या धामधुमीत जिवावरचे गंभीर प्रसंग जसे येऊन गेले, तसे काळजाला चटका लावणारेही प्रसंग अनुभवावे लागले. माझा मित्र सदाशिव पेंढारकर असाच चटका लावून गेला. अत्यंत प्रेमळ व धडाडीचा कार्यकर्ता पकडला गेला आणि त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात कॅन्सर झाला आणि गेला. त्याच्या मृत्यूने मी अतिशय हळहळलो. अजूनही ते दु:ख केव्हा तरी तीव्रतेने मला जाणवते ! अशी काही दु:खे असतात, की काळाचा कितीही प्रवाह त्यांवरून वाहून गेला, तरी त्यांचा चटका विसरता येत नाही. सदाशिवचे दु:ख त्या प्रकारचे आहे.
पण यावर उतारा म्हणूनच की काय, योगायोगाने काही विनोदी प्रसंगही भूमिगत अवस्थेत माझ्यावर आले होते. त्यांतला वानगीदाखल एक सांगायला हरकत नाही. मला काही सहका-यांनी काही दिवसांसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे रेल्वेने पुण्याला जायचे ठरले. कराडहून रात्रीच्या गाडीने निघायचे. माझ्याबरोबर दोन मित्र होते. त्यांतील एकाने सेकंड क्लासची तिकिटे काढावयाची आणि दुस-याने डब्याच्या दाराजवळ उभे राहावयाचे. मी स्टेशनसमोरच्या रानात दबा धरून बसायचे अशी योजना होती. त्याप्रमाणे मी रानात दबा धरून बसलो. एकजण तिकीट काढायला गेला. गाडी आली. दुसरा डब्याजवळ थांबला. मी धावत प्लॅटफॉर्मवर गेलो आणि डब्यात शिरलो. वरच्या बर्थवर डोक्यावर पांघरूण ओढून झोपून राहिलो. जो मित्र तिकीट काढायला गेला होता, त्याचे आणि तिकीटमास्तरांचे भांडण जुंपले. त्यामुळे त्याला तिकीट मिळालेच नाही. गाडी सुरू झाली आणि एक पोलीस आमच्याच डब्यात शिरला. आम्हांला वाटले, आता सर्व संपले, येथून पळणे कठीण. कारण गाडी चालू झाली होती. तेवढ्यात पोलिसाने आम्हाला विचारले,
'कुठे जाणार आहात?'
'पुण्याला !' निर्विकारपणाने माझा मित्र म्हणाला.
'तिकिटं कुठाहेत तुमची?' पुन्हा पोलिसाचा प्रश्न.
'फार घाई झाल्यामुळे आम्हाला तिकिटं काढायला वेळ मिळाला नाही. पण आम्ही पुढच्या स्टेशनवर गार्डाला सांगणार आहोत.' मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो. पोलिसाने आमच्याकडे पाहिले आणि आम्हाला विश्वासात घेऊन बोलल्यासारखे तो म्हणाला,
'कशाला सांगताय् गार्डाला? मी आहेच की इथं. तिकिटाचे पैसे गार्डाला देण्याऐवजी मला द्या, म्हणजे झालं. मी तुम्हाला स्टेशनबाहेर सुखरूप पोचवीन.'