विदेश दर्शन - १०५

५६ कैरो (काहिरा)
२९ मे, १९७५

उद्या सकाळी येथून दमास्कसला जाण्यासाठी निघणार. तीन दिवसांची येथील भेट आज पुरी झाली. येण्यापूर्वीची तीन दिवसांची पुणे-सातारा-कराडची भेट अतिशय गर्दीची व धावपळीची झाली होती. दिल्लीस पोहोचल्याबरोबर, लगेच त्या रात्री पहाटे निघावे लागले. त्यामुळे निघतांना मला थकून गेल्यासारखे वाटत होते.

विमान बेरूतला जाणार व झोपेसाठी वेळ अधिक मिळेल असे वाटले होते. परंतु विमान कुवेतलाच थांबले. साडेतीन-चार तासांचा प्रवास. त्यामुळे झोप पुरी मिळाली नाही.

कुवेतला अॅम्बॅसडर श्री. अफझलखान यांनी 'कुवेत हिल्टन' मध्ये व्यवस्था केली होती. तेथून कैरोला जाणारे विमान दुपारी १२॥ला असल्यामुळे निवांत वेळ मिळाला. झोप आली नाही पण सुरेख स्नान मिळाले. शांत वेळ सापडला. त्यामुळे कागदपत्र वाचावयाचे राहून गेले होते ते वाचून झाले.

कैरोला ४ वाजता पोहोचलो. म्हणजे पाच तास उशीरा. कार्यक्रमांची थोडी गडबड झालीच. विदेशमंत्र्यांचे येथील त्या दिवशीचे जेवण दुसऱ्या दिवसावर गेले.

संध्याकाळी ७ वाजता २॥-३ तास त्यांच्याशी फार मोकळी चर्चा झाली. मध्यपूर्वेच्या प्रश्नांत इजिप्तची भूमिका मध्यवर्ति असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन समजणे आवश्यक होते.

त्यांचा देश आर्थिक अडचणीत आहे. रशिया शस्त्रेही देत नाही आणि कर्ज परतफेडीची सवलतही देत नाही. यामुळे खूपच नाराज दिसले. शेजारच्या लिबियाला देतात, सिरीयाला देतात आणि आम्हाला नाही अशी उघड उघड तक्रार करीत होते.

राजकीयदृष्टया या दोन देशांमध्ये फारच अंतर वाढले आहे. अमेरिका तरी काय करणार आहे कोण जाणे, ही भावना त्यांना सतावत आहेच. परंतु आशा असली तर त्यांच्यावरच आहे. कारण त्यांचे इस्त्राइल वर वजन आहे.

मला ही भोळसटपणाची आशा वाटते. आम्हाला हे सांगण्यात सोव्हिएटशी आम्ही बोलावे असा उद्देश असावा. पश्चिम युरोपीय देशांचे वर्तन उत्तम आहे. ते संपूर्ण साथ देत आहेत असे त्यांना सर्टिफिकेट दिले.
 
महत्त्वाची मुलाखत दुसऱ्या दिवशी प्रेसिडेंटड सादत यांच्याशी झाली. कैरो शहराच्या बाहेर बराज शेजारच्या एका निवांत, शांत vila मध्ये ४५ मिनिटे भेट झाली. पहिली पंधरा मिनिटे मी प्रधानमंत्र्यांचे पत्र देऊन आपल्याकडील राजकीय व आर्थिक परिस्थिती निवेदन केली. पाकिस्तानचाही उल्लेख झाला. 'शो पेशन्स' असा त्यांचा सल्ला मिळाला.