आपल्या घरी शब्दांचेच धन, त्यांचीच रत्ने, शस्त्रे आहेत. तेच आमच्या जीवाचे जीवन आहे व शब्दांचे धन आम्ही लोकांना वाटू असे तुकारामांनी फक्त म्हटले असे नव्हे तर ते त्यांनी प्रत्यक्षात आणले. यशवंतरावांनी सुद्धा शब्दांचे मोल असेच जाणले होते. त्यांच्या साहित्यातूनच सतत जीवनाबद्दलची खोल चिंतनशीलता मांडलेली आहे. " मी भाषेवर प्रेम करणारा मनुष्य आहे पण संकुचित अर्थाने अभिमानी राहिलो नाही." अशी विनम्रता देखील भाषेच्या बाबत दाखवतात. म्हणून साहित्य हे शब्दांच्या साह्याने साधलेले विविध अनुभवांचे सर्जन असते. शब्दांचे कार्य एका अनुभवाचे विश्व साक्षात प्रकट करणे, समूर्त करणे हे असते. अर्थात साहित्यात एकादी व्यक्ती शब्दांच्या साह्याने आपल्या अनुभवाचा शोध घेते. ते काम एखादी निर्मितिक्षम व्यक्तीच करू शकेल. म्हणूनच साहित्यात शब्दसामर्थ्याला अनन्ससाधारण महत्त्व आहे. यशवंतरावांचे शब्दसामर्थ्य त्यांच्या चिंतनविहारात विशेष स्वरुपात जाणवते. या चिंतनात सुरुवातीस एखादा स्वानुभव बहुधा येतो. त्या अनुभवातून मग चिंतन प्रेरणा घेते. चिंतनाच्या वेळी त्यांची वृत्ती गंभीर होते. चिंतनाच्या ओघात इतर अनुभव, उदाहरणे, दृष्टांत येतात. त्यांच्या चिंतनाचा पसारा मोठा आहे. त्याची व्यापकता सखोल आहे. त्याच्या पाठीमागे एक सामाजिक तळमळ आहे. मानवी जीवनाविषयी अथांग आस्था त्या चिंतनातून उत्कटतेने प्रत्ययास येते. यासाठी शब्दशक्तीचा उपयोग मोठ्या कौशल्याने त्यांनी केला आहे. समाजाच्या प्रबोधनासाठी व समाजाचा पिड घडवण्यासाठी साहित्यातील शब्दांचे सामर्थ्य फार प्रभावी आहे असा त्यांचा विश्वास होता ते म्हणतात, "सामर्थ्य म्हणजे त्यांच्या मनाचे सामर्थ्य, विचारांचे सामर्थ्य, त्यांच्या अनुभवांचे सामर्थ्य, आणि त्यांच्या शीलाचे सामर्थ्य. हे सामर्थ्य जेणेकरून वाढीस लागेल असा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी समर्थ साहित्य निर्माण झाले पाहिजे. माणूस मनाने व विचाराने युक्त व समर्थ बनण्यासाठी साहित्याची व शिक्षणाची आवश्यकता आहे.
साहित्यविषयक दृष्टिकोन
यशवंतरावांनी विविध वाङ्मय प्रकारांचा मनापासून अभ्यास केला आहे. तद्वतच जीवनविषयक प्रणालींचाही त्यांनी अभ्यास केला आहे. कार्ल मार्क्स, फ्रॉईड, गांधी, रॉय इ. प्रवृत्तीच्या विचारप्रणालींचा डोळसपणे अभ्यास केल्यामुळे यशवंतरावांना विविध कलांचे यथार्थ आकलन होऊ शकले. येणा-या नव्या काळाला अनुसरून मानवतेचा पुरस्कार करताना मानवतेला कलंक ठरू पाहणा-या घटनांचा आणि वृत्ती-प्रवृत्तींचा साहित्यातून धिक्कार झाला पाहिजे अशा स्वरुपाची त्यांची भूमिका होती. यशवंतरावांनी त्यांच्या साहित्य लेखनातून मानवी जीवनाच्या विकासाचा विचार नेहमीच केला आहे. देश, काल, स्थितीचा विचार करता मानवता हाच नव्या युगाचा मंत्र असेल असे त्यांना वाटते ते म्हणतात, "आपली प्रगती करून घ्यायची तळमळ खुद्द जनतेलाच असायला हवी. आपली गरीबी आपण नाहीशी करावी. आपले जीवन समुद्ध व्हावे. आपल्या मुलाबाळांना जीवनात स्थैर्य मिळावे ही तळमळ प्रत्येक व्यक्तीत निर्माण झाल्याशिवाय तिची प्रगती होणार नाही. " यशवंतरावांनी आपल्या साहित्यातून मानवी विकासावर जास्त भर दिला आहे. जीवनातल्या अंतिम सत्याला म्हणजेच मानवतेच्या मूल्याला त्यांनी महत्त्व दिले आहे.
साहित्याचा आणि समाजजीवनाचा असणारा संबंध यशवंतरावांना अपरिहार्य वाटतो. किंबहुना समाजजीवनाचे वास्तव चित्रण परिणामकारकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. केवळ साहित्यिकाची प्रतिभा प्रक्षुब्ध झाल्याशिवाय नवनिर्मिती करू शकत नाही आणि जेव्हा प्रतिभेला प्रत्यक्ष समाजातील अन्यायकारक घटना दिसते तेव्हा ती प्रक्षुब्धतेने प्रकट होते. "जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कोणी घालू शकेल असे मला वाटत नाही. " असे यशवंतराव म्हणतात. समाजजीवनातील घटनांनी बैचेन झालेला साहित्यिकच अशी सहजपणे सुंदर निर्मिती करू शकतो. घटना तात्कालिक असल्या तर तात्कालिकाला चिरंतनाचे रूप देण्याचे सामर्थ्य श्रेष्ठ साहित्यिकाच्या प्रतिभेत असते असा त्यांचा ठाम विश्वास होता ते म्हणतात, "देशातील लेखक, विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्या प्रयत्नाने निर्माण होणारे जे विचारधन आहे, ते खरे म्हणजे समाजाचे फार मोठे धन आहे असे मी मानतो. ते असले म्हणजे देश ओळखला जातो. समाज ओळखला जातो.