विदेश दर्शन - १

यशवंतराव स्वत: मोठे रसिक, कलाप्रेमी असल्यामुळे वस्तुसंग्रहालया- बरोबरच रंगमंदिरालाही भेट देतात. त्या त्या प्रदेशांतील नृत्य आणि नाटय या कलांमध्ये ते पूर्ण रंगून जातात. केवळ इंग्लिश भाषिक खेळच ते पाहतात असे नाही. रशियात, मॉस्कोला गेले असताना रशियन रंगभूमीवर चाललेले खेळ पाहण्यात ते दंग होतात. ताश्कंदला गेले असताना तेथे रात्री एक ऑपेरा पाहून आले. त्यासंबंधी ते म्हणतात, ''उझबेकी भाषेतील ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारलेले हे नाटय भव्य होते. संगीत उत्तम होते. परंतु एक गायिका इतकी जाडजूड होती, की तिला सुंदर कसे म्हणावे हेच समजत नव्हते.'' मीही अनेक वेळा रशियात गेलो आहे. माझा असा ग्रह झाला की, रशियन तरूणांच्या डोळयांना सडपातळ आणि जाडजूड या फरकाचे काही महत्त्व वाटत नाही. तारुण्य व लावण्य असले की खूप खूष होतात.

ज्या ज्या शहरात ते महत्त्वाच्या कामगिरीकरिता जातात, तेथे वेळ नसला तरी वेळात वेळ काढून काही वेळ रंगभूमीवर रंगतातच. ते सांगतात- ''लंडनची रंगभूमी हे माझे सर्वांत मोठे आकर्षण आहे. दोन नाटके पाहिली. अगदी वेगवेगळया स्वरूपाची, पण रंगतदार होती. अभिनयातील सहजता, आधुनिक तंत्रामुळे आलेली वास्तवता, कथेतील स्वाभाविकता-नाटकाचे अंक दोन; दोन अंकांत सर्व मिळून चार प्रवेश. दोन-अडीच तासांत सर्व काही संपते. एक नवा आनंद घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. कित्येक नाटके दोन दोन वर्षे सतत चालली आहेत. या रंगभूमीला पल्लेदार इतिहास आहे. काळाने आलेली परिपक्वता आहे. कलाकारांची जाणीव आणि व्यासंग या सर्व गोष्टींनी नाटयकला येथे सदा बहरलेली असते.'' लंडनहून वॉशिंग्टनला आल्यावर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
 
न्यूयॉर्क येथे विदेशमंत्र्यांची परिषद होती. यूनो. मध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मुक्त चर्चा होती. रात्री “Same time new year” हे नाटक पाहिले. त्यासंबंधी म्हणतात : ''केवलसिंग, जयपाल पतिपत्नी आणि शरद काळे असे गेलो होतो. हे एक नमुनेदार अमेरिकन नाटक आहे. पात्रे फक्त दोन; उत्कृष्ट कामे केली. दोन-अडीच तास फक्त दोन पात्रांनी नाटक असे रंगविले की सांगता सोय नाही. नाटकाचा विषय, मांडणी, कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय, यांमुळे नाटक फारच परिणामकारक होते. विनोद भरपूर आहे. पण सर्व विनोद मूलत: जीवनातील गंभीर अनुभूतीतून निर्माण होतो.

एका जोडप्याची विवाहबाह्य मैत्री अकस्मात् आपापल्या गावापासून दूरच्या शहरी होते. दरवर्षी याच महिन्यात एका वीकएन्डला ते सतत पंचवीस वर्षे भेटत राहिले. सहा दृश्ये आहेत. दर पाच वर्षांनी होणारी भेट प्रत्येक प्रवेशामध्ये दाखविली आहे. पंचवीस वर्षांतले, परिस्थितीत, वयात, स्वभावात, मनात झालेले फरक दाखविले आहेत. पण मैत्री अतूट आहे. शेवटी त्यांतले गृहस्थ वृध्दपणी लग्नाची इच्छा व्यक्त करतात आणि स्त्री म्हणते, ''I cannot''. कुटुंबाविषयीचा जिव्हाळा, नवऱ्याबद्दल आदर ही कारणे सांगते आणि ती खरी असतात. तो रागावतो व निघून जातो पण लगेचच परततो आणि मैत्री संथपणे पुन्हा सुरू राहते. म्हटले तर मजा, म्हटले तर एका गंभीर प्रश्नाचे चित्रण होते.'' (न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर १९७५).

यशवंतराव आपल्या विशिष्ट मंत्रिपदाच्या गरजांप्रमाणे विदेशांतील उच्चपदस्थ, प्रथितयश व्यक्तींशी संधान बांधणे, हे पहिले कर्तव्य समजतात. भारताच्या हितसंबंधाशी उदासीन कोण, विरोधी कोण, सहानुभूतीचे कोण आणि प्रत्यक्ष मदत करण्यास तयार कोण, याची ते बारकाईने तपासणी करतात. बहुतेक सगळा परिचय आणि संवाद, सुसंस्कृत शिष्टाचाराच्या पातळीवर चालत असल्याने त्यातील औपचारिक भाग वगळून तथ्य कशात आहे आणि वैय्यर्थ कशात आहे, याची ते विलक्षण तटस्थतेने समीक्षा करीत असतात आणि ही समीक्षा त्यांच्या विदेशदर्शनात सुरेख रीतीने नोंदवली आहे.