यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठामाता. त्यांचे माहेर देवराष्ट्र. या गावातील दाजीबा घाटगे यांच्या त्या भगिनी. विठामाता यांचे शालेय शिक्षण झाले नसले तरी त्यांना शिक्षणाबद्दल जिव्हाळा होता.आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे ही त्यांची भूमिका होती. मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी स्वत: खूप कष्ट घेतले. विठामाता यांच्या अनेक आठवणी यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंधमध्ये सांगितल्या आहेत. त्या आठवणी त्यांचा थोरपणा, त्यांची महती दाखवून देतात. कमालीचे दारिद्य्र, खडतर परिस्थितीवर मात करून त्या माऊलीने आपल्या मुलांना आधार दिला. अगदी चव्हाण साहेबांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांच्या घरची परिस्थिती प्रतिकूल होती.
यशवंतराव चव्हाण यांची जडणघडण होत असताना या माऊलीने त्यांच्यात एक आशावाद पेरला. त्या स्वतः ओव्या रचायच्या. जात्यावर धान्य दळत असताना त्या ओव्या म्हणत, लहानपणी यशवंतरावांना या ओव्यांच्या माध्यमातून काव्याची ओळख झाली. या ओव्या त्यांच्या मनात आशावाद निर्माण करणाऱ्या होत्या. ‘बाळांनो नका डगमगु सूर्यचंद्रावरील जाईल ढगू' अशा ओव्यांमधून त्यांनी गरिबीच्या अंधारात चाचपडणाऱ्या आपल्या मुलांना धीर दिला, कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जायचे ही लढाऊ वृत्ती त्यांच्यात निर्माण केली.
विठामाता भोळ्या भाबड्या होत्या, आयुष्यभर त्यांचे भोळेपण कायम राहिले.आपला मुलगा मोठा झाला आहे पण किती मोठा झाला आहे हे त्यांनाही समजत नव्हते. याचे कारण त्यांच्याकडे असलेला भोळेपणा. मुले लहान असतानाच वैधव्य आले; पण या माऊलीने आलेल्या प्रसंगावर मात केली. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलांना प्रगतीची वाट दिसू शकते, याचे भान विठामाता यांना आले होते. महाराष्ट्राला लाभलेलं थोर व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान सुपुत्राला जन्म देणाऱ्या, घडवणाऱ्या विठामाता या थोर माता आहेत.