८
----------------
निवडणुका संपल्या आणि पुन्हा काँग्रेसचीं मंत्रिमंडळे देशांत अधिकारावर आलीं. बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे त्या वेळीं नेते होते. त्यांनी आपलं मंत्रिमंडळ तयार केलं आणि त्यांत मोरारजी देसाई, जिवराज मेहता अशांसारख्या ज्येष्ठांचा समावेश केला. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे नेते. जिल्ह्याच्या बाहेरहि त्यांचं नेतृत्व आता पोंचलं होतं. निरनिराळ्या ठिकाणांहून त्यांना भाषणासाठी आमंत्रणं दिलीं जात होतीं. वस्तुत: खेर-मंत्रिमंडळांत यशवंतरावांना मंत्रिपद लाभेल, अशीच सातारा जिल्ह्याची अपेक्षा होती. मंत्रिमंडळांत त्यांचा समावेश झाल्याचं पहाण्यासाठी जिल्हा आतुर झाला होता; परंतु बाळासाहेब खेर यांनी सातारा जिल्ह्याच्या भावनेची कदर केली नाही. लोक भेटले, चर्चा झाल्या, परंतु खेर यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नाही.
पुष्कळ चर्चा झाल्या. अखेर यशवंतरावांना त्यांनी पार्लमेंटरी संक्रेटरीपद देण्याचं तेवढं मान्य केलं. खेरांची ही मेहरबानी मान्य करण्यास यशवंतरावांचं मन मात्र तयार नव्हतं. पार्लमेंटरी सेक्रेटरीपद दिल्यानं त्यांचा हिरमोड झाला होता. या संदर्भांत पुढे पंधरा दिवस चर्चा सुरू होत्या. यशवंतरावांनी पार्लमेंटरी सेक्रेटरीपद स्वीकारावं असा मित्रांचा सल्ला होता. त्यांनी तो आग्रहच सुरू ठेवला आणि मित्रांच्या आग्रहाखातर पंधरा दिवसांनंतर त्यांनी त्याला होकार दिला. यशवंतरावांनी मंत्रिमंडळाशीं या ना त्या संदर्भांत संबंधित असणं सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे, अशी त्यांच्या सल्लागारांची भूमिका होती.
वस्तुत: त्यांना मंत्रिपदाची आसक्ति अशी नव्हतीच. जनतेंत राहून काम करण्याचा त्यांचा पिंड असल्यानं मंत्रिपदाच्या बहुमानामागे धांवण्याची त्यांची प्रवृत्ति नव्हती. परंतु सातारा जिल्ह्यांतील बेचाळीसची चळवळ, त्या चळवळींतून निर्माण झालेलं प्रति-सरकार, आणि इंग्रज सरकारची दडपशाही यांतून अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. अनेकांविरूद्ध वाँरंटं होतीं. खटले सुरू होते. अनेकांना पूर्वीच शिक्षा झाल्या होत्या. हा सर्वच प्रश्न आपुलकीनं आणि कौशल्यानं हाताळील असा आपला माणूस मंत्रिमंडळांत असावा, ही सातारा जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची स्वाभाविक इच्छा. त्याचसाठी यशवंतरावांना मंत्रिपद बहाल करावं असा आग्रह श्री. बाळासाहेब खेर यांना केला जात होता. पण तें घडत नाही असं पाहिल्यावर, पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून का असेना, पण त्यांनी मंत्रिमंडळाशीं संबंधित असलं पाहिजे, मुंबईंत असलं पाहिजे, या भूमिकेंतून यशवंतरावांना खेर यांनी देऊं केलेली जागा स्वीकारण्यास भाग पाडलं. सर्वसाधारणत: विचार करून यशवंतरावांनीहि तें मान्य केलं. लोकसेवेसाठी मिळेल तें स्वीकारून अधिक मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचा लोकमान्य टिळकांचा आदर्श त्यांच्यासमोर होताच. त्याच भूमिकेंतून ते मुंबईच्या सचिवालयांत १९४६ ला एक दिवस दाखल झाले.
यशवंतरावांनी नव्या जागेंचीं सूत्रं स्वीकारलीं तो दिवसहि मोठा भाग्याचा म्हणावा लागेल. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. सातारा जिल्ह्याच्या क्षेत्रांतून निघून मुंबई राज्याच्या व्यापक क्षेत्रांत चव्हाण दाखल झाले ते याच दिवशीं! प्रारब्धानंच हा योग जुळवून आणला असला पाहिजे. अन्यथा पंधरा दिवस चर्चेंत खर्च झाले नसते. या दिवसानं यशवतंरावांच्या भवितव्याचा मार्ग खुला केला आणि डॉ. आंबेडकरांची पाठराखण करीत याच दिवसानं त्यांना दिल्लींत पुढच्या काळांत दाखल केलं असलं पाहिजे.
यशवंतरावांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा अनुभव जमेस धरतां त्यांना मंत्रिमंडळांतच समाविष्ट करून घेतलं जाणं वाजवी ठरलं असतं. पार्लमेंटरी सेक्रेटरी या नात्यानं त्यांनी आणखी उमेदवारी करावी आणि शिकावं याची वस्तुत: आवश्यकता नव्हती. पण बाळासाहेब खेर यांचा ढाचा वेगळा. सरदार पटेल यांच्या मुशींत ते तयार झालेले होते. खेर राजकारणी नेते होते, पण त्यांचा खरा पिंड सॉलिसिटरचा – कायदेशीरपणानं काम करण्याचा असे. व्यावसायिक हितसंबंधांचं रक्षण करण्यावरच त्यांची मिळकत आणि जीवन अवलंबून असल्यानं त्या संबंधांत त्यांना प्रामाणिक रहाणं क्रमप्राप्तच होतं. काँग्रेसच्या ध्येय-धोरणाला त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं हें खरं, पण ते स्वत: नागरी भागांतील बुद्धिवादी होते. ग्रामीण भागांतील जीवनाचा अनुभव त्यांच्या संग्रहीं कमी. त्यामुळे खेड्यांतील लोक-जीवनाच्या प्रश्नासाठी ख-या अर्थानं त्यांनी तळमळ बाळगावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतां येण्यासारखी नव्हती.