विरंगुळा - ७४

तिरप्या चालीची
प्रचिती दिल्लीची

भारत-पाकिस्तान यांच्यातील ज्या युद्धानं यशवंतरावांची प्रतिमा उजळ झाली त्या युद्धाला १९६५ च्या १ सप्टेंबरपासून खऱ्या अर्थानं तोंड लागलं आणि २३ सप्टेंबरला त्याचा शेवट पाकिस्तानच्या पराभवानं झाला. त्याच दिवशी दोन्ही बाजूनं युद्धसमाप्तीची घोषणा झाली. अमेरिका, ब्रिटन, रशिया यांच्या दबावामुळेच अखेर हे युद्ध थांबलं. राष्ट्रसंघानं ६ सप्टेंबरला युद्धबंदीचा ठराव केला होता आणि शास्त्रींना तो मान्य होता. शास्त्रीजींना यशवंतरावांचा पाठिंबाच होता.
युद्धसमाप्तीनंतर या दोन देशांमध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी, या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी रशियाचे पंतप्रधान कोसिजिन, शास्त्रीजी आणि पाकिस्तानचे प्रमुख आयुबखान यांना त्यांनी ताश्कंद येथे चर्चेसाठी निमंत्रित केलं. त्यानुसार २ जानेवारी १९६६ला लालबहाद्दूर शास्त्री, यशवंतरावांसह ताश्कंदला रवाना झाले. नियोजित कार्यक्रमानुसार ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या चर्चेत संरक्षणमंत्री या नात्यानं यशवंतराव सहभागी झाले. लष्करी प्रश्नांच्या संदर्भात शास्त्रीजींना आवश्यक तो महत्त्वाचा सल्ला देण्याचं काम त्यांनी केलं. या संपूर्ण चर्चेत सातत्यानं ते शास्त्रीजींच्या सहवासात राहिले. या चर्चेमध्ये काश्मीर प्रश्नाविषयीची चर्चा उपस्थित केली जाऊ नये असा शास्त्रीजींचा आग्रह होता. आयुबखान यांना राजकीयदृष्ट्या, काश्मीरच्या प्रश्नाचा निकाल या चर्चेमधेच करायचा होता. यामुळे वाटाघाटीत काहीसा पेच निर्माण झाला. दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान शांतता प्रस्थापित करणं हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होता. अखेरीस कोसिजीन यांनी मुत्सद्देगिरीनं चर्चा सुरू ठेवली. ताश्कंदमधील चर्चेबाबत ६ जानेवारी १९६६ रोजी यशवंतरावांनी नोंद करून ठेवली ती अशी -
-----------------------------------------------------------
ताश्कंद
६ जानेवारी १९६६

दोन दिवस नित्याप्रमाणे नवीन वातावरणाशी समरस होण्याच्या प्रयत्नांत गेले. चर्चा, संमेलने चालूच होती. परंतु बरेच स्वरूप औपचारिक होते.

काल दुपारपासून मूळ मुद्याला हात घातला गेला आहे. आज आणि उद्या हे या चर्चेतील महत्त्वाचे दिवस आहेत.

प्रेसिडेंट आयूब आणि भुत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रे. आयुबला व्यक्तिमत्व आहे. उंचापुरा पठाण. चेहऱ्यावर नाटकी हास्य भरपूर. बोलणेही अघळपघळ आणि गोड. माणूस प्रामाणिक नाही वाटत. त्याच्या शब्दावर भरवंसा ठेवणे अवघड - नव्हे धोक्याचे आहे.

भुत्तोशी बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. पहिले दोन दिवस थंड बसून होता. काल दुपारी पहिला सामना झाला. बोलण्या वागण्यात करेक्ट होता. आपले म्हणणे स्पष्ट शब्दात, काही आडपडदा न ठेवता त्याने मांडले.