच्या राजकीय जीवनात पहिल्यापासूनच होत्या म्हटल्या तरी चालेल.
त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीत एका महिला उमेदवाराविरुध्द अशाच खोटारडया व घाणेरडया युक्ती-प्रयुक्तीचा उपयोग केला होता. त्यांच्या जवळच्या व्यक्ति, फॅसिस्ट स्वभावाच्या-आपण म्हणतो तेच खरे - आपण नैतिकदृष्टया इतरांहून उच्च आहोत अशा अहंकारी व बेदरकार वृत्तीच्या आहेत. आणि अशा व्यक्तींची निवड निक्सननी जाणीवपूर्वक केली हे विशेष आहे.