यशवंतरावांच्या संदर्भात अनेक मान्यवर लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांच्या संदर्भातील गौरवांक, विशेषांक, स्मरणिका, अभिनंदनपर ग्रंथ, दैनिकांतील अग्रलेख, संपादित ग्रंथ, तसेच त्यांच्याविषयी उपलब्ध नियकालिके, मासिके इ. चा लेखनासाठी उपयोग आहे. त्यांच्या अशा स्वरुपाच्या लेखसंग्रहामध्ये, संपादनामध्ये केला आहे. महाराष्ट्राच्या जीवनातील बहुतेक सर्व क्षेत्रातील आणि विविध व्यवसायातील व्यक्तींनी आपली मते प्रदर्शित केली आहेत. यामध्ये सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, प्राध्यापक, विचारवंत, विद्वान पंडित, व्यापारी, उद्योगपती, विविध पक्षातील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक अशा विविध व्यक्तींच्या आठवणीतून व त्यांच्या भावपूर्ण लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व जडणघडणीवर सहन प्रकाश पडतो. या लेखनातून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित स्तुत्य आहे. यशवंतरावांच्या आठवणी त्यांनी श्रद्धेने आणि भक्तीभावाने सांगितल्या आहेत. अशा या विविध स्मृतिलेखनातून यशवंतरावांचे मोठेपण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात हे लेखक निश्चित यशस्वी झाले आहेत. यशवंतरावांच्या सर्वस्पर्शी जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी या बहुमोल लेखांचा उपयोग होणार आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील संयमशील सहिष्णू, राजकीय मुत्सद्दी, सहित्य-कला यांचा उत्तम दर्दी, रसिक आणि गुणग्राहक नेता असे वर्णन कुणी केले तर न चुकता यशवंतराव चव्हाण साहेबांचेच नाव घ्यावे लागते. त्यामुळे तत्कालीन विचारधारेचा अभ्यास करताना जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैचारिक प्रगल्भता, त्यांची जीवननिष्ठा, साहित्य आणि संस्कृती याबद्दलचे त्यांचे विचार हे विविध लेखनसाहित्यात पाहावयास मिळतात. त्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल होत जाते. राजकारणात राहूनही त्यांनी आपले वेगळे साहित्यिक अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा पैलू आहे. त्यामुळे हे आधुनिक महाराष्ट्राचे सर्वार्थाने शिल्पकार झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड मानवता धर्मावर पोसलेला होता. स्नेह, जिव्हाळा, आपुलकी या माणुसकीच्या गुणांचे सुंदर मिलन त्यांच्या व्यक्तीमत्त्वात गुंफले गेले होते. त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही वैचारिक होती. असे हे माणुसकीचे ओथंबलेले, मराठी मातीचा गंथ लागलेले, विविध कलांचे भोक्ते असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्या काळाचा या व्यक्तिवर प्रभाव कसा पडला, त्यातून हे आदर्श अष्टपैलू सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व कसे उदयास आले, कसे द्ग्गोचर होत गेले हे त्यांच्या साहित्याच्या आधारे पाहणे महत्त्वाचे आहे. यशवंतरावांच्या इतका प्रचंड कामाचा आवाका असलेला, ज्याच्या कर्तृत्वाची पाळेमुळे सामान्य माणसाच्या जीवनात खोलवर रुतलेली आहेत असा, पहिला महाराष्ट्रीयन मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री व उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेला नेता स्वतंत्र भारतात झाला नाही.
डॉ. पंजाबराव जाधव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल म्हणतात, "श्री. यशवंतराव चव्हाण म्हणजे लोकशाही समाजवादाचा धन्वंतरी, विशाल दृष्टिकोन असलेला व समतोल बुद्धीचा राजकारणी, धुरंधर कर्तबगारीचा कुतुबमिनार - यशवंतराव म्हणजे भारतीय क्षितिजावर झळकणारा देदीप्यमान तारा. अपूर्व आकर्षणाचा लोहचुंबक, निर्भयतेचा महामेरू, पावित्र्याचा महासागर, उत्साहाचा नायगारा व चैतन्याचा महासिंधू होय." डॉ. पंजाबरावांना शास्त्र, इतिहास, भूगोल या सर्व विषयातील उपमांचा उपयोग करून यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करावेसे वाटणे साहजिक आहे आणि यातील प्रत्येक उपमा यशवंतरावांच्या बाबतीत खरी ठरली; सार्थ ठरली.
व्यक्तिचित्रण हा वाङ्मयप्रकार साधारणत: १९३०-४० नंतर मराठीमध्ये प्रचलित झालेला दिसतो. शब्दचित्र, व्यक्तिचित्र, स्वभावाचित्र इत्यादि पर्यायी शब्द प्रचलित आहेत. व्यक्तित्व चित्रण हे कधी काल्पनिक असू शकत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात एकूणच मराठी वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इ. संकेतापासून मुक्त झालेले दिसते. तसे दुस-या बाजूनेही लोकशाही मूल्यांमुळे स्वयंविकासी झाले आहे. हेच वाड्मयीन व्यक्तिमत्त्व पुढे व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक वाटा शोधीत राहिले आहे. यशवंतरावांसारख्या व्यक्तीचा व त्यांच्या साहित्यिक संस्काराचा परिणाम समाजावर सतत होऊन त्यात विविधता निर्माण होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या स्वभावातील विविध गुणांचा परिणामसुद्धा समाजावर होत असतो.