१४. शांताराम गरुड
समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी
प्रश्न : मनुष्यबळ व नैसर्गिक स्त्रोत यांचा पूर्णपणे वापर करणे ही प्राथमिक अवस्था. मनुष्यबळ व नैसर्गिक स्त्रोत, जमीन, पाणी, जंगम व हवामान यांचा पूर्णतया वापर करणे हा राष्ट्रीय विकासाचा प्राथमिक टप्पा असतो. आपल्या देशाच्या नियोजनाने ही प्राथमिक अवस्था पूर्ण केलेली नाही. ती पूर्ण करण्याला अग्रक्रम देण्याचा संदर्भ लक्षात घेऊन दुष्काळ व पाणी यावर उपाय कोणते ?
उत्तर : श्री शांताराम गरूड हे आमचे मोठे परम स्नेही आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या पाठीमागे त्यांची तळमळीची भावना ही आम्ही समजू शकतो. आणि मानवशक्तीचा सर्वांगीण उपयोग करण्यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न अग्रक्रमाने करावे ह्या त्यांच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत.
महाराष्ट्राची रोजगार हमी योजना, तीत काहीही उणिवा असल्या तरीही, तिच्यापाठीशी लक्षावधी रोजगार उपलब्ध करून देण्याची वैचारिक भूमिका आहे. तद्वतच मानवशक्तीचा विकासासाठी उपयोग केला पाहिजे हा आशयही अर्थपूर्ण आहे. शहरी युवकांसाठी तशाप्रकारची सर्वकष योजना आपण राबवू शकलो नाही. मानवी बळाचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने ती आपल्या कार्यक्रमातील एक मोठी उणीवच आहे. तसेच हल्ली सुशिक्षित बेकारांचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ह्या विविध प्रश्नांची कारणमीमांसा शोधताना अनेक विषयांबाबतीत आपल्या धोरणाची छाननी करावी लागेल. जेथे आपण चुकतो आहोत (तशा चुका आपल्या हातून का घडल्या आणि त्या चुका पुढे होऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे) याचाही विचार करावा लागेल. तथापि श्री शांताराम गरूड यांनी विचारलेल्या प्रश्नांची व्याप्ती केवळ दुष्काळ आणि पाणी ह्या समस्येपुरतीच मर्यादित नाही. श्री शांताराम गरूड ह्यांनी अतिशय तळमळीच्या भावनेने काही मूलभूत नियोजनाचे प्रश्न निर्माण केले आहेत. म्हणून अल्पशा प्रमाणात त्यांची चर्चात्मक उत्तरे येथे देत आहे.
मनुष्यबळाच्या वापराचा प्रश्न हा आर्थिक कार्यक्रम, धोरणे, उद्योग आणि शेती यांचे परस्पर संबंध, तंत्रविद्या, उत्पादन खर्च, ज्ञान, प्रशिक्षणार्थी दिशा आणि आशय, सामाजिक शिक्षण, इत्यादी अनेक प्रश्नांशी निगडीत आहे. भारतातील मानवीशक्तीचा उपयोग करण्याचा प्रश्न आणि शिक्षणपद्धती यांची एकमेकांपासून फारकत करून चालणार नाही. उदाहरणार्थ, आमच्या देशात शिक्षण आणि श्रम ह्यांची आम्ही सांगड घालू शकलो नाही. म्हणजेच आमच्या देशात शिक्षण घेतले आणि युवक पदवीधर झाला की काही अपवाद सोडल्यास, त्याला शारीरिक श्रमाचे काम करणे कमी पणाचे वाटू लागते. ज्या सुशिक्षित मानवीशक्तीच्या आधारे आपल्याला समाज उभा करावयाचा आहे, तो सामाजिक विभागच असे वागू लागला तर देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागते. पूर्वी एकेकाळी थोड्याशा सुशिक्षित पांढरपेशा वर्गामध्ये श्रम करणे म्हणजे कमीपणाचे अशी भावना होती. परंतु आता कोणत्याही सामाजिक थरातील युवक सुशिक्षित झाला की त्यालाही श्रम करणे कमीपणाचे वाटू लागते. कोणत्याही देशात सुशिक्षित मध्यम वर्ग हे एक मोठे शक्तिस्थान असते. आजच्या सुशिक्षित पिढीत ह्याला काही अपवादही आहेत. परंतु एकूण ज्ञान आणि व्यवहार; व ज्ञान आणि श्रम यांची सांगड घालण्यात आपल्या देशात आपल्याला यश मिळू शकले नाही. मानवी शक्तीचा योग्य उपयोग करण्याचा प्रश्न हा शिक्षणासंबंधीच्या मूलभूत धोरणाचा मूलभूत प्रश्न सोडविल्याशिवाय सोडवता येईल काय ह्या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागेल. आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आधी व्यवहार आणि व्यवहारातून तात्त्वि सिद्धान्त अशापद्धतीचा अवलंब केला जात नाही. आपण तात्त्वि सिद्धान्ताचे शिक्षण देतो आणि बहुसंख्य शिकविणार्यांचा आणि शिक्षण घेणार्यांचा व्यवहारांशी संबंध नसतो. ही मूलभूत समस्या सोडविल्याखेरीज मनुष्य बळाच्या वापराचा तात्त्वि विचार करून काहीही उपयोग नाही. श्री गरूड हे फक्त अशिक्षित माणसाच्या श्रमशक्तीचा उपयोग होत नाही असे गृहीत धरून प्रश्न विचारीत असावेत असे वाटते.