वसंतराव नाईक यांनी तर पत्रकार परिषद घेऊन यशवंतरावांचे नांव जाहीर करण्याचा घाट घातला तेव्हा यशवंतरावांनी त्यांना ही गोष्ट सबुरीनं घेण्यास सांगितलं. उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता सल्लामसलतीसाठी आणि अंतिम मत अजमावण्यासाठी यशवंतराव इंदिरा गांधींच्या निवासस्थानी गेले असताना त्यांना काही वेगळंच ऐकावं लागलं. इंदिरा गांधींनी सांगितलं की माझा पाठिंबा आहे परंतु उत्तर प्रदेशचे बरेच खासदार भेटले आणि त्यांनी तुम्ही स्वत:साठी का प्रयत्न करत नाही, असे विचारले. किंबहुना तसा त्यांचा आग्रह आहे. यशवंतरावांना इंदिराजींचा चाणाक्षपणा तिथेच उमजला. त्या एकत्रित चर्चेसाठी येत होत्या, अनुकूलता दर्शवित होत्या, पण त्याचवेळी त्या गुप्तपणे स्वत:साठी वेगळ्या हालचाली करीत होत्या. ज्या व्यक्तीला उत्तरप्रदेश खासदारांचा संपूर्ण पाठिंबा लाभतो त्याची ह्या जागेसाठी हमखास निवड होते हे यशवंतराव जाणून होते. अन्य कुठल्याही राज्यापेक्षा उत्तरप्रदेशच्या खासदारांची संख्या अधिक असते. त्यामुळे ते पारडे जड ठरते.
यशवंतरावांनी याच बैठकीत आपली भूमिका मोकळेपणानं सांगितली. पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा असेल आणि अन्य नेतेमंडळी याबाबतीत सहकार्य देत असतील, पाठिंबा देणार असतील, तर मी स्वत: या मैदानातून बाजूला आहे असं निश्चित समजा. माझी सर्व मतं तुम्हालाच मिळतील.
इंदिराजींनी सर्व ऐकलं आणि शांत राहिल्या. या पूर्वीच्या चर्चेच्या वेळी इंदिराजींनी स्वत:ची भूमिका कधी सांगितली नव्हती किंवा यशवंतराव निवडणूक लढवणार असतील, तर आपला पाठिंबा राहील असा शब्द उच्चारला नव्हता.
यशवंतरावांच्या पाठिंब्याची इंदिराजींना खात्री मिळताच त्यांनी लगेच पत्रकारांना सांगितलं की आम्ही दोघे एकमेकांच्या विचारानंच पावलं टाकीत आहोत! यशवंतरावांच्या पाठिंब्यामुळं इंदिराजींचा मार्ग मोकळा झाला. तसं पाहिलं तर संपूर्ण मार्ग मोकळा झालेला नव्हता. त्यांच्यातील अतुल्य घोष यांचा इंदिराजींना ठाम विरोध होता. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांनी मोठी खेळी केली. पुढेमागे विशेष प्रसंग निर्माण झाल्यास इंदिरा गांधींना दूर करण्यास विशेष कष्ट पडणार नाहीत असा पवित्रा स्वीकारून इंदिरा गांधींच्या निवडीबाबत सहकाऱ्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांची अनौपचारिक बैठक घेतली आणि एका खोलीत बसून एकेका खासदाराला बोलावून मनोदय सांगितला. त्यांनी बोलाविलेल्या सर्व खासदारांचा इंदिरा गांधींना पाठिंबा होता किंवा कसे हे कधीच उजेडात आले नाही. कोणी वाच्यताही केली नाही. परंतु सर्वांचा इंदिरा गांधींना पाठिंबा असल्याचं कामराजांनी जाहीर केलं. मोरारजींनी पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. अखेर प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळी इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत प्राप्त झालं. पंतप्रधानपदी त्या आरूढ झाल्या.