५५ Mexico City
१० th May, १९७५
आज संध्याकाळी गेले तीन दिवस चालू असलेली लॅटिन अमेरिकेतील भारतीय राजदूतांची बैठक संपली. उद्या सकाळी येथून न्ययॉर्कला प्रयाण.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी मी हॅवानाचे वाटेवर याच हॉटेलमध्ये (Hotel Camino Real) एक रात्र राहिलो. आमचे जोडीला (म्हणजे मुक्कामाला) मेक्सिको प्रेसिडेंटचे पाहुणे म्हणून इराणचे शहेनशहाही याच हॉटेलात आहेत.
या खेपेला मी येथील सरकारचा पाहुणा नव्हतो. मी आपल्या अंतर्गत राजदूतांच्या बैठकीसाठी आलो होतो. त्यामुळे याच कामामध्ये अधिक म्हणजे दररोज ५-६ तास गेले.
अशा तऱ्हेच्या बैठकीचा माझा प्रथमच अनुभव होता. अशी परिषद घ्यावी असे दीड-दोन महिन्यांपूर्वी माझ्या मनात आले. तशी तयारी केली होती.
प्रथम ब्राझीलमध्ये घ्यावी विचार होता. पण नंतर मेक्सिकोचा निर्णय झाला. मला वाटते अशा बैठकांची व विचारविनिमयांची वारंवार गरज आहे. या खंडातील ही अशी पहिलीच बैठक झाली असे सांगण्यात आले.
जगाच्या सर्व विभागांचा असा तपशीलवार अभ्यास संबंधित सर्वांशी एका ठिकाणी बसून झाला, म्हणजे त्या विभागात करणाऱ्या राजदूतांनाही मदत होते. दिल्लीत केंद्रकचेरीतून काम करणाऱ्यांना आणि विदेशी मंत्र्यांनाही उपयोगी पडतो यात शंका नाही.
आशिया आणि आफ्रिका या खंडातील सर्वसामान्य माहिती मला होती. परंतु लॅटिन अमेरिकन देशासंबंधी तशी माहिती फार नव्हती. मंत्रालयामध्येही त्यासंबंधी सखोल अभ्यास नव्हता. त्यामुळे याची गरज होती. येथील मीटिंग संपल्यानंतर सर्वांनी कबूल केले की, अशा बैठकीची नितांत गरज होती.
२० देशांचा हा खंडप्राय मुलुख. त्याचा इतिहास, त्यातील लोक व त्यांची संस्कृति, त्यांच्या आर्थिक आकांक्षा आणि आजची विकासाची स्थिति, या देशांची राजकीय धोरणे व त्याच्या पाठीमागे असणाऱ्या शक्ती व प्रेरणा यांचा उत्तम ऊहापोह झाला.
त्या संदर्भात भारतीय धोरणाची दिशा कशी असावी, आर्थिक सहकार्याची शक्यता व मर्यादा याचीही तपासणी झाली. प्रत्येक देशाच्या प्रतिनिधीने-राजदूताने या दृष्टीने प्रेझेंटेशन करावयाचे आणि इतरांनी त्याला स्पष्टीकरणाचे प्रश्न विचारावे अशी पध्दती ठेवली होती.
बैठकीसाठी Agenda ही बनविला होता. त्यामुळे चर्चा मुद्देसूद आणि आखीव अशी झाली. परिषदेच्या सुरुवातीला १५-२० मिनिटे परिषदेच्या उद्देशासंबंधी बोलून मी विषयप्रवेश केला होता.
काल शेवटी summing up साठी दीड तास बोललो. लॅटिन अमेरिकेसंबंधीचे माझे विश्लेषण व त्यांची राजकीय व आर्थिक धोरणे आज काय आहेत व ती तशी का आहेत, त्यांच्यापुढील दिशा कशा राहतील याचे सर्वसामान्य दिग्दर्शन केले.