प्रकाशकीय-४

विधानसभेत पाकिस्तान व चीन धार्जिणे पक्ष व व्यक्ति यांच्या कृत्यांना आळा घालण्याची कपात सूचना विचारार्थ आली. या कपात सूचनेस उत्तर देताना ''कोणत्याही राष्ट्रविरोधी कृत्यांपुढे सरकार नमणार नाही'' अशी निःसंदिग्ध भाषा त्यांनी वापरली होती. लोकशाही विकेंद्रीकरण समितीच्या अहवालावर बोलताना ते म्हणाले की, लोकशाही संघटनांचे प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या स्वरूपात अभिव्यक्तिकरण (Experession)  कोणत्या स्वरूपात करावे यासंबंधी सर्व देशभर चर्चा चालू आहे. या गोष्टीलाच अनुलक्षून असे मानले जाते की आम्हाला पंचायत राज्य निर्माण करावयाचे आहे. ते पुढे सांगतात, ग्रामपंचायत म्हटलं की माझ्या डोळयापुढे नवीन तर्‍हेचे शिक्षण आणि नवीन तर्‍हेच्या शक्ती उभ्या रहातात. खेडयापाडयात आज सहकारी चळवळ पसरत असून औद्योगिक वाढ होण्याकरिता खेडयापाडयात विद्युतशक्ती देण्यासंबंधीचे विचार पोहोचत आहेत. हे लक्षात ठेवून आम्हाला ग्रामीण जीवनातील लोकशाही संघटना उभी करावयाची आहे, हा लोकशाही विकेंद्रीकरणाच्या पाठीमागचा खरा विचार, खरी समस्या आहे.

ग्रामसंघटना ही शेवटची संघटना आणि राज्यसंघटना ही सर्वात वरची संघटना. या संघटनांना सत्ता दिली पाहिजे हे निश्चित. विकासाची जबाबदारी ह्या संघटनांवर टाकावयास हवी.

औद्योगिक विकास महामंडळ विधेयक मांडताना राज्याचा औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी एका वैधानिक औद्योगिक विकास मंडळाची आवश्यकता कशी आहे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पानशेत दुर्घटनेबाबत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वासाच्या ठरावास मा. श्री. यशवंतरावांनी उत्तर दिले. पानशेतचे धरण फुटल्यानंतर खूपच संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात एक महत्त्वाचा कागदच गहाळ झाला. त्यावर कडी म्हणजे ज्या न्या. बावडेकर यांचा आयोग नेमला होता त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे संशयाचे वातावरण आणखी गडद झाले. यासंबंधी काही सूचना सभेत झाल्या. त्यांना उत्तर देताना यशवंतराव जे बोलले त्यातून त्यांचा मोठेपणा, लोकशाहीवरील विश्वास आणि विरोधकांविषयीचा आदरच व्यक्त होतो. ते म्हणाले होते, ''सन्माननीय सभासद श्री. अत्रे आणि श्री. डांगे हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि ज्या वातावरणात मी वाढलो आहे त्यात वयाचा मोठेपणा मानावयास शिकविले आहे...'' आम्ही जी यंत्रणा उभारली आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करीत आहोत ती लोकशाहीला धरून आहे की नाही हे आपण पहा. माझ्याही पक्षातील लोकांना ह्याबाबतीत स्वतंत्र मतदान करण्याची इच्छा असेल तर याच ठिकाणी उघडपणे मी माझ्या पक्षातील सदस्यांनाही अशा प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे की, त्यांनी कोणत्याही बाजूने मतदान करावे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org