भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-२८

याच्या उलट चीन कॉन्सुलेटवर काही कमी जास्त घडले असते तर मात्र त्या बाबतीत चौकशीची मागणी करण्यात आली असती, आणि पोलीस आपल्या कर्तव्यात चुकले असे सांगण्यात आले  असते. तेव्हा मला असे सांगावयाचे आहे की, पोलीस ज्या वेळी अशा ठिकाणी काम करतात त्या वेळी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध केव्हा केव्हा काम करावे लागते आणि हे काम ते स्वतःचे म्हणून करीत नाहीत तर स्टेटचे म्हणून करतात. त्यांना परिस्थिती लक्षात घेऊन जजमेंट वापरावे लागते. त्या ठिकाणी प्रव्होकेशन होते ह्याबद्दल माझ्या मनात बिलकुल संदेह नाही आणि म्हणून मी या बाबतीत इन्क्वायरी करू इच्छित नाही. पोलिसांनी जाणून बुजून कोणावर सूड घेण्यासाठी हा लाठीहल्ला केला अशी माझी कोणीही खात्री पटवून दिलेली नाही. अजूनही तशी कोणी खात्री पटवून दिली आणि प्रव्होकेशन नसताना पोलिसांनी सूड घेण्यासाठी हा लाठीहल्ला केला असे सिद्ध करून दिले तर मी ही मागणी मान्य करीन; पण ते जोपर्यंत तशी खात्री करून देऊ शकत नाहीत तोपर्यंत त्यांनी अशी मागणी करू नये. माहिती असेल ती आपण द्या. मी ऐकून घ्यावयास तयार आहे, परंतु माझे मित्र त्यांच्या बाजूतील माणसासंबंधी कारवाई करावयास तयार नाहीत आणि पुढारीपण घेऊन ते जे करतात ते रास्त करतात असे म्हणतात तोपर्यंत मी त्यांचे रक्षण करू शकत नाही. राजकीय पक्षातील लोक दगडफेक करतात तेव्हा त्यांना रस्त्यावर उभे राहू न देणे हे त्यांचे काम आहे. त्याची जबाबदारी राजकीय पक्षाने घेतली पाहिजे. पोलिसांच्याबद्दल चौकशी करण्याची आपण मागणी करता तेव्हा आपल्या पक्षातील लोकांबद्दल आपण काय करता हे मी पहातो. ती जबाबदारी आपण स्वीकारणार आहात काय ? तेव्हा तुम्ही काय करता ते पाहू आणि नंतर तुम्ही काय म्हणता त्याचा आपण विचार करू.

अध्यक्ष महाराज, पोलिसांना मी धन्यवाद दिलेले नाहीत उलट या बाबतीत चौकशी केली आहे आणि ती अशाकरता की, ह्या गोष्टी घडल्या नसत्या तर मला आनंद वाटला असता. खर्‍या लोकशाही राज्यात पोलिसांच्या फीलिंग्ज प्रोटेक्शन देण्याच्या असाव्यात आणि हात वर करण्यापूर्वी १०० वेळा त्यांनी विचार करावा अशा भावनेचे पोलिस निर्माण करावेत अशी माझी इच्छा आहे. ह्या बाबतीत मी जरूर ते प्रयत्‍न करीन पण याचा अर्थ पोलिसांना घालवावे अशी भूमिका असता कामा नये. राजकीय धोरणाबाबत ते एक अंग आहेत आणि ते शासनाचे एक निःपक्षपाती साधन बनावे, रक्षणाचे साधन असावे अशी माझी इच्छा आहे. तुमची आणि तुमच्या पक्षाची तशी भावना असेल तर लोकांच्या भावनेचा असा गोंधळ करू नका. मी तुमची मागणी का नाकारावी याचे सन्माननीय सभासद श्री. भिडे यांनी मार्गदर्शन केल्यामुळे मी या बाबतीत अधिक बोलत नाही.
----------------------------------------------------------------------------------
Shri Y.B.Chavan, Chief Minister, on 22 February 1961. Defended the lathi charge by the Police on demonstrators near the Belgian Consulate in Bombay.