भारताच्या तटस्थतेचे सूत्र अधिक अर्थपूर्ण रीतीने विशद करून त्यांनी या जागतिक संस्थेमध्ये मांडले. महत्त्वाच्या व्यक्तींच्यावर प्रभाव पाडणे, त्यांच्या विरोधाची धार कमी करणे, त्यांचे मतपरिवर्तन करण्याकरता मोठया ध्येयवादी दृष्टीने झटत राहणे, असा यशवंतरावांचा प्रयत्न सतत चालू राहिला.
राष्ट्राची मते बदलणे किंवा राष्ट्राच्या मतावर प्रभाव पाडणे ही गोष्ट पुष्कळ वेळा अशक्य असते; परंतु राष्ट्राच्या प्रतिनिधीभूत व्यक्तीच्या मतांमध्ये बदल करणे ही पुष्कळ वेळा शक्य कोटीतील गोष्ट असते, हे तत्त्व लक्षात घेऊन यशवंतराव प्रयत्नशील असत. या संदर्भांत ब्रिटनचे मजूरपक्षाचे नेते आणि प्रधानमंत्री याबद्दल यशवंतराव मार्मिकपणे म्हणतात: ''एकोणीसशे ४५-४६ मध्ये ऍटली नसते, तर इतिहासाची पावले कदाचित वेगळी पडली असती, असे वाटू लागते. व्यक्तीव्यक्तीचा फरक इतिहासाच्या दिशा बदलू शकतो, हे काही प्रमाणात, किंबहुना बऱ्याच प्रमाणात खरे आहे.'' (न्यूयॉर्क ते जिनिव्हा, पृ. १७३).
भारताचे उच्चपदस्थ केंद्रमंत्री या नात्याने यशवंतरावांनी जेथे जातील तेथे राजकारणी, पत्रकार, सत्ताधारी, कलाकार, इत्यादिकांना मेजवान्या दिल्या. त्याप्रमाणे शेकडो मेजवान्यांना आणि समारंभांना ते उपस्थित राहिले. खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होतीच. या संदर्भात यशवंतराव म्हणतात, ''आम्ही पिणारे नाही, हे पाहून आमची व्यवस्था ठेवण्यासाठी येथे हजर असलेल्या लोकांची फारच निराशा झाली.''
त्या त्या राष्ट्रातील प्रधानमंत्री किंवा अन्य मंत्री सपत्नीक हजर असायचे. गप्पांचा कलकलाट व अधूनमधून हास्याची उडणारी कारंजी, अशा तऱ्हेचे मोहक वातावरण असायचे. हातात हात घालून आणि गळयात गळा घालून मोकळेपणाने नाचत व हिंडत असणारी जोडपी त्यांना भेटायची. असा आनंदसमारोह रात्री अकरापर्यंत चालू असायचा. त्यात यशवंतराव एकाकी पडायचे आणि सलगी करणारे उच्चपदस्थ त्यांच्या एकाकीपणावर नेमके बोट ठेवत असत.
कोणत्याही शहरात गेले, की तेथे न चुकता तीन स्थलांना ते भेट देत असत. वस्तुसंग्रहालय, पुस्तकांचे दुकान आणि नाटयमंदिर. कंटाळा आला म्हणजे आपल्या निवासस्थानी विश्रांति घेत. सभासंमेलनांच्या उपस्थितीची तयारी करीत. त्यांचे निवासस्थान म्हणजे त्या त्या नगरीतील भव्य व अद्ययावत शैलीची सगळयात महाग अशी हॉटेलची इमारत बहुतेक असायची. एकांतपणे कामाची कागदपत्रे वाचीत आणि टिपणे करीत वेळ निघून जायचा. गरमगरम चहा हे त्यांचे प्रसन्न करणारे पेय होय. त्याचा ते या पत्रसंग्रहात वारंवार उल्लेख करतात.