राजकीयदृष्ट्या सातारा जिल्हा प्रथमपासूनच जागृत राहिलेला जिल्हा, काँग्रेसचं लोण ह्या काळांत सातारा जिल्ह्यांत पसरलं होतंच. सातारा जिल्हा तसा प्रागतिक विचाराचा. पण या प्रागतिक विचारवंतांमध्ये सुखवस्तु वर्गांतील लोकच रस घेत होते. बहुजन-समाजांतल्या खास उल्लेखनीय व्यक्ति काँग्रेसच्या स्वराज्याच्या चळवळींत त्या काळांत विशेषत्वानं सामील झालेल्या नव्हत्या. कोल्हापूरच्या छत्रपति शाहूमहाराजांनी सामाजिक समानतेच्या प्रश्नाला उठाव दिल्यानंतर मात्र १९१०-११ मध्ये सातारा जिल्ह्यांत बहुजन-समाजांत त्याचे पडसाद उमटूं लागले. भास्करराव जाधवांसारख्या मंडळींनी सातारा जिल्ह्यांत येऊन जोमानं कामाला प्रारंभ करतांच या लाटा तालुके आणि खेड्यांपर्यंत पसरल्या. खेड्यांतील विद्यार्थ्यांसाठी मग भराभर शाळा निघूं लागल्या. कर्मवीर भाऊराव पाटील हे भास्करराव जाधव यांच्या पुढारीपणाखाली चाललेल्या सत्यशोधक-समाजाच्या चळवळींत प्रथम उदयास आले. ही सत्यसोधक-चळवळ रुंदावत चालली, परंतु त्यांतून ग्रामीण जनतेच्या शिक्षणाचं एक आंदोलन निर्माण झालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व भाऊराव पाटील यांनी अखेरपर्यंत केलं. त्याकरिता त्यानी रयत शिक्षण संस्था स्थापिली. त्यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या कामालाहि चांगलीच चालना मिळाली आणि लहान-मोठ्या गावीं सर्वत्र शाळा दिसूं लागल्या. बहुजन-समाजाला माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी सत्य-समाजाची ही चळवळ सुरु झाली होती. ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यांतीलच कटगुण हें होय. परंतु ते होते पुण्यांत; आणि प्रारंबीची कर्तबगारी पुण्यांतच झाली. त्यांनी उद्घोषिलेली सत्य-समाजाची चळवळ सातारा जिल्ह्यांत कोल्हापूरमार्गे पोंचल्यानंतर ब्राह्मणांचं वर्चस्व फेकून देण्याच्या नादांत कांही विकृत गोष्टी घडूं लागल्या, कांही ठिकाणीं अत्याचारघडले. काँग्रेसची चळवळ आणि अन्य चळवळी या ब्राह्मणांसाठी चाललेल्या चळवळी असल्याचा जावई-शोध सत्य-समाजी लावूं लागले. वस्तुत: शेतक-यांच्या आणि बहुजन-समाजाच्या हिताची जपणूक करण्याकडे सातार जिल्ह्यानं प्रत्येक चळवळींत कटाक्षानं लक्ष पुरवलं होतं; पण सत्य-समाजीयांनी त्याचा विपर्यास केला. तथापि या जिल्ह्यांतील एकोपा भंग पावला नाही. राष्ट्रीय हिताच्या कामांत समंजसपणानं सामील व्हायचं हा या जिल्ह्यानं सांभाळलेला शिरस्ता आहे. टिळकांच्या देहावसानानंतर, १९२० च्या पुढे म. गांधी-युग अवतरलं तेव्हापासून तर सातारा जिल्ह्यांतल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला अधिकच जोर आला.
काँग्रेसच्या प्रारंभापासून सातार जिल्हा अखिल भारतीय प्रयत्नांशी, विचारांशी सहभागी झालेला आहे. या जिल्ह्याचे प्रतिनिधि प्रतिवर्षी काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहात आणि सभेचा संदेश, आपल्या जिल्ह्यांत गावोंगाव पोंचविण्याचं कार्य पुढे सातात्यानं सुरु ठेवत असत. काँग्रेसचं कार्य व धोरण बहुजन-समाजापर्यंत पोंचवण्याची या जिल्ह्याची जुनी परंपरा आहे. हिंदुस्थानांत त्या काळांत ज्या ज्या वेळीं जें इष्ट घडलं त्याला सातारा जिल्ह्यानं जागरुकतेनं उत्कट प्रतिसाद दिला आहे.
वडील बळवंतराव निवर्तल्यानंतर यशवंत चव्हाण देवराष्ट्र येथील शाळेंतील प्राथमिक शिक्षण संपवून कराडला पुढच्या शिक्षणासाठी दाखल झाला तो १९२१-२२ चा काळ हा असा स्वातंत्र्य-चळवळीनं, विचारानं भारलेला आणि भरलेला होता. अवतीं-भवतीं चळवळच दिसत होती आणि ऐकायला मिळत होती.