गणपतरावांचं निधन झालं त्या वेळीं त्यांच्या सर्वांत धाकटा मुलगा राजा ही दीड वर्षांचा होता. लहानपणींच वडील गेल्यामुळे चव्हाण-बंधु पोरके झाले होते. आता त्यांचीं मुलंहि तशींच पोरकीं झाली. या मुलांचं संगोपन त्या परिस्थितींत आजीला – विठाबाईंनाच करावं लागलं. कारण या मुलांची आई- गणपतरावांच्या पत्नी याहि क्षयानं आजारी झाल्या होत्या. त्यांचा आजार हा १९५१ पर्यंत वाढत राहिला आणि त्या आजारानं या मुलांच्या आईलाहि इहलोकांतून उचललं.
पार्लमेंटरी सेक्रेटरी होण्याच्या अगोदरपासूनच यशवंतरावांच्या पाठीशीं ही कौंटुंबिक व्यथा सुरू झाली होती. १९५१ पर्यंत बंधु आणि भावजय हे घरांतले जवळचे दोन जीव उडून गेले. तरीहि व्यथेचा शेवट अजून झाला नव्हता. ‘चले जाव चळवळीं’तला सौ. वेणूबाईंचा तुरूंगवास आणि ज्ञानोबांचा मृत्यु या धक्क्यानं सौ. वेणूबाईंची प्रकृति ढासळलीच होती. मनाला बसलेल्या धक्क्यानं त्यांना अलीकडे फीटस् येत होत्या. त्यांतच घरांत थोरले दीर आणि जाऊबाई हे क्षयानं आजारी झाल्यानंतर त्यांची सेवा-शुश्रूषाहि त्यांना करावी लागली. याचा परिणाम असा झाला की, अगोदरच अशक्त बनलेल्या सौ. वेणूबाईंनाच क्षयानं गाठलं. यशवंतरावांवर ही आणखी एक आपत्ति आली.
सौ. वेणूबाई त्या वेळीं कराडलाच होत्या. त्यांचा आजार इतक्या झपाट्यानं बळावला की, शरीराचा केवळ हाडांचा सापळा बनला. त्यांनाहि मग मिरजेचाच रस्ता धरावा लागला. यशवंतराव मुंबईंत आणि पत्नी अत्यवस्थ स्थितींत कराडांत, अशी अवस्था होती. घरांत विठाई आणि सर्व लहान मुलं. अशा स्थितींतच सौ. वेणूबाईंना मिरजेला दवाखान्यांत नेण्याचा प्रश्न निर्माण झाला. विठाईचा लहान भाचा शामराव पवार त्या वेळीं कराडांत होता. अखेर ती कामगिरी त्यानंच पार पाडली. शामरावचं वय अवघं सोळा-सतरा वर्षांचं होतं. त्यानं एका मोटारीची व्यवस्था केली; पण घरांतून स्वत:च्या पायानं चालत येऊन मोटारींत बसण्याइतकीहि शक्ति वेणूबाईंच्या शरीरांत उरली नव्हती. शामनंच मग त्यांना उचलून मोटीरींत ठेवलं. सोळा-सतरा वर्षांच्या मुलांनं उचलून मोटारींत नेऊन ठेवावं, इतक्या सौ. वेणूबाई विकलांग झाल्या होत्या.
मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये त्या वेळीं डॉ. जॉन्सन या नांवाचे तज्ज्ञ डॉक्टर होते. सौ. वेणूबाईंन मिरजेला त्यांच्याकडे औषधोपचारासाठी दाखल करतांच यशवंतराव हे मिरजेला गेले. १९४९-५० सालांतली ही घटना. पत्नी आणि वहिनी दोघीहि क्षयानं आजारी ! पण डॉ. जॉन्सन यांनी धरी दिला; आणि औषधोपचार सुरू झाला. वेणूबाईंना खडखडीत बरी करतों. अशी डॉक्टरांनी खात्री दिली. त्या वेळीं क्षयप्रतिबंधक औषधं उपलब्ध होऊं लागलीं होतीं. मिशनरी डॉक्टर हे सेवावृत्तीचे ! त्यांनी वेणूबाईंची सेवा सुरू केली. डॉ. जॉन्सन पराकाष्ठा करीत होते. औषधं सुरूच होतीं. पण असा एक क्षण निर्माण झाला की, त्या वेळीं रूग्णाला रक्त देण्याची गरज भासली. रक्तपुरवठ्यासाठी मग योग्य अशा रक्ताची शोधाशोध सुरू झाली. मुंबईला त्या वेळीं आवश्यक त्या नमुन्याचं रक्त मिळत असे; पण मुंबईतील रक्तपेढींतून तें रक्त बाहेर काढल्यानंतर कांही तासांतच मिरजेला पोंचवायचं तर जलदगतीच्या वाहनाची व्यवस्था आवश्यक होती आणि परिस्थिति तर त्या दृष्टीनं अनुकूल नव्हती. त्यामुळे विशिष्ट नमुन्याचं रक्त मिरजेंतच उपलब्ध व्हावं यासाठी निरनिराळ्या व्यक्तींचं रक्त तपासण्याचा उपक्रम डॉ. जॉन्सन यांनी सुरू केला. अनेकांचं रक्त तपासल्यानंतर अखेर शाम पवार या मुलाचच रक्त जुळत असल्याचं आढळून आलं. वेणूबाईंना रक्त-पुरवठा मिळाला तो शामच्याच रक्ताचा ! वेणूबाईंचीं दोन्ही बाजूंचीं फुफ्फुसं रोगानं व्यापलीं होती. परंतु डॉ. जॉन्सन यांची चिकाटी दांडगी. ‘आय विल् बिल्ड हर अप्’ अशी खात्री त्यांनी यशवंतरावांना दिली होती. त्याप्रमाणे सहा-सात महिने सतत प्रयत्न करून डॉक्टरांनी आपला शब्द खरा केला. रोगाचा निचरा केला आणि त्यानंतरच वेणूबाईंना मुंबईला नेतां येणं शक्य झालं. मुंबईंत पोंचल्यावरहि औषधोपचार सुरू ठेवणं आवश्यकच होतं. पुढच्या काळांतहि प्रकृति आणि औषधं यांनी त्यांची कायमच सोबत ठेवली.