आयुष्यांत या माऊलीच्या वांट्याला दु:खामागून दु:खं आली, पण तिचा सोशिकपणा कायम राहिला. आपली संस्कारांची श्रीमंती विठाईनं मुलापर्यंत पोंचवली आणि जीवनभर संकटाशी सामना करण्यासाठी त्यांना हिंमतवान बनविलं. "नका बाळांनो डगमगूं ! चंद्र-सूर्यावरील जाईन ढगू ।।' या त्यांनी स्वत:च रचलेल्या ओवींतून मुलांना उपदेश मिळत होता. परिस्थितीच ढग जमले असले तरी, आज ना उद्या ते जातीलच. चंद्राला आणि सूर्याला ढगांनी झाकण्याचं शौर्य दाखवलं, तरी तें क्षणकाल टिकणारं असतं. ढग आपल्या वाटेनं निघून जातात आणि चंद्र-सूर्याची प्रभा स्थिर रहाते. व्यावहारिक जगांत वावरतांना चव्हाण-कुटुंबावर संकटं कोसळत राहिली. घाबरून, गांगरुन जावं अशी तीं संकटं होतीं. विठाईसारखी निराधार माता त्या संकटानं घाबरणं, गांगरणं स्वाभाविक असलं तरी एखाद्या असामान्य स्त्रीप्रमाणे स्वत:ला आणि मुलांनाहि सावरायचं, हाच आदर्श तिनं निर्माण केला. वर्षानुवर्षे दु:खाशी सोबत करुनहि दिलाचा दिलदारपणा रहाणं हें देणं देवाचं असावं लागतं. विठाईला आणि यशवंतरावांनाही तें देणं जन्मजातच मिळालं असावं. परिस्थितीच्या चक्रव्यूहांतन हळुवारपणे बाहेर पडणं त्यामुळेच यशवंतरावांना साधतां आलं.
मातेकडून मिळलेल्या सर्व गुणांचं संवर्धन यशवंतरावांच्या शालेय जीवनांत घडत राहिलं. देवराष्ट्राच्या प्राथमिक शाळेंत बंडूमास्तरांचे-गोवंडे गुरुजींचे संस्कार बालपणांत त्यांना लाभले आणि तिथून कराडला टिळक हायस्कूलमध्ये आल्यानंतर दत्तोपंत पाठक, शेणोलीकर, हायस्कूलचे हेडमास्तर द्विवेदी आदि गुरुजनांकडून धडे मिळत राहिले. हे गुरुजन नमुनेदार शिक्षण तर देत होतेच, शिवाय यशवंत चव्हाण या विद्यार्थ्याबद्दल त्यांना जिव्हाळा होता. वैयक्तिक संबंध ठेवून ते लक्ष देत होते. यशवंतराव खेड्यातून आले होते, पण ते तसे खेडवळ राहिलेले नव्हते. शाळेंतल्या अभ्यासाबरोबर, त्या चार भिंतींच्या पलीकडल्या जगांत घडणा-या घटना हाहि त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. विविध विषयांवरील पुस्तकांचं वाचन सुरु होतं. त्यांचे मधले बंधु गणपतराव, त्यांना परिस्थितीमुळे फार शिक्षण घेतां आलं नाही; पण यशवंतानं खूप शिकावं असा त्यांचा प्रयत्न होता. ज्ञानोबा हे थोरले बंधु. कुटुंबाचे पालनकर्ते तेच होते. तुटपुंजा पगारांत यशवंतासाठी होईल तेवढं साहाय्य ते करीत राहिले.
मधले बंधु गणपतराव यांचं मात्र आपल्या धाकट्या भावाकडे बारकाईनं लक्ष असे. गणपतराव हा एक उमदा माणूस होता. शरीरयष्टि मजबूत. कुस्त्यांचा लहानपणापासून नाद. गणपतराव मोठे कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी होते. परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करतां आलं नाहीं, मॅट्रिकपर्यंतच ते शिकले; पण यशवंतानं खूप शिकावं, कर्तृत्ववान् व्हावं ही त्यांची दांडगी इच्छा. त्यांना स्वत:ला शिक्षण सोडावं लागलं असलं तरी अन्य कांही कर्तबगारी करावी आपली गरिबीची परिस्थिति बदलून टाकावी यासाठी कांही ना कांही त्यांचे उद्योग सुरु असत. ते मोठे हिकमती होते. चलाखपणामुळे तर भल्या भल्या पहिलवानांना माती चारीत. गणपतराव आणि यशवंत यांच्या वयांत फार मोठं अंतर नव्हतं. ते दोघे बरोबरीनंच वागत असत. गणपतरावांबरोबर यशवंतहि लहानपणीं तालीम करुं लागला आणि कुस्त्या खेळूं लागला. गणपतरावांचा पेहराव खास सातारी. डोईवर फेटा हा असायचाच. यशवंताहि फेटा बांधून भावाबरोबर पहिलवानी थाटांत हिंडत असे. यशवंत अभ्यासांत जसा हुषार आणि तल्ल्ख बुध्दीचा तसाच कुस्ती करण्यांत चलाख. शाळेमध्ये त्यानं अनेकदा कुस्तीचे फड जिंकले.