मला हसू आले.
त्या बिचा-याला चळवळीचा गंधही नसावा; आणि असता तरी त्याला तिकिटाचे पैसे अधिक महत्त्वाचे होते. मग मात्र आम्ही निश्चिंत मनाने झोपलो. आमच्या संरक्षणासाठी खास पोलीस होता ! इतर पोलिसांना तर सोडाच, पण तिकीट-चेकरला सुद्धा तो डब्याकडे येऊ देणार नव्हता.
माझा मित्र सातारा रोडला उतरून गेला. मला घोरपडीला उतरावयाचे होते, माझ्या रक्षकाने मला घोरपडीला उतरविले. सुखरूपपणे स्टेशनच्या बाहेर नेऊन पोचविले आणि वर एक सलामही ठोकला. मी खूश होऊन त्याला आणखी दहा रुपये दिले.
१९४३ च्या मेमध्ये माझी पत्नी अतिशय आजारी पडली. ती मृत्युशय्येवर असल्याची बातमी मला मिळाली. या बातमीने मात्र मी विलक्षण अस्वस्थ झालो, लग्न झाल्यापासून तिला सुखाचे दिवस असे दिसलेच नव्हते. सतत मनस्ताप आणि काळजी. तिच्या संसाराची सुरुवातच अशी दु:खमय झालेली. त्यात तुरुंगवासाचा त्रास. माझ्या मोठ्या बंधूंचा मृत्यू... माझे मलाच अपराध्यासारखे वाटू लागले. या क्षणी तरी मला तिला भेटलेच पाहिजे, हा विचार तीव्रतेने मनात येऊ लागला. माझ्या अनेक सहका-यांनी असे करणे चूक आहे, असे सांगितले. पण शेवटी मी माणूसच होतो. माणसाचे गुणदोष माझ्यातही होते.
मी पत्नीला भेटायला जायचा निर्णय घेतला. त्या वेळी ती फलटणला आपल्या माहेरी होती. फलटण हे संस्थान होते आणि तेथील पोलीसप्रमुख हा माझ्या श्वशुरांचा अत्यंत जवळचा स्नेही होता. तेव्हा फलटणला जाण्यात फारसा धोका आहे, असे मला वाटले नाही. पत्नीला भेटून तिला धीर देऊन आपण सहज परत येऊ, अशी माझी कल्पना होती. त्या दृष्टीने रात्री पुण्याहून निघायचे, दहा वाजेपर्यंत फलटणला पोचायचे व पहाटे चार वाजता परत यायचे, असा कार्यक्रम ठरला होता. पण तो दुर्दैवाचाच दिवस असावा. आमची गाडी नीरा स्टेशनजवळ पंक्चर झाली. मी पहाटे चार वाजता फलटणला पोचलो. दुस-या दिवशी दुपारी वाड्याला पोलिसांचा वेढा पडला. ज्यांच्याबद्दल मला फार आशा वाटत होती, तो पोलीसप्रमुखच स्वत: दोन्ही हातांत दोन पिस्तुले घेऊन माझ्यापुढे आला. मला अटक झाली आणि माझ्या आयुष्यातील चळवळीचे एक पर्व संपले.